दिनमान प्रतिनिधी
नवी मुंबई|
बतावणी करून महिला व ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणार्या टोळीतील एका भामट्याने एका दिवसात खारघर आणि तळोजा भागातील दोन महिलांजवळचे एक लाख ३५ हजार रुपये किमतीचे दागिने लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही घटना दुपारच्या सुमारास अवघ्या तासाभरात घडल्या आहेत.
खारघर सेक्टर १२ मध्ये राहणार्या अंजली पाटील (४८) या रविवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास गणपतीमूर्ती विक्रीच्या स्टॉलवर असताना एक भामटा त्यांच्या स्टॉलवर गेला. या वेळी त्याने गुप्तदान करण्यासाठी आल्याचे सांगून त्यांच्या दुकानातील लहान गणपती मूर्ती विकत घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याने एक फुलांचा हार बाहेर काढून अंजली पाटील यांना पैसे व त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी ही फुलांच्या हाराला लावण्यास सांगितले. त्यानंतर या भामट्याने अंजली पाटील यांची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी ५०० रुपयांच्या नोटेमध्ये गुंडाळून ते प्लास्टिक पिशवीत टाकण्याचा बहाणा केला. याच वेळी त्याने ५०० रुपये व सोन्याची साखळी हातचलाखी करून काढून घेतल्यानंतर तेथून पलायन केले. काही वेळानंतर त्यांना त्यांची सोन्याची साखळी लुबाडली गेल्याचे लक्षात आले.
या घटनेनंतर भामटा दुपारी दीडच्या सुमारास तळोजा फेज-१ सेक्टर-१४ या भागात चहाच्या टपरीवर गेला. या वेळी भामट्याने चहाची टपरी चालवणार्या मीना मंथराज (६३) यांच्याकडे गणेश मंदिराची विचारणा केली. त्यानंतर त्याने त्याच्याकडे असलेले पैसे त्याला मंदिरातील गरिबांना दान द्यायचे आहेत, असे सांगून खिशातून एक हजार रुपये काढले. मीना मंथराज यांना त्यावर मंगळसूत्र काढून ठेवण्यास सांगून ते प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवण्याचा बहाणा करून त्यांचे ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हातचलाखी करून काढून घेतले. त्यानंतर त्याने तेथून पलायन केले. काही वेळानंतर भामट्याने दागिने लुबाडून नेल्याचे मीना समंथरा यांच्या लक्षात आले.