आपण दररोज बातम्या बघतो. वर्तमानपत्र वाचत असतो. त्यामुळे सामाजिक घडामोडींपासून आपण इतकेही अनभिज्ञ नसतो. पण जेव्हा एखादी कलाकृती आपल्याला माहित असलेल्या गोष्टींची एक नवी अशी वास्तवदर्शी ओळख करून देते, तेव्हा अशी कलाकृती ही मनोरंजनाच्या पलिकडे काहीतरी देऊन जाते.
मराठी सिनेसृष्टीतील अशा काही मोजक्या कलाकृतींपैकी एक म्हणजे ‘सिंहासन’ सिनेमा.
आत्ता आपण मल्टीस्टारर सिनेमे अशा गोष्टी सहज बोलून जातो. अशा सिनेमांमध्ये दोन तीन बडे अभिनेते सोडले तर बाकी सगळे नवखे असतात. यामुळे जब्बार पटेल यांचं कौतुक अशासाठी आहे की, डॉ. शीराम लागू, अरुण सरनाईक, सतीश दुभाषी, दत्ता भट, मोहन आगाशे, नाना पाटेकर, शीकांत मोघे आणि निळू फुले अशा दिग्गज कलाकारांची एकत्र मोट बांधणं किती अवघड गोष्ट आहे, याची आपण कल्पना करू शकतो. कारण ही सर्व नटमंडळी त्या काळात अभिनयाच्या बाबतीत शेष्ठ होती. अशा दिग्गजांना एकाच सिनेमात आणण्याचं शिवधनुष्य जब्बार पटेल यांनी यशस्वीरीत्या पेललं. भिडुंनो, जब्बार पटेल यांच्यासोबत या सिनेमात काम करणार्या सर्व कलाकारांना सुद्धा याचं शेय जातं. कारण हल्ली कित्येक बातम्या ऐकायला मिळतात की, भूमिकेची लांबी कमी असल्याने सिनेमात काम करायला कलाकाराने नकार दिला वैगरे वैगरे. परंतु भूमिकेची लांबी मोठी की छोटी हा विचार न करता, सर्व कलाकार चांगल्या कलाकृतीचा भाग होण्यासाठी एकत्र आले. सर्वजण अभिनयाच्या बाबतीत शेष्ठ असल्याने छोट्या भूमिकेत असलेल्या कलाकाराने सुद्धा स्वतःची छाप सोडली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सतीश दुभाषी यांनी साकारलेली डीकास्टाची भूमिका छोटी तरीही लक्षात राहणारी. हे कलाकार अभिनयाच्या बाबतीत प्रतिभासंपन्न होतेच पण अभिनयापलिकडे माणूस म्हणून सुद्धा हे सर्वजण ग्रेट होते. कारण झालं असं की, ‘सिंहासन’ सिनेमाचा आवाका पाहता जब्बार पटेल यांनी बँकेकडून साडेचार लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. 1978-79 या काळात ही रक्कम फार मोठी होती. यामुळे जब्बार पटेल यांच्यावर अतिरिक्त खर्चाचा बोजा वाढू नये म्हणून सर्व कलाकारांनी ठरवून ‘सिंहासन’ सिनेमासाठी फक्त एक रुपया मानधन घेतलं. पत्रकार अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ कादंबरीवर आधारीत विजय तेंडुलकर यांनी ‘सिंहासन’ची पटकथा लिहिली. एखाद्या सिनेमाची पटकथा शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कशी असावी, याचा वस्तुपाठ म्हणजे तेंडुलकरांनी लिहिलेली ‘सिंहासन’ची पटकथा. आश्चर्य म्हणजे अरुण साधू यांनी स्वतःच्या पुस्तकांवर सिनेमा आधारित असला तरी सिनेमाची पटकथा स्वतः लिहिण्याचा आग्रह धरला नाही. त्यांना खात्री होती की, विजय तेंडुलकर सिनेमासाठी कादंबरीचं उत्तम रुपांतर करु शकतील. विजय तेंडुलकर हा माणूस लेखक म्हणून किती हुशार आणि प्रतिभावंत होता याची पदोपदी जाणीव ‘सिंहासन’ पाहताना होते. ज्या कादंबरीवर सिनेमा आधारित आहे त्याचा उल्लेख सुद्धा नकळत सिनेमात येऊन जातो आणि प्रेक्षक म्हणून आपल्याला सुद्धा इतकं काही वाटत नाही. इथेच तेंडुलकरांनी बाजी जिंकली आहे. सिनेमात एका प्रसंगात मुख्यमंत्री भेटायला आलेल्या आनंदराव टोपलेंना ‘सध्या काय वाचताय?’ असा प्रश्न विचारतात. आनंदराव ‘सिंहासन नावाची कादंबरी वाचतोय’ असं उत्तर देतात. तेंडुलकरांच्या लिखाणातील हुशारी इथे आपल्याला कळते. ‘सिंहासन’ची सुरुवात होते एका अधिवेशनापासून. जिथे मुख्यमंत्री जिवाजिराव शिंदे यांना एक निनावी फोन येऊन ते अस्वस्थ होतात. त्यांच्या बाजूला वित्तमंत्री विश्वासराव दाभाडे बसले असतात. हा प्रसंग झाल्यावर दुसर्या प्रसंगात खांद्यावर झोळी असलेला, सैल असा सदरा घातलेला पत्रकार दिगु टिपणीस दिसतो. पुढे अनेक उत्तमोत्तम प्रसंग आणि अनाकलनीय व्यक्तिरेखा सिनेमात दिसतात.राजकारणी माणसं सत्ता मिळवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात याची एक सुन्न करणारी कहाणी ‘सिंहासन’ च्या माध्यमातून आपण पाहत असतो. सिनेमाच्या शेवटी दिगु टिपणीसला वेड लागतं आणि सिनेमा संपतो. हा शेवटचा प्रसंग कसा शूट करावा, याविषयी जब्बार पटेल साशंक होते. त्या वेळेस निळू फुले त्यांना म्हणाले,जब्बार तुम्ही फक्त कॅमेरा सुरू ठेवा मी माझ्यापरिने हा सीन करतो. सीन सुरू झाला. दिगु टिपणीससमोर एक भिकारी येतो. त्याला पाहताच दिगु सुरुवातीला दचकतो. त्याच्या मनात मुंबईचं बकाल चित्र आणि सत्ताधार्यांचं चाललेलं वेगळ्या स्तरावरचं राजकारण अशा सर्व गोष्टींची सरमिसळ होते. आणि भिकार्याकडे पाहत दिगु मोठ्याने हसू लागतो आणि वेडाच्या भरात तो रस्त्यावर धावू लागतो. निळू फुले यांनी या प्रसंगात केलेला अभिनय सर्वांना आवडला आणि सीन ओके झाला.एका समारंभात निळू फुले यांना विचारण्यात आलं,दिगु पत्रकार म्हणून राजकारणामध्ये एवढा गुंतला होता की त्याला शेवटी वेड लागावं?