दिनमान प्रतिनिधी
विरार।
वसई- विरार शहर महापालिकेने यंदा केवळ 176 फटाके स्टॉलना परवानगी दिली आहे. मात्र शहरात ठिकठिकाणी फटाके स्टॉल लागलेले दिसत आहेत. यात बहुतेक फटाके स्टॉल अनधिकृत आहेत. याबाबत नायगाव पोलिसांनी 7 अवैध फटाके स्टॉलधारकांना नोटिसा देत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
फटाके स्टॉलसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाची रीतसर परवानगी लागते. यंदा केवळ 176 फटाके स्टॉलना महापालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभागाने परवानगी दिली आहे. मात्र बर्याच विकेत्यांनी अशी परवानगी न घेता फटाके विक्रीचे स्टॉल लावल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. शिवाय यंदाच्या दीपोत्सवात संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजताच फटाके फोडण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. मात्र हे नियम वसईकरांकडून पायदळी तुडवले गेल्याचे दिसून आले.
याच धर्तीवर नायगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी अवैध फटाके स्टॉलधारकांवर अधिकारी व कर्मचार्यांना कारवाईचे आदेश दिले.
या कारवाईत एकूण 7 फटाके स्टॉलधारकांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा स्वरूपाची कारवाई करणारे नायगाव हे सध्याचे आघाडीवर राहिलेेले पोलिस ठाणे आहे.