ग्रंथाविश्व | अस्मिता प्रदीप येंडे
जन्म आणि मृत्यू या दोन बिंदुंमधील अंतर म्हणजे आयुष्य. आपण कोठे आणि कुणाच्या पोटी जन्म घ्यावा, हे आपण ठरवू शकत नाही पण मिळालेलं आयुष्य सार्थकी कसे लावावे, जीवन कसे जगावं, हे नक्कीच आपल्या हातात असते. मानवी देह हा नश्वर आहे, पण त्या व्यक्तीने निर्माण केलेल्या आठवणीं ह्या चिरंतन राहतात. स्मरणशक्ती ही मानवाला लाभलेली दैवी देणगी आहे. जीवनातील अनेक घटना, प्रसंग, सुख- दुःखाच्या आठवणीमध्ये माणूस रमत असतो. या स्मरणशक्तीमुळेच माणूस भूतकाळात रमत जातो आणि त्यात अडकत जातो.
प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे स्थान हे महत्त्वपूर्ण आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ असे म्हटले जाते. आईशिवाय जीवनाची कल्पना सुद्धा करायला मन धजत नाही. हो ना! आईच्या नंतर मुलांवर माया करणारी स्त्री म्हणजे आईची बहीण मावशी. आपल्या मुलांप्रमाणे आपल्या बहिणीच्या मुलांवर भरभरून माया करते, प्रेम देते. आईवर अनेक काव्य रचली गेली. पुस्तके लिहिली गेली. ‘श्यामची आई’ हे पुस्तक सर्वश्रुत आहे. अनेक लेखक, कवींनी आपल्या लेखणीतून आईची विविध रूपं अधोरेखित केली आहेत. पण मावशीवर असे काही लेखन वाचनात आलेले स्मरत नाही. अपवादही असू शकतात. लेखक सुनील पांडे यांनी आपल्या आईस्वरूप मावशीच्या आठवणींना शब्दरूप देऊन पुस्तकरुपात तिच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. ‘माय ही जगो नि मावशीही जगो’ ही कादंबरी तारा मावशीच्या खड़तर आयुष्याची साक्ष देणारी आहे. अनेकदा असे होते, घरातील स्त्रीचे जगणं, तिचा त्याग हा दुर्लक्षित राहतो. पण तिच्या त्या त्यागामुळे कुटुंबाचं जगणं सुकर होत असतं, याची जाणीव करून देणारी ही कादंबरी आहे. ओघवती आणि प्रवाही लेखनशैली, प्रथमपुरुषी निवेदनशैली, वर्तमानकाळ ते भूतकाळ-वर्तमानकाळ अशा फ्लैशबैक तंत्राचा अगदी सुयोग्य वापर लेखकाने केलेला आहे. हे पुस्तक लिहिताना लेखकाची मन:स्थिती काय असेल याची कल्पना करणं ही कठीण. कारण ज्या मावशीने आपल्यावर एवढी माया केली, तिच्या आजारपणात घेतलेली तिची भेट, त्या आठवणी अचानक तिच्या निधनानंतर लिहिताना लेखकाच्या संवेदनशील मनाचा बांध नक्कीच फुटला असणार. ज्या व्यक्तीवर आपण जीव लावतो, त्या व्यक्तीचं आपल्या जीवनातून अचानक निघून जाणं, याची कल्पनाही मनाला करता येत नाही. वास्तव स्विकारता येत नाही. पण सत्य स्विकारून आपलं आयुष्य प्रवाही ठेवावे लागते, हेच खरे.
कादंबरीच्या सुरुवातीलाच तारा मावशीच्या निधनाची बातमी संवादातून समजते आणि मन विषण्ण होते. दिवाळीचे आनंदाचे दिवस. भाऊबीज आणि पाडवा हे सण साजरे करून तारा मावशी सगळ्यांना प्रेम देऊन आपल्या पुढील प्रवासाला निघून जाते आणि घरातील सगळे या अचानक आलेल्या प्रसंगाने शोकसागरात बुडून जातात. अंत्यविधी ते दशक्रियाविधी या कालावधीत लेखकाने तारा मावशीच्या आठवणींना शब्दबद्ध केल्या आहेत. पुस्तकाच्या प्रत्येक पानावर दिलेले मावशी आणि मायचं रेखाचित्र आठवणींचे मोहोळ उठवतं.
या कादंबरीतून तारा मावशींचा एकूणच जीवनप्रवास लेखकाने मांडला आहे. पुस्तकातील विविध प्रसंगातून तारा मावशीची प्रचंड इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, प्रेमळ, मायाळू, सगळ्यांवर माया करणारी अशी ही तारा मावशी खरेच मोठ्या मनाच्या होत्या. लग्नानंतर स्वतःला मूल नाही म्हणून पतीला दुसरे लग्न करण्यास सांगून एकाच घरात आपल्या सवतीसोबत सुखाने संसार केला. आपल्या सवतीच्या मुलांवर पोटच्या मुलांप्रमाणे जीव लावला. या प्रसंगातून तारा मावशी मधील वात्सल्यमूर्ती, तिचे मातृत्व पदोपदी जाणवतं. आपल्या सवतीसोबत करणं ही अशक्य गोष्ट पण तारा मावशी सवतीसोबत बहिणीप्रमाणे राहिल्या. त्या दोघींमधील आपलेपणा, सहज स्वीकारवृत्ती आणि निर्मळ मन यामुळे त्यांचे फुलत गेलेले नाते वाचायला हवे.
मावशीचं सततचे आजारपण, शरीर कृष झालेलं, काही वर्षापूर्वी जीवघेण्या अपघातांमुळे हाताला झालेली खोल जखम. हे सगळे घाव ती धीटपणे सोसत राहिली. मध्येच ह्रदयविकाराच्या त्रासामुळे गोळ्या-औषधे सुरू होती. वीस वर्षे ह्या गोळ्या सुरू होत्या. इतके आघात होऊनही तारा मावशी आपल्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे, सकारात्मकतेमुळे जीवन जगल्या. कधीही मनात निराशा आणू दिली नाही. सोशिक वृत्तिने जगत राहिली आणि इतरांना प्रेम देत राहिली.
तारा मावशीच्या अचानक जाण्याने सगळ्यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. लेखकाने आपल्या मनातील भाव नेमकेपणाने कुठेही वाहवत न जाता मांडल्या आहेत. ही कादंबरी म्हणजे तारा मावशीला वाहिलेली खरी शब्दसुमनांजली आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, ‘माय मरो नि मावशी जगो’ पण लेखक म्हणतात की, ‘मायही जगो नि मावशी ही जगो’. हे म्हणण्यामागे लेखकाची नेमकी भावना काय आहे, हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी!
मायही जगो नि मावशीही जगो
कादंबरी
सुनील पांडे
स्नेहवर्धन प्रकाशन
मूल्य – 180 रुपये