प्रकाश चान्दे | तराने – अफसाने
कालच जिने आपल्या वयाची 85 वर्षे पूर्ण केली आणि जिला यंदा शासनाचा पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला, ती प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर हिने गायलेल्या एका गीताची जन्मकथा.
हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी निर्माते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. त्यांतून सातत्याने चित्रपटनिर्मिती करणारे आणखीनच थोडे. हिंदीत बस्तान बसलेल्या महाराष्ट्रीय निर्माते-दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर निर्मित-दिग्दर्शित आंचल (1960) चित्रपटातील हे गाणं. लताचं सी. रामचंद्र आणि एस. डी. बर्मन या दोन मोठ्या संगीत दिग्दर्शकांबरोबर एकाच काळात वितुष्ट आलं.त्याचा फायदा आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांना झाला.
चित्रपट : आंचल, 1960.
खरं तर लता मंगेशकर ही सी. रामचंद्र (अण्णा) यांची नेहमीच पहिल्या पसंतीची गायिका होती. (हीच गोष्ट त्या वेळच्या ओ. पी. नय्यर सोडला तर सर्व संगीत दिग्दर्शकांना लागू पडत होती.) त्या वेळेस तिचे गारुड इतके होते की तिला एकेका चित्रपटात 7 – 8 गाण्यांपैकी 4 – 5 गाणी एकल गाणी म्हणून गायला मिळत असत. शिवाय अन्य गाण्यांतही ती असेच. मात्र ‘अमरदीप’ या चित्रपटाच्या वेळेस (1958-59) लता आणि सी. रामचंद्र यांचे व्यावसायिक संबंध बिघडून तिने इत:पर सी. रामचंद्र यांच्याकडे न गाण्याचे जाहीर केले. त्यामुळे साहजिकच प्रामुख्याने नायिकांची जी गाणी लता गात असे, ती आशा भोसले आणि अन्य गायिकांना मिळू लागली.
या ‘आंचल’ चित्रपटातील नायिकेची काही गाणी सुमन कल्याणपूर हिला मिळाली. तिचा आवाज लताच्या आवाजाशी बराच मिळताजुळता आहे. हे गाणं तसं या चित्रपटाचं शीर्षक गीत म्हणता येईल. हे चित्रपटात दोन-तीनदा तुकड्या तुकड्यांत चित्रित केलेलं आहे. याची ध्वनिमुद्रिका 78 ठझच च्या दोन भागांत निघालेली होती. एक भाग आनंदी आणि एक भाग दु:खी!
चित्रपटात या गाण्याचं महत्त्व काय आहे, ते दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर आणि कथालेखिका सुमती गुप्ते आणि पटकथाकार ग. दि. माडगूळकर यांनी संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांना समजावून सांगितलं.
खरं तर हे गाणं सी. रामचंद्र यांनी नेहमीची परिस्थिती असती तर लता मंगेशकरकडूनच गाऊन घेतलं असतं. पण तिच्याशी व्यावसायिकरीत्या बेबनाव झाला असल्यामुळे त्यांनी सुमन कल्याणपूर या लताच्या आवाजाशी साम्य असलेल्या परंतु नवोदित गायिकेकडून गाऊन घ्यायचं ठरवलं.
ही गोष्ट निर्माते वसंतराव जोगळेकर यांना तितकीशी पसंत नव्हती. पण त्यांचा सी. रामचंद्र यांच्या संगीत दिग्दर्शनावर विश्वास होता. ‘आंचल’ आधीच्या त्यांच्या ‘कारीगर’ (1958) या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन सी. रामचंद्र यांनीच केलं होतं. ते लोकप्रिय झालं नव्हतं तरी चांगलं संगीत होतं.
आपलं स्थान स्थिरावण्यासाठी धडपडणार्या सुमन कल्याणपूर हिच्या दृष्टीनं ही खूप मोठी संधी होती. स्वाभाविकच या संधीचं सोनं करायचं, असं तिनं ठरवलं असलं तर नवल नव्हे.
अण्णांना त्यांच्या चाली विशिष्ट पद्धतीनं गायल्या जाव्यात असं वाटत असे. ते स्वत: एक चांगले गायक असल्यामुळे त्यांना तान, हरकत, चाल कशा पद्धतीनं हवी ते वारंवार गाऊन दाखवत. पण सुमन कल्याणपूरनं कसून मेहनत केली आणि ते गाणं अण्णांच्या पसंतीला येईपर्यंत गायलं. स्वत: अण्णा, वसंतराव जोगळेकर, सुमती जोगळेकर सर्वच जण सुमन कल्याणपूरच्या गाण्यावर खूश झाले.
‘आंचल’मध्ये मोजकीच गाणी होती. त्यांच्या चाली चांगल्या होत्या. त्यातील दोन गाणी खूपच लोकप्रिय झाली.
त्यापैकी एक गाणं हे ‘सांवरिया रे अपनी मीरा को भूल न जाना’ हे सुमन कल्याणपूरनं गायलेलं गाणं होतं!
जाता जाता :
त्या वर्षीच्या ‘बिनाका गीतमाला’च्या कार्यक्रमात या चित्रपटातील एकही गाणं समाविष्ट होऊ शकलं नव्हतं.
सी. रामचंद्र आणि लताचे संबंध बिघडलेले नसते तर हे गाणं निश्चितच लता मंगेशकरने गायले असते. मात्र जरी हे गाणं लतानं गायलं नसलं तरी काही एका योगायोगाने दुरान्वये या गीताच्या दुसर्या आवृत्तीला लताचा स्वर लाभलाच!
1960च्या या ‘आंचल’ची पुनर्निर्मिती वसंतराव जोगळेकरांनी 1978-79च्या सुमारास मराठीत ‘जानकी’ या नावाने केली. या मराठी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन हृदयनाथ मंगेशकरनं केले.
आंचल’मध्ये ‘सांवरिया रे अपनी मीरा को भूल न जाना’ हे शीर्षक गीत होते; तर मराठीत ‘विसरू नको श्रीरामा मला’ हे शीर्षक गीत होते. ते सुधीर मोघे यांनी लिहिले होते. मराठीतील हे गीत लता मंगेशकर यांनी गायलं होतं. अशा तर्हेने हिंदीत ज्या गाण्याला लताचा स्वर लाभला असता तो मराठीत तरी लाभला.
गंमत :
‘आंचल’ हा वसंतराव जोगळेकर या मराठी निर्मात्याचा चित्रपट सी. रामचंद्र हे मराठी संगीत दिग्दर्शक. नायिका नंदा ही आणि एक चरित्र कलाकार. नाना पळशीकर हेसुद्धा मराठीच. यात या नानांच्या तोंडी एक भजन आहे. ते मराठी संगीत दिग्दर्शक, गायक सुधीर फडके यांनी गायले आहे. सुधीर फडके यांनी एकंदर 18 हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. त्यांत एखादं गाणं स्वत:च्या आवाजात असे. मात्र हिंदी चित्रपटात अन्य संगीत दिग्दर्शकाकडे ते कधी गायले नव्हते.
तो योग या चित्रपटात आला.
ते गाणं होतं – ‘तू हर एक मुसीबत का मुकाबला कर ले.’ मात्र हिंदीत अन्य संगीत दिग्दर्शकाकडे गायलेलं त्यांचं हे एकमात्र गाणं ठरलं.
‘जानकी’चे संगीत दिग्दर्शन जर सी. रामचंद्र यांनी केले असते तर ‘विसरू नको श्री रामा मला’ हे गाणं त्यांनी लताकडूनच गाऊन घेतले असते. कारण 1961 साली आलेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘स्त्री’ या चित्रपटाच्या वेळेसच लता आणि सी. रामचंद्र यांच्यांत समेट झाला आणि लता परत रामचंद्र यांच्याकडे गाऊ लागली. ‘आंचल’मध्ये अशोककुमार नायक होता. मराठी चित्रपटात तो पाहुणा कलाकार आहे. योगायोगाने ‘जानकी’च्या नायकाचे खरे नाव डॉ. श्रीराम लागू!
1954 साली आलेल्या ‘पहली तारीख’ चित्रपटातील ‘खूश हैं जमाना आज पहली तारीख हैं’ हे गाणं संगीत दिग्दर्शक सुधीर फडक्यांनी प्रथम सी. रामचंद्र यांच्याकडून गाऊन घ्यायचं ठरवलं होतं. कारण अशी विनोदी गणी गाण्यात सी. रामचंद्र यांचा हातखंडा होता. पण रामचंद्र यांच्याच सूचनेवरून ते गाणं फडक्यांनी किशोरकुमारकडून गाऊन घेतलं; मात्र तरीही आणखी 6 वर्षांनी आलेल्या ‘आंचल’ चित्रपटातील हे भक्तिगीत सी. रामचंद्र यांनी सुधीर फडक्यांकडून गाऊन घेतलं.
‘आंचल’ हेच शीर्षक असलेल्या आणखी एका हिंदी चित्रपटाची निर्मिती 1980 मध्ये झाली होती. त्यात राजेश खन्ना, राखी, रेखा आणि अमोल पालेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या आणि आर. डी. (पंचम)नं या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं होतं. हाही चित्रपट आर्थिकदृष्ट्या अयशस्वी झाला.
मोबाइल : 9820847692