दिनमान प्रतिनिधी
कल्याण।
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ग्रामीण अ प्रभाग क्षेत्रातील अटाळी प्रभागातील बाल उघानाची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने तसेच सुरक्षारक्षकाअभावी राम भरोसे कारभाराचा फटका या बाल उघानाला बसत आहे.
आंबिवली गावठाण प्रभागातील अटाळी परिसरात समायोजित आरक्षित भूखंडावर सुमारे सव्वाआठ गुंठे जागेत वॉल कम्पाउंडसह घसरगुंडी, झोपाळे, सी सॉ, मिनी बगिचासह 2021 साली सुमारे 20 लाख रुपये निधीतून बाल उद्यानाचे काम करण्यात आले. आंबिवली पश्चिम परिसरात या एकमेव बाल उद्यानास चिमकुल्यांसह पालकांची चांगलीच पसंती मिळाली. परंतु उद्यानाची देखभाल-दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने वाट लागण्यास सुरुवात झाली आहे. दुरुस्तीअभावी खेळणी गंजून भंगार होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे बच्चेकंपनीचा हिरमोड होत आहे. सुरक्षारक्षक नसल्याने या उद्यानातील साहित्य चोरीला जाण्याची शक्यता आहे.
गेली अडीच वर्षे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दशरथ तरे यांनी स्वतः 8 हजार रुपये मासिक पगारावर सुरक्षारक्षक नेमला होता, परंतु आता आर्थिकदृष्ट्या त्यांना परवडत नसल्याने याबाबत त्यांनी प्रशासनाला पत्र देत उघानाची देखभाल-दुरुस्ती तसेच सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली आहे. तसेच प्रशासानाचे या बाल उद्यानाकडे का दुर्लक्ष होत आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला आहे.