वृत्तसंस्था
अहमदाबाद|
गुजरातच्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (१९ नोव्हेंबर २०२३) टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना खेळला गेला. आतापर्यंतचे सर्व विश्वचषक विजेते कर्णधार वर्ल्डकप २०२३ च्या अंतिम सामन्यात सहभागी झाले होते. पण, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वर्ल्डकपवर सर्वात पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघाचं नाव कोरणारे कपिल देव मात्र अंतिम सामन्यासाठी उपस्थित नव्हते. यावरुन काँग्रेसनं बीसीसीआयवर टीकास्त्र डागलं आहे. स्वतः कपिल देव यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट केलं की, कपिल देव यांना बीसीसीआयनं अहमदाबाद येथे होणार्या विश्वचषक फायनलसाठी आमंत्रित केलं नव्हतं, हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. ते म्हणाले की, बेदींप्रमाणेच कपिल देव हेही त्यांची मतं परखडपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आंदोलक महिला कुस्तीपटूंचं समर्थन केलं होतं. बीसीसीआयच्या प्लॅननुसार सामन्यादरम्यान विश्वविजेत्या संघा कर्णधारांना सन्मानित करण्यात येणार होतं. मात्र त्यासाठी कपिल देव यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं.
कधी कधी लोक विसरून जातात
घडल्या प्रकाराबाबत स्वतः कपिल देव यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. कपिल देव म्हणाले की, मला माझ्या सर्व सहकार्यांसोबत हा प्रवास करायचा होता. पण मला त्या सोहळ्यासाठी आमंत्रणच दिलं नव्हतं. त्यांनी मला बोलावलं नाही, त्यामुळे मी गेलोच नाही. मला असं वाटत होतं की, अंतिम सामना पाहताना माझ्यासोबत १९८३ ची संपूर्ण टीम असावी, परंतु मला असं वाटतंय की, खूप मोठं आयोजन होतं आणि कधीकधी लोक जबाबदार्या सांभाळताना काही गोष्टी विसरुन जातात.