दिनमान प्रतिनिधी
कल्याण।
आजच्या मोबाइल युगात मैदानी खेळ हरवत चालले आहेत. याच मैदानी खेळांतील जिल्हास्तरीय लंगडी स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली.
लंगडी असोसिएशनतर्फे कल्याण पूर्वेतील नेतिवली मैदानावर 14 वर्षांखालील मुले व मुली आणि खुल्या गटातील पुरुष व महिला यांच्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. यातून निवडला जाणारा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेत एकूण 25 संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलींच्या गटात सिद्धार्थ विद्या मंदीर माध्यमिक संघाने विजेतेपद तर प्रबोधनकार ठाकरे विद्यालयाने उपविजेतेपद पटकावले. 14 वर्षांखालील मुलांच्या गटात चंद्रकांत पाटकर विद्यालयाने विजेतेपद तर सिद्धार्थ विद्या मंदिरने उपविजेतेपद पटकावले. खुल्या गटातील पुरुषांच्या संघात विश्वास विद्यालयाने विजेतेपद तर जाणता राजा कला क्रीडा प्रतिष्ठानने उपविजेतेपद पटकावले. कार्याध्यक्ष अविनाश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिव प्रवीण खाडे यांच्या नियोजनाखाली स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन तिसाई विद्यालयाचे मुख्याध्यापक दशरथ म्हात्रे, प्रबोधनकार ठाकरे शाळेच्या मुख्याध्यापिका नीलम वेखंडे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेसाठी त्रिदल एज्युकेशन सोसायटीचे सुदर्शन पाटील, जितेंद्र कुळथे, भारती कोळेकर, निर्मला वाघ, शुभदा देसाई, स्मिता विचारे, राकेश मोरे उपस्थित होते.
मुलींच्या गटात चंद्रकांत पाटकर विद्यालयाची बाजी
मुलींच्या गटात चंद्रकांत पाटकर विद्यालयाने विजेतेपद तर सिद्धार्थ विद्या मंदिरने उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेत पंच म्हणून मिलिंद धंबा, सुशांत सोनवणे, वैभव मुंढे, साहील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जयश्री चौधरी, रेवती पाडले, कोमल पवार, दीपिका फुलोरे, अभिषेक मढवी, दर्शन चिकणकर, आकाश म्हात्रे यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.