दिनमान प्रतिनिधी
नवी मुंबई ।
अवकाळी पावसाने स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबला असून बाजारात आता स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी बाजारात आवक वाढली असून, 900 क्रेट दाखल झाले आहेत. मात्र गोडवा अद्याप कमीच आहे. ग्राहक गोड स्ट्रॉबेरीच्या प्रतीक्षेत आहेत.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होतो, मात्र यंदा अवकाळी पडलेल्या पावसामुळे हंगाम लांबला आहे. स्ट्रॉबेरी थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. हा बहर जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. डिसेंबर, जानेवारी महिन्यांत सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात दाखल होत असली तरी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र पावसामुळे हंगामाला उशिराने सुरुवात होत आहे.
कालपर्यंत बाजारात 300-400 क्रेट आवक होती, परंतु गुरुवारी बाजारात आवक वाढली असून, 900 क्रेट दाखल झाले आहेत. मात्र बाजारात दाखल होत असलेल्या स्ट्रॉबेरीत आद्यप गोडवा उतरलेला नाही. अवकाळी पडलेल्या पावसामुळे लागवडीसाठी विलंब झाला आहे. बाजारात सध्या पाव किलोला 120-200रुपये दराने विक्री होत आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात अधिक आवक होणार असून मार्च अखेर पर्यंत हंगाम सुरू राहणार आहे.