सायन्स व वृक्ष नक्षत्र उद्यानांचे नूतनीकरण होणार
विरार।
विरार पश्चिम येथे असलेल्या सायन्स व वृक्ष नक्षत्र उद्यानांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर या उद्यानांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, पालिका या उद्यानांत लहान मुलांसाठी आकर्षक संकल्पना राबवणार आहे. वसई-विरार शहरात 145 सार्वजनिक उद्याने आहेत. विविध बचत गटांच्या माध्यमातून पालिका या उद्यानांची देखभाल करते. विरार पश्चिमेतील जकात नाका परिसरात सायन्स आणि वृक्ष नक्षत्र ही दोन उद्याने प्रसिद्ध आहेत. या उद्यानांत सकाळी व संध्याकाळी शेकडो नागरिक फेरफटका व विरंगुळ्याकरिता येत असतात. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर या उद्यानांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
सायन्स उद्यानात अॅक्रेलिकमधील पक्षी, प्राणी यांच्या प्रतिकृती वसवण्यात येणार आहेत; जेणेकरून या पक्षी-प्राण्यांची ओळख मुलांना व्हावी, हा उद्देश आहे. उद्यानात छोट्या तलावाभोवती प्रतिकृती बसवण्यात येणार आहेत.