दिनमान प्रतिनिधी
ठाणे ।
शहरातील मुख्य रस्त्यांवरील उड्डाणपूल, संरक्षक भिंती आणि चौकांत विविध संकल्पनेतून रंगरंगोटीच्या माध्यमातून सुशोभीकरणाची कामे धडाक्यात सुरू असतानाच दुसरीकडे पालिकेच्या परवानगीसह शहरातील चौक आणि रस्त्यांलगत उभारलेल्या फलकांच्या अतिरेकामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अशा फलकबाजीला रोखण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात जाहिरात विभागाचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार असला तरी जाहिरात फलकांच्या अतिरेकामुळे शहराचे विद्रूपीकरण होणार नाही, याकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाकाळापासून ठाणे महापालिकेच्या जमा-खर्चाचे गणित बिघडले असून, ही परिस्थिती आजही कायम आहे. ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराची अपेक्षित कर वसुली होत असून यंदा 599 कोटी 73 लाखांची आतापर्यंत करवसुली झाली आहे. 31 मार्चपर्यंत 677 कोटी 27 लाख रुपये इतकी करवसुली होईल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर पालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी या उद्देशातून जाहीरात विभागाकडून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यात शौचालय उभारणी, उद्यान विकसित करणे या बद्दल्यात जाहीरात हक्क देणे अशा योजनांचा समावेश आहे. याशिवाय, फिरते जाहीरात वाहने अशी योजनाही पालिकेने राबविली होती. या अंतर्गत शहरातील चौक व रस्त्यांलगत मोठे जाहिरात फलक उभारण्यात आले असून महामार्गालगत फिरती जाहीरात वाहने उभी करून ठेवण्यात आली आहेत.
शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांमध्येही जाहीरात फलक उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी फलकांचा अतिरेकपणा झाला असून यामुळे त्या भागाचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येते. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अशा फलकबाजीला रोखण्यासाठी पाऊले उचलण्यात येणार असल्याचे संकेत नुकतेच दिले आहेत.
ठाणे महापालिकेच्या विविध योजनांतर्गत ठेकेदारांनी शहरात उभारलेल्या फलकांवर जाहिराती लावण्यात येत असून, त्या जाहिरातींपोटी पालिका ठेकेदारांकडून शुल्क आकारते. त्यापोटी 2020-21 या वर्षात पालिकेला 77 कोटी 3 लाख रुपये, तर 2021-22 या वर्षात 61 कोटी 3 लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. परंतु कोरोनाकाळात जाहिरात विभागामार्फत देण्यात आलेल्या सवलतींमुळे या विभागाच्या उत्पन्नात घट झालेली असतानाच यंदाच्या वर्षीही या विभागाचे उत्पन्न घटले आहे. गेल्यावर्षी 22 कोटी 37 लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. परंतु यंदा 8 कोटी 15 लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. यंदाच्या वर्षी 14 कोटी 38 लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असले तरी या जाहिरातबाजीच्या अतिरेकामुळे शहराचे विद्रूपीकरण होणार नाही, याकडे लक्ष देणार असल्याचे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले आहे.