दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
गणेशोत्सवाच्या काळात अनेक भाविक मुंबई आणि परिसरातील गणेशोत्सवांना भेटी देत असतात. शिवाय नवसाला पावणार्या गणरायाची आराधना करण्यासाठी अनेक तास रांगेत असतात. परिणामी घरी परतण्यासाठी वाहनांची उपलब्धता नसल्याने गणेशभक्तांचे हाल होतात. त्यामुळे १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंत लोकल रेल्वे २४ तास सुरू ठेवाव्यात तसेच कोकण हायवेवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने दोन अतिरिक्त रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यासंदर्भात आव्हाड रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले आहे. एरव्ही रात्री १ नंतर मुंबईतून कर्जत आणि कसार्याच्या दिशेने जाणार्या रेल्वेगाड्या बंद करण्यात येत असतात. या गाड्या पहाटे ४ च्या सुमारास सुरू होतात. त्यामुळे अनेक प्र्रवाशांची कुचंबणा होत असते. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमधील गणेशभक्त मुंबईत बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. रात्री उशिरानंतर त्यांचे परतीचे मार्ग रेल्वे बंद झाल्याने खुंटतात. हा भाविक वर्ग सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने जादा पैसे खर्च करून घरी परतणे त्यांच्यासाठी अवघड असते. परिणामी त्यांना रस्त्यावरच रात्र काढावी लागते. ही अडचण दूर करण्यासाठी कोलकात्यात नवरात्रोत्सवात ज्या पद्धतीने दिवस- रात्र रेल्वे सेवा सुरू ठेवतात. त्याच धर्तीवर मुंबई आणि उपनगरात सबंध रात्रभर रेल्वे वाहतूक सुरू ठेवावी, अशी मागणी केली असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.