दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून रस्तोरस्ती कुत्र्यांच्या टोळ्या नागरिकांवर हल्ले करत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. भटक्या कुत्र्यांची समस्या दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाबरोबरच आता केंद्रीय प्राणी आयोगाच्या निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांसाठी चक्क स्टेनलेस स्टीलचे पिंजरे उभारण्याचे ठरवले आहे. या १४ पिंजर्यांसाठी ४२ लाखांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ठाणे शहरातश्वानांची संख्या ७५ हजारांच्या आसपास पोहोचली असून यात सुमारे ५ हजारच्या आसपास पाळीव श्वान आहेत. तर, उर्वरित तब्बल ७० हजारांहून अधिक भटके कुत्रे आहेत. परंतु, ठाण्याच्या लोकसंख्येच्या दोन टक्के श्वान शहरात असल्याचा दावा ठाणे महापालिकेचा पशुवैद्यकीय विभागाकडून केला जात आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे शहरातील वातावरण व मानवी आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होतात. शहरात ठिकठिकाणी श्वान दंशाच्या घटना घडत असतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिक यात जखमी होतात तर भटके कुत्रे मागे लागल्याने वाहनांचे अपघातही होतात. अशा अनेक गोष्टींचा त्रास होत असल्याने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत असून अनेकदा सर्वसामान्य नागरिक व श्वानप्रेमी यांच्यात संघर्ष होतो.
ठाणे महापालिकेच्या वागळे इस्टेट विभागात निर्बिजीकरण केंद्र उभारले असून या केंद्रात आधी असलेल्या लोखंडी पिंजर्याऐवजी आता चक्क स्टेनलेस स्टीलचे पिंजरे उभारण्यात येणार आहेत. एका पिंजर्यात दोन श्वान याप्रमाणे ४२ लाख खर्चून १४ स्टेनलेस स्टीलचे पिंजरे उभारण्यात येणार आहेत. या संदर्भात संबधित अधिकार्यांना विचारले असता, लोखंडी पिंजर्यात लोखंड गंजते त्यामुळे श्वानांना जखमा होतात. यावर केंद्रीय प्राणी आयोगाने सूचवल्यानुसार लोखंडाचा बेस असलेले ४ बाय ५ फुटाचे डबल साईझचे स्टीलचे पिंजरे उभारले जात असल्याचे स्पष्ट केले.
राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून सर्व भटक्या कुत्र्यांची गणना करून त्यांचे निबिर्जीकरण करावे. त्याचबरोबर जखमी कुत्र्यांवर उपचार तसेच जेथे श्वान संख्या अधिक आहे तेथे श्वानगृहे (पिंजरे) तयार करावीत. सरकारने जिल्हाधिकार्यांना आदेश देऊन कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे मत आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.