दिनमान प्रतिनिधी
नवी मुंबई|
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाने रात्री उशिरा येणार्या उपनगरीय गाड्यांमधील प्रवाशांच्या सोयीसाठी बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान ३२ विशेष बससेवा सुरू केल्या आहेत. पनवेल स्थानकावर १८ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरसाठी दोन ट्रॅक (अप आणि डाऊन) बांधण्याच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने बेलापूर ते पनवेल रात्रीचा ब्लॉक घेतला आहे. याकरिता सुमारे साधारणतः ४५ दिवसांचा कालावधी लागणार असून तो २ ऑक्टोबरपर्यंत असण्याची शक्यता आहे. या कालावधीत पनवेल स्टेशन यार्डमध्ये रात्रीचे तीन ते चार तासांचे ब्लॉक लागू करण्यात आले आहेत.
रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाच या पाच तासांसाठी हा ब्लॉक घेतला जात असून, २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेलपर्यंतच्या काही उशिरा रात्रीच्या सेवा रद्द केल्या जात आहेत किंवा कमी करण्यात येत आहेत.. त्याचप्रमाणे पनवेल येथून पहाटेच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एनएमएमटी यादरम्यानच्या कलावधीत ८ अतिरिक्त बस तसेच ३२ फेर्या वाढविण्यात आल्या आहेत.
बेलापूर ते पनवेलदरम्यान एकूण ३२ विशेष सेवा चालवण्यात येत आहेत. या बस सायन-पनवेल महामार्गावरून धावतील. दरम्यान, पहिली बस मध्यरात्री १२ वाजता सुरू होते आणि शेवटची बस पनवेलहून सकाळी ६.३४ आणि बेलापूरहून सकाळी ७.२६ वाजता असणार आहे. या ब्लॉकमुळे रेल्वे प्रवासी हैराण आहेत.