दिनमान प्रतिनिधी
विरार।
वसई विरार महानगरपालिकेने शासनाच्या सुंदर शहर स्पर्ध्येत भाग घेतला असून, त्यानिमित्ताने शहरातील रस्ते, चौक यांचे सुशोभीकरण हाती घेतले आहे. यातीलच पुढचा टप्पा हा बस थांबे सुशोभीकरणाचा आहे. पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या कल्पनेला मात्र शहरात असलेल्या बस थांब्यापुढील अनधिकृत रिक्षा थांबे आणि पार्किंगचा अढथळा येत आहे. यामुळे पालिका आणि वाहतूक विभाग हा अढथळा दूर करणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
वसई विरार महापालिकेने रस्ता दुभाजकांवर मस्त चित्रे काढली असून, रस्त्याकडेच्या झाडांभोवती कुंपण घालून त्यावर वेगवेगळी चित्रे काढून शहर स्वच्छतेचे संदेश दिले आहेत. त्यापुढे आता परिवहन सेवेचे थांबेही सुशोभित करण्याचा मानस आयुक्त अनिलकुमार पवार यांनी व्यक्त केला होता. परंतु त्यांच्या ह्या कल्पनेला अनधिकृत रिक्षा थांबे आणि पार्किंगने अडथळा उभा केला आहे.
वसई विरार महापालिकेच्या परिवहन बससेवेसाठी बनविलेल्या बस थांब्यांपैकी काही दिसेनासे झालेले आहेत. या बस थांब्याच्या समोर काही ठिकाणी अनधिकृत रिक्षा थांबे अथवा पार्किंग करण्यात येत आहे. त्यामुळे या बस थांब्यांचा प्रवाशांना काहीही उपयोग होत नसून, त्यांची जागा बदलावी अथवा या अनधिकृत पार्किंग आणि रिक्षा थांब्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असली तरी वाहतूक पोलिस आणि पालिकेकडून कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे परिवहनच्या बस थांब्यांचे सुशोभीकरण कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बस थांब्यांच्या समोर अनधिकृतपणे रिक्षा थांबे आणि पार्किंग झाले असून, वाहतूक शाखेला ते हटविण्यासाठी पत्र दिले आहे. त्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे
– अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका