डॉ.सचिन लांडगे |
डॉक्टरला मारहाण किंवा हॉस्पिटलची तोडफोड हे म्हणजे घटनेचं एक टोक झाले. अशी घटना एका शहरात महिन्यातून एकदा वगैरेच होते, पण बरेचशे प्रसंग तिथपर्यंत जात नाहीत. म्हणून या घटनांची फ्रिक्वेन्सी आपल्याला तुरळक वाटते. पण तसे नाही. एका सर्जिकल हॉस्पिटलमध्ये आठवड्यात एक-दोन प्रसंग तरी असे हमरीतुमरीवर येण्याचे घडतात. तर एका आयसीयू च्या ठिकाणी रोज दोन ते तीन प्रसंग असे असतातच. अगदी शांत प्रॅक्टिस करणार्या डॉक्टरला किंवा नुसती ओपीडी असणार्या डॉक्टरलाही आठवड्यातून एक तरी अनुभव उद्धट बोलण्याचा किंवा भांडणाचा येतोच. सरकार कायदा करेल तेव्हा करेल किंवा कोणी मदत करेल तेव्हा करेल, पण प्रत्येक डॉक्टरला मात्र वैयक्तिक पातळीवर ह्या सगळ्या गोष्टींना स्वतःच सामोरं जावं लागणार आहे.
हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, बाऊन्सर्स ठेवणे, इंडेम्निटी काढणे, पेशंटला वेळ देणे, सामोपचाराने राहणे वगैरे या सगळ्या खबरदारीच्या उपायांव्यतिरिक्त अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या प्रॅक्टिसमधले ताणतणाव डायरेक्टली कमी करू शकते, ती म्हणजे पेशंट्स सिलेक्शन, रुग्णांची निवड. आपल्या व्यवसायात असं म्हणलं जातं की कोणत्या प्रकारचे आणि आजाराचे पेशंट ट्रीट करायचे, यापेक्षा कुठले कुठले पेशंट्स ‘घ्यायचे नाहीत’ हे ज्याला कळतं त्याचीच प्रॅक्टिस चांगली चालते. पेशंट्स घ्यायचे नाहीत म्हणजे लगेच नाकारायचेच असं नाही. तर रिस्की पेशंट्स हायर सेंटरला (गोड बोलून) पाठवून द्यायचे.
आता प्रश्न निर्माण झाला की रिस्की म्हणजे नेमके कोणते?
आपल्याला रिस्क दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे मेडिकल रिस्क आणि दुसरी म्हणजे सोशल रिस्क.
समजा, कपाळावरची एक गाठ काढायचे ऑपरेशन आहे. त्या गाठीचे आत ब्रेनशी कनेक्शन असणे, ही झाली सर्जिकल रिस्क. पण समजा, गाठ साधीच आहे, पण पेशंटला हार्ट डिसीज आहे, ही झाली अनेस्थेटिक रिस्क. या दोन्हीही प्रकारच्या रिस्कना एकत्रितपणे मेडिकल रिस्क किंवा वैद्यकीय धोका असं म्हणतात. समजा, गाठही साधी आहे, पेशंटला इतरही काही आजार नाहीत. पण तो पेशंट मात्र कोण्या आमदाराचा नातेवाईक आहे किंवा त्या पेशंटसोबत हॉस्पिटलच्या बाहेर पन्नासेक लोक आहेत, ही झाली सोशल रिस्क किंवा थोडक्यात अवैद्यकीय धोका.
