दिनमान प्रतिनिधी
विरार|
डोंबिवली येथे वसईतील मच्छीमार महिलांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ सोमवारी वसई तहसीलदार कार्यालयावर मच्छिमार महिलांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वसई जनरल लेबर युनियनमार्फत आयोजित सदर मोर्चा मध्ये सर्व मच्छीमार संघटना राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सामील झाले होते.
अधिक माहितीनुसार, वसईतील मच्छीमार महिला कल्याण डोंबिवली, ठाणे, पनवेल, बदलापूर, गणेशपुरी, वज्रेश्वरी, अंबाडी इतरत्र मासळी विकण्यासाठी अनेक वर्षापासून जातात. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. मात्र मागील काही दिवसांपासून डोंबीवली येथे मासळी व्यवसाय करणार्या वसई तील महिलांना मज्जाव केला जात आहे. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले, तसेच त्यांच्या मासळी मधे फिनाईल, अॅसीड टाकून नुकसान केले जाते. डोंबिवलीतील मच्छीमार महिलांच्या या दुष्कृत्या विरोधात वसईत संतप्त वातावरण आहे. तरीही आज स्थितीत वसईतील मच्छिमार महिला या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी असुरक्षित आहेत. यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या वादामुळे सदर मच्छीमार महिलांना या भागात व्यवसाय करणे कठिण झाले आहे. डोंबिवली भागातील मच्छिमार महिलांनी वसईतील मच्छीमार महिलांना केलेल्या मारहाणीच्या अनेक तक्रारी तेथील पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत तरीही सदर बाबत पीडित मच्छीमार महिलांना न्याय मिळालेला नाही. याप्रकरणी मच्छिमार महिलांकरता अभिलाषा वर्तक या सामाजिक कार्यकर्त्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले.