डॉ.अरुंधती भालेराव | सुपर 50
न त्वहम् कामये राज्यम् न स्वर्गम् न पुनर्भवम्।
कामये दु:खतप्तानम् प्राणिनामार्तिनाशनम्॥
हे देवा मला राज्यही नको की स्वर्ग! पुनर्जन्म सुद्धा नको. मला फक्त दुःखी पीडित रुग्णांना बरे करण्याचे सामर्थ्य दे.
अशा प्रकारच्या विचारांची माणसे आज कलियुगात भेटली किंवा असली की खूप हिंमत वाटते. हे विचार आहेत वैद्य अलका गोरे – विषे यांचे. आयुष्याचे एक स्पष्ट उद्दिष्ट घेऊन जगणारी ही सखी! अलकाला भरभरून जगताना मी बघतेय. वैद्यक क्षेत्रातील तिचे शिक्षण असले तरी आपली संस्कृती, परंपरा जपताना प्रत्येक सण, उत्सव ती स्वतः तर आनंदाने करतेच; पण ती मुले, नवरा, कुटुंब, शेजारी, अवतीभोवती राहणार्या सगळ्या मंडळींना घेऊन धूमधडाक्यात साजरा करताना हा क्षण आताचा आपला आहे हे ती विसरत नाही. नकळत संस्कृतीची बीजे मुलांमध्ये, आजूबाजूच्या बाळगोपाळांमध्ये रुजवली जातात. तिची मुलं लहान असल्याने संस्काराच्या योग्य वयात आहेत. घर, व्यवसाय कुटुंब, हौसमौज यांचा उचित मेळ ती साधताना दिसते. वाढत्या जबाबदार्या, रोगराई, महामारी आणि एकूणच सणांचा कमी झालेला उत्साह या काळात अगदी प्रत्येक सण वेगळ्या पद्धतीने साजरा करून ती जगतानाचा आनंद आणि सकारात्मकता टिकवून ठेवते. कोविडच्या काळात घरात बंदिस्त असलेल्या वृद्ध लोकांना, रुग्णांना तिने बोलबाला न करता औषधं दिली आहेत. ‘हात माणुसकीचा’ या संस्थेबरोबर तिने कोविड काळात काम करताना स्वतःच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिला आहे. बारा वर्षांच्या तिच्या आयुर्वेद तपश्चर्येत तिने अनेक रुग्णांना बरे करताना खूप हिंमत दिली आहे. त्यांचे दुर्धर आजार बरे होतील, हा आशेचा किरण दाखवून तिने त्यांना जगताना बळ दिले आहे. चैतन्य वेलनेस क्लिनिक आणि स्वानंद वनसंपदा या नावांच्या तिच्या केंद्रांमधून ती सेवा देते. रुग्णाकडे पैसे नसले तर अनेक वेळा मोफत उपचारदेखील करते, हे वैशिष्ट्य! नवरात्रौत्सवातील तिचा सहभाग मोठा आहे. अष्टमीच्या दिवशी घरात स्वतः अन्न शिजवून ठाण्याच्या दुर्गेशेजारी एखाद्या चौकात गरजूंना अन्नदान करते. उत्सवाच्या दरम्यान मोफत स्त्रीरोग परीक्षण आणि औषध वाटप शिबिरात एक तज्ज्ञ वैद्य म्हणून अनेक वर्षे तिचा विनामूल्य सहभाग असायचा. रस्त्यावर फुगे विकणार्या, गरजू, रुद्राक्ष विकणार्या महिलांचे आजार पाहून त्यांना औषध देण्याचे काम ती करीत असे. तिला प्रपंच, नातेसंबंध ह्यांचे अचूक भान आहे. माहेरच्या गावची नाळ तुटू नये म्हणून ती महिन्यातून एकदा आयुर्वेद प्रचार व्हावा हा प्रांजळ उद्देश घेऊन सेलू येथे जाऊन औषधोपचार करते. सासरी शहापूर येथे पंधरा दिवसांतून एकदा जाऊन सासर, नातेवाईक यांना भेटता यावे, सहवासाने प्रेम वाढावे या भावनेतून तीही कसरत लहान मुलांना सांभाळून लीलया पेलते आणि सासर – माहेर असा समतोल साधताना स्वतःच्या आवडीनिवडी जपते. सामाजिक ज्वलंत प्रश्नांवर कधी सोशल मीडियावर बोलताना दिसते. औरंगाबादची असलेली अलका माझा मराठवाडा किती प्रेमळ, सोज्वळ हे मोठ्या अभिमानाने सांगताना भावुक होते. कोण काय म्हणेल? लोकांना आवडेल का? हा काही विचार न करता खड्या आवाजात फेसबुकवर बिनधास्त गाताना देखील दिसते. अशा स्वच्छंदी मनस्वी व्यक्ती अवतीभोवती असल्या की वातावरणात चैतन्य सहजच निर्माण होतं.