एक उदाहरण सांगतो. एकदा रस्त्यावर बाईकचा अॅक्सिडेंट होऊन एक डोक्याला मार लागलेला पेशंट एका डॉक्टराच्या कॅज्युअल्टीमध्ये आला. डॉक्टरांनी तो पाहिला. ते म्हणाले, किरकोळ जखम आहे, काही टाके घ्यावे लागतील. तेवढ्यात पाच-दहा मिनिटांत तिथे वीस- पंचवीस टग्यांचा मॉब जमा झाला. मग डॉक्टर म्हणाले, पण सेफ साइड म्हणून आपण एक सिटी स्कॅन करून घेऊ आणि न्यूरोसर्जनचे पण ओपिनियन घेऊ या. तेवढ्यात त्या डॉक्टरला आमदाराचा फोन आला की, तो माझा जवळचा कार्यकर्ता आहे. डॉक्टर कायपण करा पण त्याला काही झाले नाही पाहिजे. मग यथावकाश डॉक्टरांनी मनाशी ठरवले आणि म्हणाले, समजा, ऑपरेशन वगैरे लागले तर आपल्याकडचं मशिन थोडं खराब झाले आहे आणि इतर काही सोयी नाहीत; तेव्हा आपण त्याला पुण्याला शिफ्ट करू या. केस साधीच होती, पण अनावश्यक दबावामुळे त्यातली सोशल रिस्क खूपच वाढली!! मग अशाने आपली स्ट्रेस लेव्हल पण खूपच वाढते. ट्रीटमेंटशी संबंधित कोणता स्ट्रेस असेल तर डॉक्टर्स त्याला जुळवून घेऊ शकतात. पण असे हे भलतेच स्ट्रेस प्रत्येकाला सहन होतीलच असे नाही किंवा प्रत्येक डॉक्टरची धोका पत्करण्याची क्षमता एकसारखीच असेल असे नाही.
मग लोक डॉक्टरांवर असा अनावश्यक दबाव का टाकत असतील बरं? का याचे – त्याचे सतराशे साठ फोन आणत असतील डॉक्टरला? काय मिळतं अशाने लोकांना काय माहिती!? पण एक मात्र नक्की की, अशानं मेडिकल लाइन ऑफ मॅनेजमेंट जरी फारशी बदलत नसली तरी पॅरामेडिक डिसिजन्स मात्र खूप बदलतात. बरं त्यातून डॉक्टरला रिस्कच्या प्रमाणात पैसे मिळणार असतील किंवा निदान प्रसिद्धी तरी मिळणार असेल तरी ठीक आहे. पण खाया पिया कुछ नहीं आणि ग्लास तोडा बारा आणा, असं होणार असेल तर विनाकारण फालतूचा स्ट्रेस घेण्याला काय अर्थ आहे!?
शक्यतो दोन-दोन रिस्क एकत्र नाही घ्यायच्या. पेशंटच्या नातेवाईकांचे सोशली त्रासदायक पोटेंशियल असेल तर सोप्या सोप्या केसेस घ्यायच्या, बाकीच्यांना गोड बोलून पुढे पाठवायचे किंवा, पेशंट मेडिकली/सर्जिकली/अनेस्थेटिकली हाय रिस्क असेल तर त्याचे नातेवाईक आपल्याला फालतूचा त्रास तर देणार नाहीत ना किंवा आपण विनाकारण कोर्ट केसमध्ये वगैरे अडकणार तर नाहीत ना, याची खात्री करून आणि त्यांना आजाराची सर्व कल्पना देऊन मगच त्यात हात घालायचा.
आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार्या सोयीनुसार अथवा आपल्या धोका पत्करण्याच्या स्वभावानुसार आणि त्याबदल्यात आपल्याला मिळणार्या मोबदल्यानुसार (पैसा, प्रसिद्धी) ठरवायचे की, किती लेव्हलपर्यंत मेडिकली रिस्की पेशंट घ्यायचे आणि किती लेव्हलपर्यंत सोशली रिस्की केसेस आपण एंटरटेन करू शकतो. प्रॅक्टिसमध्ये एखादे वर्ष झाल्यानंतर ते आपोआपच लक्षात येते की, कोणत्या एरियात असलेले पेशंट टाळायचे, कोणत्या गावातल्या पेशंटसोबत काय बोलायचे/टाळायचे, पेशंटच्या कोणत्या वाक्यांनी अलर्ट व्हायचे वगैरे. तसेच थोड्याशा अनुभवांती आपल्याला कळायला हवं की, कोणते पेशंट्स वेळीच हायर सेंटरला शिफ्ट करायचे किंवा एखाद्या पेशंटला ट्रीटमेंटच्या कोणत्या टप्प्यावर दुसर्या कन्सल्टंटकडे जायला सांगायचे. मी सांगितलेले स्टॅटिस्टिक्स हे भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीनुसार बदलणारे आहेत. काही ठिकाणी कमी असतील तर काही ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त आहेत! पेशंटची जात, धर्म यावर तर हे सरळ सरळ अवलंबून असतंच, पण डॉक्टरचीही जात, धर्मही त्या त्या परिसरात खूप मॅटर करतात.
