काळ बदलतो तसा माणूस बदलतो, तशी संस्कृतीही बदलत जाते. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला. तो उद्देश आता राहिला नाही. कारण स्वातंत्र्यपूर्व काळातील गरज स्वातंत्र्यानंतर संपून गेली. त्यामुळे आपल्याला गणेशोत्सव बदलत गेलेला दिसतो. ते स्वाभाविक आहे. भक्तीपेक्षा शक्तिप्रदर्शन वाढले आहे. गर्दी वाढवण्यासाठी सार्वजनिक मंडळे तरुणांना आकर्षित करणारे कार्यक्रम ठेवतात. देवभक्तीपर, अभंग, राष्ट्रीय कीर्तने असे कार्यक्रम हल्ली दिसत नाहीत. तरुणांना त्यांच्या आवडीप्रमाणे सर्वकाही प्रचंड प्रमाणात करायचे आहे. मूर्तीचा आकार, मंडप, सजावट खर्च, देखावे यात खूपच फरक पडला आहे. पूर्वी देशभक्तीपर देखावे देवादिकांच्या गोष्टींचे देखावे केले जात. आता तसे देखावे मंडपामध्ये फारच कमी दिसतात. बर्याच ठिकाणी तरुण कार्यकर्त्यांची ऊर्जा चुकीच्या गोष्टींकडे लावली जाते.
आज श्री गणेशाचे आगमन घरोघरी होत असून, या मंगलमय वातावरणात अनेकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कोरोनाच्या सावटाखाली गेली तीन वर्षे मुक्तपणे गणेशोस्तव साजरा करता आला नव्हता. तूर्तास कसल्याही साथरोगाची भीती नसल्याने या साचलेल्या आनंदाला उधाण आले आहे. आपण तसे खूपच उत्सवप्रिय आहोत. अनेक सण-उत्सव खूप आनंदात साजरे करतो. पण गेल्या काही वर्षांत उत्सव साजरे करण्याची आपली पद्धत बदलत चालली आहे. अर्थातच आनंद मिळवण्याची व्याख्याही बदलली आहे. मूळ परंपरा आणि त्यांचे पावित्र्य जपण्याचे भान यामध्ये अनेकदा सुटत चालले आहे, हे लक्षात येत नाही. स्वातंत्र्याच्या चळवळीला बळकटी येण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. सर्व जातीपाती, गरीब-श्रीमंत असे भेद विसरून लोक संघटित होऊ लागले. लोकमान्यांच्या प्रयत्नांना पाहिजे तसे यश मिळाले. नुसते एकत्र येऊन भागणार नव्हते. त्याबरोबर समाजात ठोस विचार रुजणे गरजेचे होते. त्यासाठी नेत्यांची व्याख्याने, कीर्तने असे कार्यक्रम सुरू झाले. स्वातंत्र्यवादी विचारांना चालना मिळाली. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजप्रबोधन करणारे देखावे सादर होऊ लागले. ते पाहण्यासाठी आणखी गर्दी जमू लागली. ईप्सित हेतू साध्य झाला. कालानुरूप सार्वजनिक गणपती उत्सवाचे स्वरूप बदलत चालले आहे. अगदी गणेश आगमनापासून विसर्जनापर्यंत अनेक बदल झालेले आहेत. काळ बदलतो तसा माणूस बदलतो, तशी संस्कृतीही बदलत जाते. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला. तो उद्देश आता राहिला नाही. कारण स्वातंत्र्यपूर्व काळातील गरज स्वातंत्र्यानंतर संपून गेली. त्यामुळे आपल्याला गणेशोत्सव बदलत गेलेला दिसतो. ते स्वाभाविक आहे. भक्तीपेक्षा शक्तिप्रदर्शन वाढले आहे. गर्दी वाढवण्यासाठी सार्वजनिक मंडळे तरुणांना आकर्षित करणारे कार्यक्रम ठेवतात. देवभक्तीपर, अभंग, राष्ट्रीय कीर्तने असे कार्यक्रम हल्ली दिसत नाहीत. तरुणांना त्यांच्या आवडीप्रमाणे सर्वकाही प्रचंड प्रमाणात करायचे आहे. मूर्तीचा आकार, मंडप, सजावट खर्च, देखावे यात खूपच फरक पडला आहे. पूर्वी देशभक्तीपर देखावे, देवादिकांच्या गोष्टींचे देखावे केले जात. आता तसे देखावे मंडपामध्ये फारच कमी दिसतात. बर्याच ठिकाणी तरुण कार्यकर्त्यांची ऊर्जा चुकीच्या गोष्टींकडे लावली जाते. त्यात राजकारणी मार्गदर्शक असतील तर त्यांना उत्सव नाहीतर महोत्सव करायचा असतो. गणेश मंडळांमध्ये गटबाजी, अमाप पैसा, राजकीय स्पर्धा यांचे दर्शन होताना दिसते. विद्वानांची व्याख्याने आता होत नाहीत. कीर्तनकार कीर्तन करताना अपवादाने दिसतात. गणेशोत्सव हा तर महाराष्ट्रातला सगळ्यांचा आवडता आणि मोठा उत्सव. ज्या त्या भागात प्रथेप्रमाणे तो साजरा केला जातो. कुठे दीड दिवस, कुठे पाच, सात, तर कुठे अनंत चतुर्दशीपर्यंत असतो. कोकणात दीडच दिवसाचा गणपती असतो; पण खूप उत्साह असतो. एकूणच विचार