ऐसा कीर्तन महिमा सर्वामाजी वरिष्ठ |
जडमूढ भाविका सोपी केली पायवाट ||
सर्वसामान्य माणसाच्या जगण्याची वाट सोपी करण्याचा मार्ग म्हणजे कीर्तन आहे, असं जणाबाई ठामपणे सांगतात. त्यांचे हे म्हणणे रास्त असल्याचा अनुभव बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कान्नापूर येथे झालेल्या शेतकरी कीर्तन महत्सवातून मिळाला. हा कीर्तन महोत्सव इतका यशस्वी झाला की राज्यभर त्याची चर्चा झाली. अनेक ठिकाणांहून अभ्यासक या कीर्तन महोत्सवाला भेट देऊन गेले. प्रसार माध्यमांनी चांगला प्रतिसाद दिला. शेतकर्यांच्या व्यथावेदना मांडणारे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी तर या शेतकरी कीर्तन महोत्सवाला ‘क्रांतिकारी पाऊल’ म्हणून गौरविले. तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाज वादक उद्धव बापू आपेगावकर यांनी शेतकरी कीर्तन महोत्सव कीर्तन परंपरेचा नवा राजमार्ग ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी कीर्तन महोत्सव शेतकरी संघटनांबरोबरच भक्ती परंपरेत घुसलेला चंगवाळद रोखण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरू शकतो. खरं तर कीर्तन म्हणजे ज्ञानाचा उजेड पाडून अज्ञानाच्या अंधारात चाचपडणार्या समाजाला योग्य मार्ग दाखवणारा दीप आहे. नामदेव महाराज तर आपण कीर्तन कशासाठी करतो हे स्पष्ट शब्दांत सांगतात –
नाचू कीर्तनाचे रंगी ।
ज्ञानदीप लावू जगी ॥
मात्र आजचे हरिनाम सप्ताह, त्याला इव्हेंटचे आलेले स्वरूप, ग्रामीण भागात शेतकरी, कष्टकरी अत्यंत अडचणीत असताना मोठमोठ्या उकळलेल्या देणग्या, त्यातील दररोजच्या पंगतीसाठी पंचपक्वान्नांचे बेत, कीर्तनकारांच्या बिदाग्यांचे 25-30 हजारांची मर्यादा पार करणारे आकडे, त्यातही इतक्या मोठ्या बिदाग्या घेऊन कीर्तनात केलेले पांचट विनोद आणि विचित्र अंगविक्षेप हे सर्व प्रकार कीर्तन परंपरा कोणत्या दिशेला चालली आहे, याबद्दल चिंता वाटण्यासारखे आहेत. अशा परिस्थितीत संतांनी दाखविलेली भक्तीची सोपी पायवाट पुन्हा खडतर होताना दिसत आहे. कीर्तनातून ज्ञानाचा उजेड पाडण्याऐवजी कर्मकांड, अंधश्रद्धा पोषक दृष्टांत, धार्मिक कट्टरतेला खतपाणी, स्त्रियांची टिंगलटवाळी कीर्तनातून केली जात आहे. कीर्तन एक उथळ मनोरंजन म्हणून ऐकले जात आहे. समाजाला गुंतवून ठेऊन त्यांना जगण्याच्या प्रश्नांचे भान उरणार नाही अशी हरिनाम सप्ताहाची स्थिती झालेली असताना शेतकरी कीर्तन महोत्सवाने नवा पायंडा सुरू केला. सात दिवसांत दररोज दोन गावांतून भाकरी गोळा करण्यात आल्या. शेतकरी महिलांनी मोठ्या प्रेमाने कुणी पाच, कुणी दहा भाकरी दिल्या. कीर्तनाच्या मंडपाशेजारी पिठलं किंवा एखादी भाजी केली जायची, तिथेही पहिली पंगत महिलांची असायची. इतर ठिकाणी पहिल्यांदा पुरुषांची पगंत होते आणि नंतर महिलांची. घरातही पुरुष अगोदर जेवतात आणि महिला नंतर उरलेलं जेवतात. शेतकरी कीर्तन महोत्सवात मुद्दाम महिलांची पहिली पंगत ठेवली. एरवी या भागात पुरुष पुढे आणि महिला मागे कीर्तनाला बसविल्या जातात. शेतकरी कीर्तन महोत्सवात अर्ध्या भागात महिला आणि अर्ध्या भागात पुरुष समान बसविण्याचा प्रयत्न केला. हा छोटासा बदल पण स्री-सन्मानाच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरला.
