आयुष्याच्या प्रवाहात अनेक गोष्टी घडतात. किंबहुना कठीण त्रासांच्या प्रसंगातून तावून-सुलाखून निघाल्यावर आयुष्य अधिक सक्षम बनते. सोन्याला भट्टीत घातल्यावर ते चमकते ना तसेच! पण त्रासदायक प्रसंगाला सामोरे गेल्यावर पुन्हा परत उठून उभे राहण्याच्या वेळेलाच पुनर्वसन म्हणतात. पुन्हा पहिल्यासारखे होण्याचा प्रयत्न. तो प्रयत्न व कुटुंबाची साथ ही गोष्ट प्रत्येकाने शिकून घ्यायला पाहिजे. पुनर्वसनाचे तंत्र आणि मंत्र ही खरंच एक अभ्यासाची गोष्ट आहे.
समीरची गोष्ट संध्या खूप घरातून दिसते आहे. पण त्याचे तात्पर्य वेगवेगळे निघते. कारण पुनर्वसनाची समज खूप कमी जणांकडे आहे.
समीर एका मोठ्या घरातील मुलगा. मोठा भाऊ आणि आईवडिलांसह सुखी-समाधानी चौकोनी कुटुंब. गुटखा, तंबाखू, सिगारेट, दारू अशा सार्या व्यसनांच्या स्वाधीन तो कधी झाला, हे त्याला व घरच्यांनाही कळले नाही.
नको त्या व्यसनांच्या प्रभावाने समीरचे हसरे-खेळते व्यक्तिमत्त्व पूर्णच बदलून गेले. 1) एकलकोंडेपणा, 2) चिडचिडेपणा, 3) रूममध्ये कडी लावून बसणे, 4) अभ्यासाकडे दुर्लक्ष, 5) घरातील पैसे उचलणे, 6) रात्री उशिरापर्यंत जागे राहाणे व दिवसा झोपणे, 7) घरच्यांना दुरुत्तरे व काही विचाराला गेले तर आक्रस्ताळेपणा करणे, 8) कॉलेजला जातो सांगून तिथे न जाणे यासार्या लहरींवर स्वार होऊन घरातले सारे जण भावनिकदृष्ट्या हतबल, निराश झाले.
तीन वेळा ‘नापास’चा शिक्का बसल्यावर पुढे शिकायला तयार नसलेला तरुण मुलगा, त्याचे दुर्दशा झालेले शरीर, हताश-तारवटलेले डोळे या सर्वच अवतारांनी आईवडील, जवळचे नातेवाईक खूप खचून गेले.
मुश्किलीने एक चांगला डॉक्टर मिळाला. मानसोपचारतज्ज्ञ व जनरल फिजिशियन यांच्या मदतीने समीरवर उपचार तर करण्यात आले, पण पुढची वाट अजूनही कठीण होती.
आजार बरा होण्यापेक्षा आजारातून बरे झाल्यावर सुरळीत आयुष्य सुरू करणे ही खूप महत्त्वाचे असते, हा कुटुंबीयांसाठी मोठाच वस्तुपाठ होता.
1) व्यसनांपासून दूर झाल्यावर पुन्हा त्या व्यसनांकडे समीर ओढला जाऊ नये, 2) तब्येतीच्या दुर्दशेतून त्याची सुटका व्हावी, 3) अभ्यासात लक्ष लागावे, 4) नातेसंबंध सुधारावे, 5) त्याने पूर्ववत हसरा-उमदा तरुण बनावे.
या माफक अपेक्षा घेऊन जेव्हा ते माझ्या दवाखान्यात आले तेव्हा हा वरवर दिसणारा हिमनग आतून किती मोठी जागा व्यापून आहे, हे नातेवाइकांना समजावून सांगितले.
पुनर्वसनाच्या पायर्या
1) हिलिंग – बरे होणार्या प्रक्रिया,
2) रिकव्हरी – पुन्हा पाहिले आरोग्य मिळवण्याचा टप्पा,
3) ट्रेनिंग – काही गोष्टींना जाणीवपूर्वक वळण लावणे,
4) रिहॅबिलिटेशन – पूर्णपणे पुनर्वसन
या टप्प्याटप्प्यानेच कोणतेही पुनर्वसन पुढे सरकते. या सर्व मार्गावर घडते काय?
