दिनमान प्रतिनिधी
मुंबई।
घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची व जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची या रुफटॉप सोलर योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत असून, त्यांची राज्यातील संख्या 76,808 इतकी झाली आहे. त्यांच्याकडून एकूण 1,359 मेगावॉट इतकी विद्युत निर्मिती क्षमता गाठली गेली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
राज्यात पाच वर्षांपूर्वी 2016-17 या आर्थिक वर्षात केवळ 1,074 ग्राहक 20 मेगावॉट सौरऊर्जा रुफटॉप पद्धतीने निर्माण करत होते. गेल्या पाच वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली असून एकूण ग्राहकांची संख्या 76,808 झाली आहे, तर सौरऊर्जा निर्मितीची क्षमता 1,359 मेगावॉटवर पोहोचली आहे. 2021-22 या आधीच्या आर्थिक वर्षात राज्यातील रूफटॉप सोलर योजनेत सौरऊर्जा निर्मितीच्या बाबतीत एक हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला गेला. त्यानंतर चालू आर्थिक वर्षात एप्रिलपासून वाढत्या संख्येने ग्राहक सौरऊर्जा निर्मितीसाठी रुफटॉप सोलरला पसंती देत आहेत. गेल्या दहा महिन्यांत राज्यात घरावर सौरऊर्जा निर्मिती संच बसविणार्या ग्राहकांची संख्या 20,722 ने वाढली आहे तर या प्रकारची सौरऊर्जा निर्मिती क्षमता 331 मेगावॉटने वाढली आहे.
सौरऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांनी 3 किलोवॉट ते दहा किलोवॉटचे पॅनेल्स बसविले तर 20 टक्के अनुदान मिळते. घरगुती ग्राहकांना सुविधा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. तथापि औद्योगिक ग्राहकही रूफ टॉप सोलर पद्धतीने वीजनिर्मिती करीत आहेत. सौरऊर्जा निर्मितीसाठी पॅनेल बसवू इच्छिणार्या ग्राहकांना महावितरणच्या महाडिस्कॉम डॉट इन/ आयस्मार्ट या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा असतो. पॅनेल बसविणार्या एजन्सीसह सर्व बाबतीत महावितरणची मदत मिळते.
सौरऊर्जा निर्मितीसाठी रुफटॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे अनुदान मिळते. तीन किलोवॉटपर्यंत क्षमतेचे पॅनेल बसविण्यासाठी सुमारे 1 लाख 20 हजार खर्च येतो. त्यामध्ये अंदाजे 48,000 रुपये म्हणजे चाळीस टक्के अनुदान मिळते. त्यामुळे ग्राहकाला जवळपास 72,000 रुपये खर्च येतो. सौरऊर्जेतून निर्माण होणार्या विजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते.