दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
यंदाच्या गुढीपाडव्याला श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे आयोजित प्रथमच चार दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येईल.
संकल्प आरोग्याचा, संकल्प तृणधान्याचा, संकल्प राष्ट्रहिताचा व संकल्प नववर्षाचा अशी भारतीय संकल्पना यंदाच्या गुढीपाव्यानिमित्त ठाण्यात साकारली जाणार आहे. यंदा 22 मार्च रोजीच्या नववर्ष स्वागत यात्रेत 75 संस्थांचा सहभाग असेल. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक ज्ञास ही संस्था ठाणे शहरातील सांस्कृतिक चळवळीत कार्यरत असणारी संस्था असून, संस्थेच्या माध्यमातून गेल्या 21 वर्षांपासून चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. ठाणे शहरातील सर्वधर्मीय एकत्रितपणे येऊन अतिशय उत्साहात व जल्लोषात ही स्वागत यात्रा साजरी करतात.
हिंदू संस्कृती व परंपरा जतन करणारा हा भारतीय नववर्ष स्वागताचा सोहळा समजला जातो. दरवर्षीप्रमाणे स्वागत यात्रेत प्रबोधन करणारे सायकलस्वार, मल्लखांब, जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिके, ड्रम-झेंबे वादन, कसरती, महिला बाईक रॅली, प्रबोधन करणारे चित्ररथ दर्शन घडवणार आहेत. तसेच ठाणे महापालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण विभाग, पाणीपुरवठा विभाग प्रदूषण नियंत्रण कक्ष यांचा विशेष सहभाग असेल. यंदाच्या स्वागत यात्रेत जुपिटर रुग्णालयाचा वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणारा असून स्वागत यात्रेचे नियोजन करण्यासाठी आनंद विश्व गुरूकुल विद्यालय व एन. के. टी महाविद्यालयतर्फे 100 हून अधिक महाविद्यालय विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित असणार आहेत. तसेच बुधवारी म्हणजेच गुढीपाडवा दिवशी सकाळी ठीक 7 वाजता नववर्ष स्वागत यात्रेला प्रारंभ होणार आहे. सकाळी 6.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास वंदन करून 7 वाजता शी कौपिनेश्ववर मंदिरातून पालखीचे प्रस्थान होणार आहे. या स्वागत यात्रेत माजी खा.विनय शस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, खासदार राजन विचारे, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह अनेक नेते जण उपस्थित राहतील.
75 संस्थांचा, चित्ररथांचा सहभाग
देशाचे 75वे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने नववर्ष स्वागत यात्रेत 75 संस्थांचा व चित्ररथांचा सहभाग असेल. यावर्षी प्रख्यात स्पाईन सर्जन डॉ. इंगळहळळीकर हे स्वागताध्यक्ष असतील. तलाव पाळी येथे चार घाटांवर दीप उत्सवासाठी व गंगा आरतीसाठी 75 संस्थांचा आरतीत सहभाग असेल. यावर्षी दहावीबारावीची परीक्षा लवकर होत असल्याने काही शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा या नववर्ष स्वागत यात्रेत मोठा सहभाग असेल, असे न्यासाच्या कार्यवाह अश्विनी बापट यांनी सांगितले. यंदा नववर्ष स्वागत यात्रेचे 22 वे वर्ष आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असल्याने यंदा तेही या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत. दरवर्षी एकनाथ शिंदे नववर्ष स्वागत यात्रेला पंचांग पूजन आणि पालखीचे पहिले मानकरी असतात. यंदाही ते स्वतःहून सहभागी होतील.
- रविवार 19 मार्चला सायं. 6 ते 8 ठाण्यातील विविध नृत्यसंस्थांच्या विद्यार्थिनी व त्यांच्या नृत्यगुरू यांचा नृत्यधारा कार्यक्रम
- 20 मार्च रोजी गंधार भालेराव यांचे बासरीवादन, पं. मुकुंदराज देव यांच्या शिष्य परिवाराचे तबलावादन आणि पं. शैलेश भागवत यांचे सनईवादन होईल
- 21 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वा. गीतापठण, रुद्र व शिवमहिन्म स्तोत्रपठण होईल.
- सायं. 8.30 ते 10 या वेळेत इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचे ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान होईल
- हे सगळे कार्यक्रम कौपीनेश्वर मंदिराच्या प्रांगणात होतील.
- 21 मार्चच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव परिसरात दीपोत्सव