केला तर सध्याच्या परिस्थितीत या उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. धार्मिकतेपेक्षा इतर गोष्टींना महत्त्व दिले जाते. मोठ्या मूर्ती, देखावे, झगमगाट, रोषणाई, डीजेच्या तालावर कर्कश्य गाणी हे प्रमाण वाढले आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या विचारांनी घरातल्या गणपतीबरोबरीने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्याचा जवळपास विसर पडला आहे. काही वर्षांपूर्वी गणेशोत्सव व्याख्यानमालासारखे उपक्रम केले जात होते. निरनिराळ्या विषयांवर विचार ऐकायला मिळायचे. ते सध्या क्वचित पाहण्यात येतात. देखावे, रोषणाई तर करावीच; पण या गोष्टींनाही प्राधान्य द्यावे. डीजेच्या कर्कश्य तालावर जी गाणी लावली जातात, तो प्रकार कुठेतरी थांबणे आवश्यक आहे. उत्सव साजरा करण्यातूनच आनंद, समाधान, जरूर मिळायला हवे; पण त्यापासून कोणाला त्रास होणार नाही हा विचारही असायला हवा. नवरात्र-दुर्गा उत्सवाची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. दिवसभर कर्कश आवाजात गाणी, डीजे, गरबा, दांडिया. अनेकदा केवळ दिखावा, इव्हेंट म्हणूनच हा उत्सव साजरा केला जातो, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ध्वनिप्रदूषण हा एक महत्त्वाचा मुद्दा सर्वांनी विचार करण्यायोग्य आहे. कायदे जरी खूप केले असले तरी ते आपण पाळतो का? अनेक गोष्टींचे भान राहत नाही. शहाणपणाची उणीव भासते. फटाके, रोषणाई यामुळे जे वायुप्रदूषण होते, जे सर्वांनाच त्रासदायक ठरते. विशेषत: महानगरांमध्ये ही समस्या जास्त आहे.गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा असली तरी त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस, प्लास्टिक, थर्माकॉल, डीजे, स्पीकर्स, यांच्यासारख्या कृत्रिम गोष्टींचीही भर पडली आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे विसर्जन मिरवणुकांमधील गर्दीही वाढली आणि त्या तुलनेत वाहतुकीचे रस्ते अरुंद ठरू लागले आहेत. त्याही परिस्थितीत मोठ्या आगमन आणि विसर्जन निरवणुकांचा आग्रह धरून व्यवस्था वेठीस धरल्याचे चित्र कायमच दिसते. खरेतर हे टाळायला हवे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. केवळ ध्वनिप्रदूषण नव्हे, तर उत्सवातील अनधिकृत मंडप, जाहिरातींचे फलक, कमानी आणि जलप्रदूषण यांसारख्या अडचणींवर अनेकदा जनहित याचिकांमधून आवाज उठवण्यात आला आहेच. परिणामी उत्सवातील अतिरेकी कार्यकर्त्यांवर या लढ्यामुळे काही निर्बंध येण्यास सुरुवात झाली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलस्रोतांचे प्रदूषण, प्लास्टिक सुशोभीकरणामुळे होणारे दुष्परिणाम, मोठ्या विसर्जन मिरवणुकांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि वाहतूककोंडी या सगळ्या अडचणी आणि समस्यांची जाण गणेशोत्सव साजरा करणार्या प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचू लागली असून, ही समाधान कारक बाब आहे . लोकसंख्या वाढल्यामुळे प्रत्येक शहरामध्ये उत्सव साजरा करताना निर्माण होणार्या अडचणीही वाढल्या आहेत. त्यामुळे विवेकी उत्सवांचे आवाहन समाजातील सर्व स्तरातून नेहमीच होते. सरकारी यंत्रणा, पर्यावरणस्नेही मंडळी आणि सामाजिक संस्थांकडून प्रदूषणमुक्त उत्सवांचा आग्रह नेहमीच धरण्यात येतो. सगळे सण-उत्सव साजरे करीत असताना सामाजिक भान म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जसे कर्कश वाद्यांपासून ध्वनिप्रदूषण, मोठे फटाके, मोठ्या प्रमाणात रोषणाई यांपासून वायुप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. सात्विकपणे आपल्या संस्कृतीला शोभेल असेच उत्सव साजरे करायला हवेत. कुठलेही अपप्रकार घडणार नाहीत, अपप्रवृत्तींचा शिरकाव होणार नाही आणि आपण उत्साहात उत्सव साजरे करीत असताना कोणालाही त्रास होणार नाही, ही जबाबदारी घेणे गरजेचे आहे.