तिचं शालेय शिक्षण नूतन कन्या प्रशाला, सेलू इथे झाले. नूतन महाविद्यालय, सेलू येथे महाविद्यालयीन शिक्षण झाल्याचा तिला अभिमान आहे. संस्कारांची शिदोरी तिला त्या परिसरात मिळाल्याने आजही ती न चुकता आपल्या शाळा-महाविद्यालयांत जाऊन त्या वातावरणाचा संस्कारांचा आनंद घेऊन येते. तिचे पती अतिशय समंजस आणि उत्साही आहेत. ते भक्कमपणे तिच्या पाठीशी उभे आहेत. एकट्या लढणार्या अनेक मैत्रिणी अवतीभोवती आहेत. जिथे काम करण्याची मोकळीक देण्यापलीकडे घरातून कोणतेही प्रोत्साहन, कौतुक, सहकार्य मिळत नाही. पण अलकाच्या किंवा अलकासारख्या अनेक मैत्रिणींना जेव्हा घरातून खुद्द पतिदेवांकडून प्रोत्साहन, सहकार्य मिळते तेव्हा ती एकत्रित ऊर्जा घेऊन खूप छान काम करू शकते. यातून सहजीवनाचे समाधानदेखील मिळते.
अलकाचे वडील पेशाने वकील तर आई शेतात जाऊन स्वतः काम करतानाच कामगारांकडूनही काम करवून घेणारी एक कष्टाळू स्त्री आहे. वडिलांचा हजरजबाबीपणा, धीटपणा आणि आईची श्रम करण्याची चिकाटी याचा मेळ अलकामध्ये बघायला मिळतो. ती स्पष्ट बोलणारी असून मतांवर ठाम भासते. स्वतःच्या वैद्यकीय माहितीवर तिचा विश्वास आहे. शालेय-महाविद्यालयीन जीवनापासूनच तिला अभ्यासाबरोबर नृत्य, नाट्य, संगीत, खेळ, काव्यलेखन ह्याची आवड असल्याने तिने ते अजूनही प्राणपणाने जपले आहे. माहेरी असताना शेतात काम करणे, झाडे लावणे हे उत्साहाने करणारी अलका उत्साह आणि ऊर्जा ह्यांचा धबधबा आहे. गावाकडून मुंबईत आलेल्या या कन्येला भेटीची वेळ घेऊन घरी येणारी माणसं गावात आपुलकीने कुणी केव्हाही वेळ न घेता येतात. बिल्डिंग आणि त्यातले बंदिस्त फ्लॅट, कायम बंद असलेले दरवाजे सुरुवातीला अस्वस्थ करायचे. गावातील मुक्त वातावरणात वाढलेल्या लोकांना अशा वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. पण हळूहळू ती त्या वातावरणाशी एकरूप झाली आणि तिने स्वतःचं विश्व तिच्या लाघवी वागण्यातून निर्माण केलं.
मुंबईत आल्यानंतर ठाण्यात तिने प्रथम संजीवनी आयुर्वेद पंचकर्म हे चिकित्सालय सुरू केलं. त्या वेळी तिच्याकडे रुग्ण म्हणून आलेल्या श्रद्धा चुडनाईक ह्यांच्याशी तिची घनिष्ठ मैत्री झाली. त्या आजतागायत ढालीप्रमाणे तिच्या पाठीशी उभ्या आहेत. या व्यवसायामुळे खूप चांगली माणसं तिच्याबरोबर जोडली गेली. अनेक निपुत्रिक जोडप्यांच्या अस्वस्थ मानसिकतेला जपत योग्य औषधोपचार करून त्यांना संतती प्राप्तीचं सुख देणारी अलका मला साक्षात देवी वाटते. भक्ताने दुःख घेऊन यावे आणि देवीने उपाय, मार्ग दाखवून त्यांना प्रसन्न करून घरी पाठवणारी साक्षात आई जगदंबा! संततीसाठी प्रयत्न करणार्या एका तरी निपुत्रिक जोडप्यावर विनामूल्य औषधोपचार करावे, हा तिचा मानस आहे. प्रत्येक महिला ही आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सशक्त आणि सुरक्षित असली पाहिजे. तिचा समाजाबरोबर घरातही उचित सन्मान होणं गरजेचं आहे. समाजासमोर जी सखी खूप खंबीर दिसते ती तिच्या घरात तितकी खंबीर असेलच असे नसते किंवा तिला उचित सन्मान आणि स्थान मिळत असेलच, असे नाही. बाहेरील चित्र आणि आतली परिस्थिती ह्यात अनेक वेळा खूप तफावत अवतीभोवती दिसते. कारणे काहीही असो! त्यामुळे समाज आणि घर ह्या दोन्ही ठिकाणी तिच्या भावनांची कदर होऊन तिला सन्मानाने वागवले जाईल त्या वेळी महिला खर्या अर्थाने सुरक्षित असेल. तिच्या असण्याला आणि शिक्षणाला महत्त्व मिळेल. मग ती अर्थाजन करणारी असो किंवा नसो! अलकासारखा सन्मान समाजात आणि बाहेर प्रत्येक सखीला मिळो. अलका आपल्याला प्रेमळ कन्या, माता, सक्षम सहचारिणी अशा विविध भूमिका उत्तम रीतीने जगताना दिसते. तिच्याकडून आपल्याला जगतानाचे अनेक धडे सहज मिळून जातात. तिच्यासारखे कौटुंबिक वातावरण प्रत्येकीला मिळतेच, असे नाही. त्यामुळे स्त्री-पुरुष असा भेदभाव आणि पारंपरिक व्यवस्था ह्यांचा जेव्हा र्हास होईल तेव्हा स्त्री खर्या अर्थाने स्वतंत्र होऊन तिचा विकास होईल. अलकाच्या आयुष्यातील आनंद, तिची जिद्द, धडपड अशीच कायम असू दे. तिला उत्तुंग यश मिळताना ती इतर संख्यांची प्रेरणा होऊ दे, अशी आई दुर्गेला प्रार्थना!