जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा वार्षिक कलामेळा म्हणजे कायमच एक अस्सल पर्वणी. विद्यार्थ्यांनी विविध माध्यमांत केलेलं चित्र-शिल्पकाम पाहताना नजर अक्षरशः थकून जाते, सर्जनाचा उत्सव मात्र सुरूच राहतो. कारण हा कलामेळा पाहताना काय पाहू आणि काय नजरेत-मेंदूत-मनात साठवून ठेवू असं होऊन जातं. प्रत्येक विद्यार्थ्याची व्यक्त होण्याची वेगळी तर्हा. चित्र असो वा शिल्प, प्रत्येकाच्या ऊर्मी जणू काही जोरकसपणे उसळत असाव्यात, असं त्यांचं काम पाहून वाटतं. अर्थात कलेच्या अभिव्यक्तीच्या पातळीवर यातही काही अस्सल-कमअस्सल असेलही. पण आपण जे काही चित्र काढलंय किंवा शिल्प घडवलंय, त्यासंदर्भातल्या विद्यार्थ्यांच्या आपापल्या संकल्पना अगदी स्पष्ट आहेत हे त्यांच्याशी संवाद साधताना जाणवत होतं. उदाहरणार्थ धातू विभागात काम करणार्या चंद्रशेखर मांजारे याची प्रदर्शनात धातुकामातील दोन उठावशिल्पं होती. एक होतं मासिक पाळीत स्त्रीच्या गर्भगृहात उमलणार्या सर्जनशीलतेचं प्रतीक असलेलं उमलत्या कमळाचं शिल्प आणि दुसरं होतं स्त्रीचा सर्जनशील योनीप्रदेश दर्शवणार्या लज्जागौरीचं. या दोन्ही उठावशिल्पांमागच्या प्रतिमा-प्रतीकांची या विद्यार्थ्याला माहिती होती. त्याने रा. चिं. ढेरे यांचं ‘लज्जागौरी’ हे पुस्तक वाचलेलं होतं. तर ओदिशामधून मुंबईत कला शिकायला आलेल्या प्रताप बडातियाने पुराणाचा संदर्भ आजच्या आधुनिक काळाशी जोडला होता. विष्णूचा पहिला अवतार मत्स्याचा मानला जातो. त्या माशाचंच प्रतीक वापरून त्याने आपलं चित्रं काढलं आहे. मात्र ते काढताना त्याने माशाचं पाण्याबाहेर असलेलं डोकं सजीव-सुंदर ताज्या फडफडीत माशासारखं दाखवलं आहे, मात्र पाण्याखालचं माशाचं शरीर म्हणजे नुसता मृत देहाचा हाडांचा सांगाडा. म्हणजे वरवर पाहता आपल्याला एखादी गोष्ट शोभिवंत-साजिवंत दिसते (किंबहुना तशी दाखवली जाते), पण आतून प्रत्याक्षात ती पोखरलेली असते. या कलामेळ्यातील चित्रांमध्ये विषयापासून माध्यमापर्यंत प्रयोगशीलता होती. एकाने तर मार्बलचा कॅनव्हास करून अमूर्त शैलीतील चित्र काढलं होतं. त्यासाठी रंगलेपनाचं खास तंत्र वापरलं होतं. शिल्पकामांबद्दलही हेच म्हणावं लागेल. मग ते मातीकामातलं कोकणात देवाचं प्रतीक असलेलं तरंग नाचवणार्या व्यक्तीचं शिल्प असो वा कडकलक्ष्मी, पाण्याची घागर कमरेवर घेतलेल्या महिलेचं शिल्प असो. या शिल्पांचे विषय साधे-सोपे होते. पण मानवी शिल्प खरीखुरी वाटण्यासाठी त्यांच्या देहाचा जो घाट आवश्यक असतो, तो या शिल्पांत नेमका पकडण्यात आला होता. हा कलामेळा पाहताना जाणवलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे विद्यार्थ्यांनी रूपाच्या पलीकडे जाऊन अरूपाचा केलेला विचार. आपली कलाकृती रसिकांच्या केवळ नजरेला चांगली दिसण्यापेक्षा तिने त्यांच्या बुद्धीला-मेंदूला आव्हान दिलं पाहिजे, हा विचार प्रत्येकाने केलेला जाणवला.