दिनमान प्रतिनिधी
कल्याण।
वाहन अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. वाहन अपघाताने अगणित व्यक्ती गंभीर जखमी, मुत्युमुखी पडत असतात. सरकार परिवहन प्रशासन यांच्याकडून वाहनचालकांनी वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पालन करावे, यारिता सुरक्षा सप्ताह व वाहनचालक, नागरिकांचे जागरूकता प्रशिक्षणाकरिता विविध उपक्रम राबविले जातात. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी, साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रमेश कल्लुरकर यांच्या निर्देशानुसार कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यक्षेत्रात रेल्वे स्टेशन व प्रमुख चौक येथे अपघाताने जीव गमावलेल्या व्यक्तींचा स्मरण दिन साजरा करण्यात आला.
या वेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वतीने वाहन तपासणीस निरीक्षक व सहा वाहन तपासणीस निरीक्षकांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रात स्टेशन परिसरात व विविध ठिकाणी रिक्षाचालक व वाहनचालकांना वाहन चालविताना काळजी घ्यावी व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे अशी शपथ देण्यात आली.
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी आरटीओच्या वाहनचालक जनजागृती मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले. शासनाने वाहतूक नियम विषय शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी मागणी केली. जेणेकरून शालेय जीवनातच वाहतुकीचक नियम व वाहन प्रशिक्षण जागरूकता निर्माण होईल, असे प्रणव पेणकर म्हणाले.
या प्रसंगी कल्याण आरटीओ मोटार वाहन निरीक्षक बालाजी बोदरवाड, साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूनम मोरे, साहाय्यक वाहन तपासणीस निरीक्षक विजय नरवाडे, प्रशांत सूर्यवंशी, रिक्षा टॅक्सीचालक-मालक असोसिएशन उपाध्यक्ष जितेंद्र पवार, सहसचिव आबा भसमारे, विभाग प्रमुख प्रताप सरोदे, मंडल पाटील, जगन्नाथ भागडे, वसंत वाघेला, अरविंद भोसले, कमलेश गायकवाड आदी पदाधिकारी व रिक्षाचालक उपस्थित होते.