वाढत्या महागाईविरोधात श्रीलंकेत गेल्या काही दिवसांपासून सामान्य नागरिकांचे सरकारविरोधात आंदोलन सुरू असून, मंगळवारी या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले. रामबुक्काना येथे आंदोलक आणि पोलिस यांच्यात धुमश्चक्री उडाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी थेट गोळीबार केला असून त्यामुळे एक आंदोलक ठार झाला, तर 10 जण जखमी झाले आहेत. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केल्याने गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट असून, अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. सरकारविरोधात रोष वाढत असून नागरिकांची मोठी आंदोलने सुरू आहेत. मंगळवारी रामबुक्काना येथे रेल्वेरुळांवर बसून लोकांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलकांना रुळावरून उठण्यास सांगितले. मात्र ते हटले नाहीत, उलट त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे गोळीबार करावा लागला, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले.