दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
डोंगरमाथ्यावर अथवा डोेंगरपायथ्याशी राहणार्या मुंब्रा परिसरातील झोपडी, चाळींतील नागरिकांनी पावसाळापूर्व घरे रिकामी करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.
महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक जाहीर सूचना वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केली आहे. यामध्ये आपण राहत असलेल्या डोंगर उताराच्या पायथ्याशी अथवा सखल भागात असलेल्या झोपड्या किंवा घरे तसेच नाले व गटारांच्या आसपासच्या वस्तीचा वापर तात्काळ बंद करावा. अन्यथा, पावसाळ्यात दरड कोसळून व नाले तुडुंब भरून वाहून जीवित व वित्तहानी झाल्यास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल. ठाणे महापालिका यासाठी जबाबदार राहणार नाही, असे सूचित केले आहे.
मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील भौगोलिक रचना पाहता मुंब्रा बायपास रोडपासून ते मुंब्रा रस्त्यापर्यंत डोंगराळ भागाचा परिसर आहे. मुख्यत्वे दाटीवाटीच्या झोपड्यांनी व्याप्त असा हा परिसर आहे. प्रत्येक चाळीची लेव्हल ही मुख्य रस्त्यापासून ते बायपास रस्त्यापर्यंत टप्याटप्याने उंचवट्या भागावर वाढत जाते. या चाळीत येणारे रस्ते अरुंद असून त्याचप्रमाणे दरवर्षीचा अनुभव पाहता पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास मुंब्रा बायपास रोडपासून पाण्याचा येणारा प्रवाह बर्याच ठिकाणचा उंचवट्या भागाचा भरणीचा परिसर हा भूस्खलन होऊन खचला जातो. त्यामुळे या झोपड्या व खोली किंवा चाळी यांना अतिशय धोका निर्माण होतो. त्या ठिकाणी आणीबाणीच्या परिस्थितीत दाटीवाटीचा परिसर असल्याने अग्निशमन केंद्राची मदत पोहोचण्यास देखील विलंब होतो, याकडेही महापालिका प्रशासनाने लक्ष वेधले आहे.
दरडग्रस्त भागात राहणार्या मुंब्रा परिसरातील नागरिकांनी आपल्या जिविताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपण अन्यत्र राहावे, इतरत्र सुरक्षित निवासाचा पर्याय शोधावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.