दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
मुंबई महानगरात हवा प्रदूषणात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत २३ पीयूसी केंद्रांसह ५६८ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यात दोषी आढळून आलेल्या ८२ वाहनचालकांकडून ८३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई यापुढेही सुरूच राहील, असे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
मुंबई उपनगरात हवा प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिका आणि पोलिसांकडून दिवाळीत नियमांचे उल्लंघन करून फटाके फोडणार्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ वाहनांतील उत्सर्जित धुरावाटे होणार्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग सतर्क झाला आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांची तपासणी मोहीम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. त्यात २३ पीयूसी केंद्रांची तपासणी करण्यात आली असून, यात एकही केंद्र दोषी आढळून आले नाही. त्याचबरोबर ५६८ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, यात ८२ वाहने दोषी आढळून आली आहेत.
या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ८३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.