एरवी कीर्तनात मोक्ष, मुक्ती, ब्रह्म, माया, वैकुंठ, स्वर्ग याची चर्चा होते. शेतकरी कीर्तन महोत्सवातून शेतकर्यांच्या प्रश्नांवर बहुतेक कीर्तनकार आणि प्रवचनकार यांनी चर्चा केली. कोणत्याही शेतकर्यांनी कर्जमाफीची मागणी केलेली नसताना तुकाराम महाराज यांनी विनाअट शेतकर्यांना कर्जमुक्त केल्याचा उल्लेख बहुतेक कीर्तनकार-प्रवचनकार यांच्या वक्तव्यातून आला. विविध संतांनी शेतकरी, कष्टकरी यांच्याशी संबंधित लिहिलेल्या अभंगांचे दाखले दिले. या शेतकरी कीर्तन महोत्सवात प्रामुख्याने खत-बियाण्यांचे वाढते दर आणि कोसळलेल्या शेतमालाच्या भावावर प्रामुख्याने चर्चा झाली. गेल्या वर्षी कापसाचे भाव चौदा हजार रुपये क्विंटलवर पोहोचले होते, सोयाबीन दहा हजार रुपये क्विंटल भावाने विकले गेले. परिणामी 2,300 रुपयाला मिळणारी सोयाबीन बियाण्याची बॅग 4,200 वर पोहोचली, कापूस बियाण्यांचे भावही दीडपटीने वाढले. खत, तणनाशक, कीटकनाशकांचे भावही वाढले. मजुरीचे भाव वाढले. याउलट कापूस आणि सोयाबीन यांचे भाव थेट अर्ध्यावर आले. बरं हे भाव नैसर्गिकरीत्या अर्ध्यावर आले नाही. गेल्या वर्षी कापूस-सोयाबीनचे भाव वाढले आणि शेतकर्यांनी त्याचा पेरा जास्त केला. सोयाबीन व कापसाचे उत्पादन वाढले म्हणून हे भाव कोसळले असते तर शेतकरी हवालदिल झाले नसते. पण कापूस-सोयाबीनचे भाव कोसळले कारण सरकारने परदेशी कापूस आयात केला, सोयाबीनचे तेल आयात केले. यामुळे शेतकर्यांमध्ये निराशा आहे. आज बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त शेतकर्यांनी भाव वाढेल या आशेने कापूस-सोयाबीन विकलेले नाही. पेरणी, मशागतीसाठी काढलेल्या कर्जाचे व्याज वाढत आहे आणि शेतमालाचे भाव कोसळत आहेत. त्यामुळे शेतकरी निराशेच्या खाईत लोटला जात आहे. शेतकरी कीर्तन महोत्सवातून निराश, हतबल होत असलेल्या शेतकर्यांना धीर, आधार तर दिलाच, पण आपल्या प्रश्नांसाठी लढण्याचे बळही दिले. विशेषतः काल्याच्या कीर्तनातील रडायचं नाही तर लढायचं, हा संदेश या कीर्तन महोत्सवाचा क्लायमॅक्स ठरला!
शेतकरी कीर्तन महोत्सवासाठी किसान सभेचे अॅड. अजय बुरांडे आणि टीमने केलेल्या परिश्रमाला तोड नाही. कीर्तन मंडपातील संगीत, इतर व्यवस्था पार पाडण्यासाठी दिगंबर महाराज वाघमोडे, किसन महाराज कावळे, पांचाळ महाराज यांनी परिश्रम घेतले. शेतकरी कीर्तन महोत्सव ही चळवळ झाली तर शेतकर्यांना जगण्याचे बळ देईल.
– ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर,
9892673047