दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ चा निकाल गुरुवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. यामध्ये ठाणे जिल्ह्याचा निकाल ८८.९० टक्के इतका लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून या परीक्षेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.३६ टक्के आहे. ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला असून ९६.८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल लागला. काही वेळातच मुलांनी हा निकाल पाहिल्यानंतर ठिकठिकाणी कॉलेज परिसरात जल्लोष करण्यात आला. ठाणे जिल्ह्यात ११ तालुके असून या तालुक्याचा एकूण निकाल ८८.९० टक्के लागला आहे. यंदा निकालात उल्हासनगर महापालिका परिसरानेही आघाडी घेतली आहे.
ठाण्यातील दृष्टीहिन सोहनकुमारचे घवघवीत यश
ठाण्याच्या गावंडबाग येथील कोकणीपाडा, किरकिरे चाळीत राहणार्या सोहनकुमार भट्ट या दृष्टीहिन विद्यार्थ्याने बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. सोहनकुमारचे वडील रामाशीश रिक्षाचालक असून त्यांच्या पत्नीच्या आजारपणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी रिक्षा विकली. परंतु ऑगस्ट महिन्यात पत्नी किरणदेवी यांचे निधन झाले. सोहनकुमारचे बारावीचे महत्त्वाचे वर्ष होते. यावेळी त्याच्या मोठ्या भावाने घराची आर्थिक जबाबदारी खांद्यावर उचलून सोहनला अभ्यासात मदत केली. याच आधाराच्या बळावर आणि मेहनतीच्या जोरावर त्याने ८१ टक्के गुण संपादन करून घवघवीत यश मिळवले. या यशात कुटुंबासह मी शिक्षण घेत असलेल्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाचाही तितकाच मोठा वाटा असल्याचे सोहनकुमारने सांगितले.
जिल्ह्यात ८७७४९ विद्यार्थी उत्तीर्ण
यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी ९९१७० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते यात ५२०५२ मुले तर ४७११८ मुलींचा समावेश होता. ९८६९६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी ८७७४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेले ५१७९१ मुले तर ४६९०५ मुली असून यापैकी ४४८९६ मुले तर ४२८५३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. अशा प्रकारे मुलांचा निकाल ८६.६८ टक्के तर मुलींचा निकाल ९१.३६ टक्के लागला आहे.
तालुकानिहाय बारावी परिक्षेचा निकाल
तालुका टक्के
कल्याण ग्रामीण – ९१.४४
अंबरनाथ – ८६.२६
भिवंडी – ८६.९९
मुरबाड – ९६.८९
शहापूर – ८९.९१
ठाणे महापालिका – ९०.१८
नवी मुंबई पालिका – ८९.५७
भाईंदर पालिका – ९१.४६
कल्याण डोंबिवली पालिका – ८७.०८
उल्हासनगर पालिका – ८६.१२
ठाणे जिल्ह्यात मुरबाड अव्वल
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे महापालिका, नवी मुंबई मनपा, मिरा भाईंदर पालिका, कल्याण डोंबिवली महापाालिका, उल्हासनगर पालिका, भिवंडी पालिका आदी क्षेत्रांतील विद्यार्थी प्रविष्ट होते. यामध्ये मुरबाड क्षेत्राचा निकाल सर्वाधिक लागून ९६.८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कोकण विभागच नंबर वन
यंदा राज्याचा बारावीचा निकाल ९१.३५ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९३. ७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणार्या मुलांचं प्रमाण ८९.१४ टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणार्या मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के लागला असून मुंबईचा निकाला ८८.१३ टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी हा निकाल जाहीर केला आहे.