आपल्या रुटीन कामामधले 90 टक्के पेशंट्स आपली रोजची 10 टक्के स्ट्रेस लेव्हल व्यापत असतात. कारण ते काम सोपे असते आणि आपल्यासाठी रोजचे असते. पण उरलेले 10 टक्के (किंवा त्याहूनही कमी) हाय रिस्क पेशंट्स मात्र आपल्याला 90 टक्के स्ट्रेस देऊन जातात. आणि सतत त्याच केसेसचा विचार आपल्या डोक्यात घोळत असतो.
अँटिबायोटिक बदलून बघू का? कुठली तपासणी करायची राहिली का? अजून काही करायला हवे का? अजून कोणाला फोन करून मदत घेऊ का? वगैरे वगैरे. अशी रोजची एखादीच केस जरी असली तरी आपली adrenaline level जास्त राहते. कशातच मन लागत नाही, बायकोपोरांकडे दुर्लक्ष होते, चिडचिड वाढते, इतर पेशंट्सवरदेखील आपल्या या मानसिकतेचा परिणाम नकळत होऊ शकतो. ही एक बाजू झाली. पण अशा चॅलेंजिंग केसमधून त्या पेशंटला आपण बरे केले तर मात्र आपल्याला जो आनंद होतो तो अवर्णनीय आहे. त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
पण जर पेशंटनी त्याचे बिल कमी दिले तर आपल्याला वाईट वाटते, अन्याय झाल्याची फिलिंग वगैरे येते. पण एकवेळ तेही चालते. पण आपले पूर्ण नॉलेज आणि प्रयत्न पणाला लावूनदेखील पेशंटला काही कमीजास्त झाले आणि नातेवाइकांकडून अरेरावी ऐकून घ्यावी लागली, दमदाटी-मारहाण झाली तर मात्र एवढी मरमर करून आपण काय कमावले, हा विचार पुढचा आठवडाभर तरी आपला पिच्छा सोडत नाही. आपलं पेशंट्स सिलेक्शन चुकतंय की काय, असं वाटायला लागतं. आपण असे पेशंट्स घ्यायलाच नकोत का, असा प्रश्न पडतो. मग खूप अवघड असतं या फ्रस्ट्रेशनमधून बाहेर येणं.
मेडिकल कॉलेजमध्ये केवळ पुस्तक आणि पेशंट्स यांच्याशीच संबंध असतो डॉक्टरचा. तिथून बाहेर पडल्यावर त्याला कळतं की ते सगळं तर जास्त सोपं होतं. हे हॉस्पिटल चालवणं त्याच्यापेक्षाही कठीण काम आहे. स्टाफ मिळत नाही, स्टाफ काम करीत नाही, स्टाफ सुट्ट्या घेतो, भांडणं करतो इथपासून ते मॉब हँडल करणं, विविध प्रवृत्तीच्या पेशंट्सशी बोलणं, त्यांच्या सतराशे साठ नातेवाइकांशी डोकं लावणं. रोज त्याच त्या गोष्टी प्रत्येकाला समजून सांगणं आणि कितीही समजावून सांगूनदेखील पेशंटने स्वतःहून गोळ्या बंद केल्यामुळे बळावलेल्या आजाराला ट्रीट करताना, तो कितीही चिडला तरी आपण मात्र त्याच्यावर जराही न चिडणे, याला तुमच्याकडं ऋषीमुनीचे धैर्य हवं असतं! यापेक्षा तर हिमालयात जाऊन खडतर तपस्या करणं जास्त सोपं असेल! पूर्वी डॉक्टर जसजसं सीनियर होतील तसतसं अनुभव वाढल्याने रिस्की पेशंट्स ट्रीट करायचे. पण आता बहुतांश ठिकाणी तसं उरलेलं नाहीये. डॉक्टर जसजसं सीनियर होतील तसतसं ते safe
practice करायचं बघत आहेत. नवीन पासआऊट झालेले बरेच जण मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉइन होताहेत किंवा मग चार-पाच जण एकत्र येऊन प्रॅक्टिस टाकताहेत.
सांगायचा मुद्दा काय, तर Choose your patients wisely.. एवढं जरी केलं तरी आपली स्ट्रेस लेव्हल आपण 90 टक्के कमी करू शकतो. आपली स्ट्रेस लेव्हल कमी असेल तर आपोआप आपली चिडचिडही कमी होते, आपण पेशंट्सना खूप पेशन्सली बोलू शकतो, जास्त एंटरटेन करू शकतो आणि वादाचे प्रसंग टळतात.