दिनमान प्रतिनिधी
मुंबई।
साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाले असून, यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी आणि गुजरातचे प्रभावी नेते, मानवी हक्क कार्यकर्ता आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांची निवड झाली आहे. सोबतच ‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी चित्रकार राजू बाविस्कर यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार जाहीर झाला आहे. दया पवार स्मृती पुरस्काराचे यंदाचे पंचविसावे वर्ष असून, प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे शुक्रवार, 27 ऑक्टोबर रोजी सायं. 6 वाजता ज्येष्ठ संपादक व खासदार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली दया पवार स्मृती पुरस्कारांचे वितरण होईल. या वेळी कवी- अभिनेता अक्षय शिंपी यांचे कथाकथन व झुंडफेम विपीन तातड व माहीजी या रॅप क्षेत्रात सध्या धुमाकूळ घालणार्या कलाकारांचे रॅप सादर होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अलका धुपकर करणार आहेत.
दया पवार स्मृती पुरस्कारांच्या यंदाच्या मानकर्यांपैकी एक डॉ. गणेश देवी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहेत. राष्ट्रीय किंवा राजभाषा म्हणून मान्यता नसलेल्या चाळीस भाषांना त्यांनी नवी ओळख मिळवून दिली. दया पवार स्मृती पुरस्काराचे दुसरे मानकरी जिग्नेश मेवाणी गुजरातमधील प्रभावी नेते व मानवी हक्क कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. मेवाणींनी मुंबईतून गुजराती भाषेतील वृत्तपत्र अभियानसाठी तीन वर्षे पत्रकारिता केली होती.
यंदाच्या चौथ्या ‘बलुतं’ पुरस्कारासाठी आत्मचरित्रासाठी राजू बाविस्कर यांची निवड करण्यात आली आहे. चित्रकार राजू बाविस्कर हे अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे मुखपृष्ठकार म्हणून मराठी साहित्याला परिचित आहेत. राजू बाविस्करांची चित्रे ही कॅनव्हासच्या माध्यमातूनसमाजातील वंचित, शोषितांचे जीवन आपल्यासमोर मांडतात.
दया पवार प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत पवार यांनी सांगितले की, दया पवार स्मृती पुरस्काराचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. सलग 25 वर्षे एखादी कृती सुरू ठेवणे हे आजच्या काळात सोपे नाही, मात्र प्रत्येक कार्यक्रमाला वाढत जाणारे जुन्या पिढीतले आणि नव्याने जोडले जाणारे दया पवारांचे तरुण चाहते या एकमेव गोष्टीमुळे दया पवार प्रतिष्ठानला हा कार्यक्रम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळत असते.