दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करीत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद शमीच्या ७ विकेट्सच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. यानंतर आता अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी कोलकाताच्या ईडन गार्डनवर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिय संघ आमनेसामने आहेत. या दोन्ही संघांमधील विजयी संघ रविवारी (१९ नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताशी दोन हात करणार आहे. पण त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबद्दल वक्तव्य केले आहे, जे सध्या चर्चेत आहे.
राज ठाकरे म्हणाले की, विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार आहे. आज उपांत्य फेरीतला दुसरा सामना सुरू होणार आहे. त्या दोन संघांपैकी (दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया) जो संघ जिंकेल तो अंतिम सामन्यात भारताविरोधात खेळेल. पण मला बहुधा वाटतं की, त्यांच्यापैकी जो संघ जिंकेल त्यांना सांगितले जाईल की साहबने बोला हैं हारने को! (साहेबांनी पराभूत होण्यास सांगितले आहे).
भाजपाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचं खातं उघडलं
तुम्ही ३ डिसेंबरला भाजपाचे सरकार आणा, तुम्हाला रामलल्लाचे मोफत दर्शन घडवू. त्याचा खर्च भाजपा सरकार करेल, असं अमित शाह यांनी मध्य प्रदेशातील सभेत म्हटले आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, मला वाटतं भाजपाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचं खातं उघडलं आहे. तुम्ही काय कामं केली, ते लोकांना सांगा. रामलल्लाच्या दर्शनाचं आमिष कशाला लोकांना दाखवता? सत्तेत तुम्ही इतकी वर्षे आहात, काय कामं केली ते सांगा, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
कोकण पदवीधरसाठी मनसे लागली कामाला
ठाणे| मनसेप्रमुख राज ठाकरे ठाणे शहराच्या दौर्यावर आले असता त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत ठाणे, कल्याण, नवी मुंबईच्या पदाधिकार्यांशी चर्चा करून निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा, असे सांगितले. तसेच मराठा आरक्षण, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांबाबतही चर्चा केली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सर्वच पक्षांचे नेते दौरे करून पदाधिकार्यांसोबत बैठका घेत आहेत.