दिनमान प्रतिनिधी
शहापूर।
शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. पंडित नाका ते संतोष हॉटेल या मुख्य रस्त्यावर वाहनांची एकामागोमाग रिघ लागत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुलांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात दररोज रिक्षा, दुचाकी, कार आदी वाहनांच्या कोडींने संपूर्ण मुख्य रस्ता व्यापला जातो. ही वाहतूककोंडी सकाळच्या वेळी व सांयकाळी होते. शहरात कुठेही पार्किंगची सोय नसल्याने मनमानीने रस्त्याच्या कडेला दुचाकी कशाही पद्धतीने उभी केली जात आहेत.
परिणामी दुचाकीच्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूककोंडी होते. एखादा अवजड मालवाहू ट्रक शहरात आल्यास लगेच रस्त्यावर वाहनांची रांग लागते व वाहतूककोंडी होते. यामध्ये शेकडो रिक्षा अडकून पडतात. यामुळे आसनगाव रेल्वे स्थानकात जाणार्या नोकदार व अन्य प्रवाशांना रेल्वे स्थानकात जाण्यास विलंब होतो. तर या वाहनांच्या कोंडीत रुग्ण घेऊन जाणार्या रुग्णवाहिका देखील अडकून पडतात.
अवजड ट्रकला शहरात गर्दीच्या वेळेस प्रवेशबंदी करणे गरजेचे असताना शहापूर वाहतूक पोलिस शहरात येणार्या या मालवाहू ट्रकवर बंदी घालत नाहीत. शहापूर शहारातील वाहतूककोंडीची ही समस्या रस्त्यावरून ये-जा करणार्या पादचार्यांसाठीही दररोजची डोकेदुखी ठरली आहे.