दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
अनैतिक संबंधास विरोध करणार्या आईची पोटच्या मुलाने प्रेयसीच्या साथीने राहत्या घरात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील मैत्रीपार्कमधील इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये घडली. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी मुलासह त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. कृष्णा अंबिकाप्रसाद यादव (29) व प्रेयसी बबिता पलटुराम यादव (30) अशी अटक आरोपीची नावे आहेत. तर अमरावती अंबिका प्रसाद यादव (58) असे हत्या करण्यात आलेल्या आईचे नाव आहे.
आरोपी मुलगा कृष्णा हा अविवाहित असून त्याचे याच परिसरात राहणार्या आरोपी बबितासोबत मागील तीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याची कुणकुण आईला लागल्याने ती कृष्णाच्या अनैतिक संबंधास विरोध करीत होती. यातून पोटच्या मुलानेच आईच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार 20 सप्टेंबरला मृत आई अमरावती हिला राहत्या बिल्डिंगच्या बेडरूममध्ये नेले, त्यानंतर पहाटेच्या दोन ते अडीच सुमारास प्रेयसी बबिताशी संगनमत करून बेल्टने आईचा गळा आवळून बेडरूममध्येच हत्या केली. हत्येनंतर संशियत म्हणून पोलिसांनी मुलासह त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेऊन तब्बल 15 तास चौकशी केली. त्यानंतर या दोघांनी हत्येची कबुली पोलिसांना दिली. या दोघांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.