1) हळूहळू जुने जाऊन नवीन बनण्याची प्रक्रिया, 2) शरीरातले बदल, 3) मानसिक धैर्य, 4) भावनिक सामर्थ्य, 5) बरे वाटण्याची आतून प्रक्रिया व हिंमत स्वीकार. या सार्यासाठी आवश्यक काय असते?
1) संकल्प : रुग्णाचा स्वतःचा मनाचा निश्चय व घरातल्यांचाही निर्धार
2) संयम : प्रचंड संयमाची या संपूर्ण कालावधीत अत्यंत गरज असते.
घरातल्या व्यक्तींनी रुग्णाच्या मनाला समजावून घेण्याचा संयम पाळायला हवा व त्याचे वेगळे प्रशिक्षण घ्यावे.
रुग्ण : मनाला सांभाळण्यासाठी खूप जास्त प्रेम (निरपेक्ष) आवश्यक असते.
त्या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी खूप संयम व त्यासाठी लागणारे धैर्य आवश्यक असते.
3) संवाद : परस्पर संवादातून खूप त्यासाठी रुग्णाला आपला विश्वास, आधार वाटला पाहिजे.
जुने पुसून टाकून पाटी कोरी करून नवीन लिहिले तरच हे साध्य होऊ शकते. समजूतदारपणाला पर्याय नाही.
बोलणे हे खोचक, बोचक जखमा करणारे तर कधी स्नेह-फुंकरीने जखमा भरणारेही असू शकते. भरत आलेली जखम परत चिघळू द्यायची नाही, हे कौशल्य शिकण्याची जिद्द हवी.
4) शरणागती : वेळ-काळ हा मोठा गुरू आहे. त्याला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या मनातील बरे होण्याच्या निकषांना अधीरतेने चौकटीत खेचू बघितले तर त्याने सार्याच गोष्टी बिघडू शकतात. ठरावीक वेळेपर्यंत पुनःपुन्हा प्रयत्न करीत राहणे हेच आवश्यक असते.
पुनर्वसन कोणाकोणाला आवश्यक असते?
1) अपघातानंतर, 2) न्यूरोलॉजिकल वातनाड्यांच्या आजारपणानंतर – उदाहरणार्थ पॅरालिसिस इत्यादी, 3) व्यसनमुक्तीनंतर, 4) एखाद्या मानसिक आघातानंतर उद्भवलेल्या आजारपणानंतर, 5) जवळची व्यक्ती गमावल्यानंतर येणार्या एकटेपणानंतरही, 6) मानसिक दुखणी-निराशा इत्यादी, 7) कुठल्याही आजारपणानंतर, ज्यात मनुष्याच्या क्षमतांवर परिणाम होतो, 8) नातेसंबंधातील दुरावा.
पुनर्वसनाची टीम
या पुनर्वसनाच्या प्रक्रियेत 1) स्वतः रुग्ण, 2) घरातल्या व्यक्ती, 3) आजूबाजूचा समाज, 4) डॉक्टर व त्यांची टीम, 5) कामावर पुन्हा जाऊ लागल्यावर तिथल्या व्यक्ती या सार्यांनाच सहभागी व्हावे लागते.
पुनर्वसनाचे तंत्र :
1) स्वीकार – रुग्णाने स्वतः व घरातल्यांनीही समस्या आहे व ती आपोआप बरी होणारी नाही याचा स्वीकार करणे खूप महत्त्वाचे आहे.
2) मदतीच्या वाटा शोधणे – समस्येवरचे सर्वात चांगले उपाय शोधून काढणे व मदत देणारे केंद्र वा व्यक्तीपर्यंत पोहोचणे खूप महत्त्वाचे असते. (योग्य वेळी – योग्य मदत)
3) त्रास दूर करणे (detox)
शिंरीर-मन-भावना यांच्यावर झालेल्या परिणामांना स्वच्छ धुवून घ्यायला लागते.
