आज खरं तर पहाण्यासारखी मनस्थिती नव्हती. तरी ऑलरेडी बुकिंग होतं म्हणून पाहिला. डॅाक्युमेंटरीसारखा वाटला. बराच खेचलाय असंही वाटलं. आता संपेल, आता संपेल असं वाटतानाही सिनेमा सुरूच राहतो आणि अगदी स्पाईसजेटची जाहिरात करायला विमानाच्या आतलं अनावश्यक शूटिंग चाललंय म्हणून वैतागही आला. तरी, हा सिनेमा मला मनाच्या तळात हलवून गेला. माझ्या बहिणीचं सासर नागपूरच्या अशा झोपडपट्टीतच आहे. लग्न ब्युरोमधून ठरलं, मुलगा रिजनल कॉलेजातून बी-टेक होऊन मग आयआयटीत एम टेक होऊन आणि पीएचडी करत होता. त्यामुळे घरातून एवढी सहज परवानगी नसूनही तिने लग्न केलं त्याच्याशी. अगदी त्या सिनेमात झोपडपट्टीत एकदोन चोरट्या माडीची घरे दिसतात तसं सासर आहे तिचं. लग्नानंतर प्रथमच अशी वस्ती तिने आणि आम्हीही पाहिली. पण सगळी मुलं उच्चशिक्षित आहेत. आता तिचा नवराही आधी सिंगापूर आणि आता कुठे युरोपात बँकिंगमध्ये आहे. तिचा दीरही ऑस्ट्रेलियात पेडिट्रीशीयन आहे. त्यांनी परदेशी जाताना अगदी अशीच भावना व्यक्त केली होती, एक भिंत ओलांडल्याची. आमचं लहानपणही गावातल्या एका टिपिकल पूर्वी महार पण आता नवबौद्ध झालेल्या वाडीत गेलंय. मात्र मोठी माणसं अगदी स्ट्रीक्ट होती. सिनेमात दाखवलंय तशी आंबेडकर जयंतीला दारू पिऊन/न पिता सैराट नाचणारी नव्हती. स्ट्रीक्टली समाजाची गाणी/भीमगीते/भक्तीगीते स्पीकरवर आंबेडकर जयंती/बुद्ध जयंती/धम्मचक्रपरिवर्तन दिनाच्या दिवशी असत. जयंतीला जिल्ह्याच्या ठिकाणी मेळावे असत आणि ते ही प्रचंड शिस्तीत असत. नंतर आमच्या मेडिकलच्या अॅडमिशनच्यावेळी मुंबईत एका लांबच्या काकांकडे जाऊन राहिले. काकांचं चेंबूरमध्ये वन बेडरूमचं का होईना, पण चांगलं घर होतं. मात्र मुख्य घर गोवंडीत. तिथे पहिल्यांदा झोपडपट्टीचा तो घाणेरडा वास, शहरी जातभाऊंती गलिच्छ स्थिती, स्वच्छ पण लहानशी घरे आणि त्या घराबाहेरचे प्रचंड घाणीचे डोंगर पाहिले. एमबीबीएसला अॅडमिशन झाल्यानंतर सुरुवातीला घरची आठवण यायची. मला एकटं वाटू नये म्हणून माझ्या एका काकीचे भाऊ, जे आम्हालाही मामासारखेच जवळचे होते, ते केव्हातरी त्यांच्या घरी घेऊन जायचे. त्यांचं घर म्हणजे कुलाब्याच्या सफाई कामगारांच्या चाळी. सगळ्या मुंबईला स्वच्छ करणार्या, ऐन साऊथ बॉम्बेत राहणार्या या लोकांच्या चाळी मात्र अत्यंत गलिच्छ होत्या. एकेका दीड खणाच्या खोलीत चार पाच कुटुंबे. पिढ्यान्पिढ्या घर सोडायचं नाही, म्हणून त्याच त्या कामाला चिकटत राहणारी नविन पिढी, चाळीच्या गेटमधून आत पाऊलं टाकताच घाणीने भरलेलं ते मोठं पटांगण. घरात अडचण होते म्हणून एखाद्या नव्या पिढीतल्या नव्या लग्न झालेल्या जोडप्याला सोडून त्याच पटांगणात रात्री झोपणारे लोक पहिल्यांदा पाहिले. बहुतेक तरुण मुलांचे बेंजो पार्टी काढायचे स्वप्न असायचे. प्रत्येकजण सकाळी उठल्यावर चाय आणि मस्कापाव खाऊन बेंजोची प्रॅक्टीस करायला जायचा. मी गेल्यावर आमची डॉक्टर होणारी भाची असं कौतुक करून मामालोक सगळ्यांना भेटायला बोलवायचे. बायका खास बघायला यायच्या. या चाळीतल्या नातलगांतून मात्र कुणी ती भिंत ओलांडून पुढे आलं नाही. माझ्यानंतर चेंबूरच्या त्या काकांना आपल्या मुलींना डॉक्टर करायची फार इच्छा होती. मात्र मुलींना पुरेसे मार्क्स मिळाले नाहीत. तरी अगदी जिद्दीने त्यांनी युक्रेनला ठेवून मुलीला डॉक्टर केलं. परत येऊन डी एनबी दिल्यावरच भारतात प्रॅक्टीस करता येते. मात्र घरात आणि नात्यात सतत हिच्यावर किती पैसे उधळायचे अशी चर्चा चालू असायची. भारतात येऊन प्रॅक्टीस करायला परीक्षा द्यावीच लागते हे लोकांच्या लक्षातच यायचे नाही. तिकडे फेल झाली, म्हणून आता घरात बसून इकडे परीक्षा देतेय, किती पैसा खाणार बापाचा कुणास ठाऊक! असं लोक बोलायचे. शेवटी एका सकाळी तिने फास लावून घेऊन जीव दिला. आता तिचा भाऊ इंग्लंडात पायलट आहे.
(क्रमश:)
स्वाती साती यांची फेसबुक पोस्ट
– डॉ. विनय काटे