जेजेची वार्षिक कलावारी जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा वार्षिक कलामेळा म्हणजे कायमच एक अस्सल पर्वणी. विद्यार्थ्यांनी विविध माध्यमांत केलेलं चित्र-शिल्पकाम पाहताना नजर अक्षरशः थकून जाते, सर्जनाचा उत्सव मात्र सुरूच राहतो. कारण हा कलामेळा पाहताना काय पाहू आणि काय नजरेत-मेंदूत-मनात साठवून ठेवू असं होऊन जातं. प्रत्येक विद्यार्थ्याची व्यक्त होण्याची वेगळी तर्हा. चित्र असो वा शिल्प, प्रत्येकाच्या ऊर्मी जणू काही जोरकसपणे उसळत असाव्यात, असं त्यांचं काम पाहून वाटतं. अर्थात कलेच्या अभिव्यक्तीच्या पातळीवर यातही काही अस्सल-कमअस्सल असेलही. पण आपण जे काही चित्र काढलंय किंवा शिल्प घडवलंय, त्यासंदर्भातल्या विद्यार्थ्यांच्या आपापल्या संकल्पना अगदी स्पष्ट आहेत हे त्यांच्याशी संवाद साधताना जाणवत होतं. उदाहरणार्थ धातू विभागात काम करणार्या चंद्रशेखर मांजारे याची प्रदर्शनात धातुकामातील दोन उठावशिल्पं होती. एक होतं मासिक पाळीत स्त्रीच्या गर्भगृहात उमलणार्या सर्जनशीलतेचं प्रतीक असलेलं उमलत्या कमळाचं शिल्प आणि दुसरं होतं स्त्रीचा सर्जनशील योनीप्रदेश दर्शवणार्या लज्जागौरीचं. या दोन्ही उठावशिल्पांमागच्या प्रतिमा-प्रतीकांची या विद्यार्थ्याला माहिती होती. त्याने रा. चिं. ढेरे यांचं ‘लज्जागौरी’ हे पुस्तक वाचलेलं होतं. तर ओदिशामधून मुंबईत कला शिकायला आलेल्या प्रताप बडातियाने पुराणाचा संदर्भ आजच्या आधुनिक काळाशी जोडला होता. विष्णूचा पहिला अवतार मत्स्याचा मानला जातो. त्या माशाचंच प्रतीक वापरून त्याने आपलं चित्रं काढलं आहे. मात्र ते काढताना त्याने माशाचं पाण्याबाहेर असलेलं डोकं सजीव-सुंदर ताज्या फडफडीत माशासारखं दाखवलं आहे, मात्र पाण्याखालचं माशाचं शरीर म्हणजे नुसता मृत देहाचा हाडांचा सांगाडा. म्हणजे वरवर पाहता आपल्याला एखादी गोष्ट शोभिवंत-साजिवंत दिसते (किंबहुना तशी दाखवली जाते), पण आतून प्रत्याक्षात ती पोखरलेली असते. या कलामेळ्यातील चित्रांमध्ये विषयापासून माध्यमापर्यंत प्रयोगशीलता होती. एकाने तर मार्बलचा कॅनव्हास करून अमूर्त शैलीतील चित्र काढलं होतं. त्यासाठी रंगलेपनाचं खास तंत्र वापरलं होतं. शिल्पकामांबद्दलही हेच म्हणावं लागेल. मग ते मातीकामातलं कोकणात देवाचं प्रतीक असलेलं तरंग नाचवणार्या व्यक्तीचं शिल्प असो वा कडकलक्ष्मी, पाण्याची घागर कमरेवर घेतलेल्या महिलेचं शिल्प असो. या शिल्पांचे विषय साधे-सोपे होते. पण मानवी शिल्प खरीखुरी वाटण्यासाठी त्यांच्या देहाचा जो घाट आवश्यक असतो, तो या शिल्पांत नेमका पकडण्यात आला होता. हा कलामेळा पाहताना जाणवलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे विद्यार्थ्यांनी रूपाच्या पलीकडे जाऊन अरूपाचा केलेला विचार. आपली कलाकृती रसिकांच्या केवळ नजरेला चांगली दिसण्यापेक्षा तिने त्यांच्या बुद्धीला-मेंदूला आव्हान दिलं पाहिजे, हा विचार प्रत्येकाने केलेला जाणवला.