4) चांगले आयुष्य : बरे झाल्यावर पुन्हा आपले आयुष्य सुरळीत व्हावे, असे सर्वांनाच वाटत असते. पण या काळातील काही कष्ट घेणे जरूर असते आणि त्यातील सातत्य टिकवून ठेवावे.
5) कधी कधी संपूर्णपणे (नॉर्मल) स्वाभाविक क्षमता मिळतही नाहीत. त्यांचाही स्वीकार करून त्यात उत्कृष्टपणा मिळवण्याचा प्रयत्न करावा.
6) नवे आयुष्य : नव्या वाटा – कधी कधी हाती आलेल्या पत्त्यांतूनच नवीन डाव खेळावा लागतो. त्याला मान्यता देऊन आयुष्याची आखणी नव्या पद्धतीने करून घ्यावी.
7) पुन्हा आजारातून बाहेर येऊन त्याच आजाराच्या दलदलीत गटांगळ्या खाणे टाळावे.
8) पुनर्वसनाचा काळ हा विशेषतः रुग्णाला व घरच्या लोकांनाही आत्मपरीक्षणाचा काळ असावा, आत्मनिंदेचा नव्हे.
पुनर्वसन ही एक संधी आहे. राखेतून पुन्हा उभे राहून आयुष्य जगणार्या फिनिक्स पक्ष्यासारखी. त्याचा मान ठेवलाच पाहिजे.
पुनर्वसन तंत्र 1)
बरे झाल्यावरचा टप्पा शुद्धीकरणाचा असावा. उदाहरणार्थ स्पोर्ट्स इन्ज्युरी किंवा खेळांडूनी दुखापतीनंतर बरे झाल्यावर बस्तीसारख्या पंचकमाचा विचार करावा. हाडांना बळकटी देणार्या या ‘शोधना’मुळे ताकद वाढायला मदत होते. पक्षाघात (पॅरालिसिस)सारख्या आजारांतही याचा चांगला उपयोग होतो.
2) रिकव्हरी तंत्र :
विश्रांती व पुनवर्सन यांचा जवळचा संबंध आहे. मसाज, शिरोधारा इत्यादीमुळे भावनिक आरोग्यही खुलते.
3) आहाराला पर्याय नाही.
शरीर-मनाच्या जडणघडणीत योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. आपल्या तज्ज्ञांकडून आपल्या आजारांतून बरे होण्यासाठी योग्य आहार समजावून घ्यावा.
4) व्यायाम महत्त्वपूर्ण :
तज्ज्ञांकडून व्यायामाचे तंत्र जाणून घेतले तर मांसपेशी, चेतासंस्था व मन-भावनांचेही ट्रेनिंग होते, जे पुनर्वसनासाठी खूप आवश्यक असते.
5) योग प्राणायाम : मनोधैर्य वाढवायला उपयोगी पडते.
6) पुनर्वसनानंतर मुख्य आव्हान असते ते समाजाने स्वीकारणे व पुन्हा आपल्या आयुष्य प्रवाहात येणे. त्यासाठी घरातल्या व्यक्तींना शिक्षित करणे खूप महत्त्वाचे असते. हा टप्पा सगळ्यांसाठीच परीक्षेचा असतो. अभ्यासाने पुनःपुन्हा करीत राहिल्याने काहीच अवघड नाही, हे मनावर ठसले पाहिजे.
अपघातात दोन्ही पाय गमावल्यानंतरही एखादी महिला पुन्हा विमान उडवू शकते किंवा एखादी व्यक्ती एव्हरेस्ट सर करू शकते, हा विश्वास देणार्या कथाही चमत्कार घडवू शकतात. आत्मविश्वास पुन्हा मिळवणे हेच पुनवर्सन यशाचे खरे गमक आहे.
शून्यातून पुन्हा विश्व
घडवता येतेच
आपल्यातल्या ‘मी’ला..
हरण्याची किंमत समजते
जिंकण्यापेक्षाही अस्तित्वाचे
टिकणे तितकेच महत्त्वाचे असते
रिकामे झालेले पुन्हा भरतेच
आशेला जागवत ठेवावे लागते
आयुष्य अमूल्य आहे
जाणिवेचा अंतर्दीप तेेववावा इतकेच!