वृत्तसंस्था
ठाणे।
भिवंडी येथील शासकीय निरीक्षण आणि बालगृहात पुनर्वसनासाठी वास्तव्यास असलेल्या काही अल्पवयीन मुलांचा तिथे शिकविणार्या सुमारे चाळीस वर्षीय शिक्षिकेकडूनच लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षिकेवर मुलांच्या तक्रारीनंतर भिवंडी येथील शांतीनगर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षिकेला काही महिन्यांपूर्वी गैरवर्तनाबाबत निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी निरीक्षणगृहातील कर्मचारी आणि मुलांच्या सुरू असलेल्या सविस्तर चौकशीदरम्यान हे सर्व धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. जिल्हा महिला बालविकास विभागाच्या अधिकार्यांकडून याबाबत चौकशी सुरू आहे.
भिवंडीतील कचेरीपाडा येथे शासकीय निरीक्षणगृह आणि बालगृह आहे. येथे वास्तव्यास असलेल्या मुलांच्या देखभालीसाठी आणि शिक्षणासाठी शासनातर्फे अनुदानित संस्था कार्यरत आहे. या निरीक्षणगृहात मागील काही वर्षांपासून कार्यरत असणार्या एका शिक्षिकेविरोधात मुलांच्या वारंवार तक्रारी येत होत्या. तसेच या शिक्षिकेचे सहकर्मचारी आणि नेमणूक करणार्या संस्थेतील पदाधिकार्यांबरोबरही वाद होते. या गैरवर्तनाबद्दल शिक्षेकेचे मागील तीन महिन्यांपूर्वी निलंबन करण्यात आले होते. तसेच बाल न्यायालयीन आदेशानुसार संबंधित प्रकरणाची जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून चौकशी सुरू होती.
दरम्यान या शिक्षिकेने काही अल्पवयीन बालकांचा लैंगिक छळ केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षिकेचे निरीक्षणगृहातील इतर शिक्षक आणि कर्मचार्यांसमवेत वैयक्तिक वाद होते. या वादाचा वचपा काढण्यासाठी आणि इतर शिक्षकांना मारहाण करण्यासाठी संबंधित शिक्षिकेने निरीक्षणगृहातील एका अल्पवयीन मुलाला प्रवृत्त केल्याचेही चौकशीतून समोर आले आहे. तू असे केल्यास तुझ्यासमवेत शरीरसंबंध ठेवेन, असे आमिषही दाखवल्याची माहिती एका पीडित मुलाने चौकशीदरम्यान जिल्हा महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आणि पोलिसांना दिली आहे.