प्रकाश चान्दे | तराने – अफसाने
मलिका – ए-तरन्नुम म्हणून गाजलेल्या नूरजहाँ या गायिका, अभिनेत्रीची आज ९८वी जयंती. यानिमित्तानं तिच्या एका प्रसिद्ध गाण्याची जन्मकथा.
कलाकाराचं त्याच्या कलेवर सच्चे प्रेम असलं की कितीही शारीरिक, मानसिक अडचण असली तरी तो कलाकार त्या अडचणीवर मात करतो. इतकंच नव्हे तर अशी काही त्याला अडचण होती हे तो त्याच्या चाहत्यांना जाणवूनही देत नाही!
१९४०च्या दशकात त्या वेळचे आघाडीचे निर्माते – दिग्दर्शक मेहबूब खान त्यांच्या ‘अनमोल घडी‘ या चित्रपटाची निर्मिती करीत होते. त्या वेळेस त्या चित्रपटाची गायिका असलेली नायिका नूरजहाँ अशाच एका अडचणीवर मात करून ध्वनिमुद्रणाला उभी राहिली होती. त्या गाण्याची ही कथा…
या चित्रपटाचं काम सुरू झालं आणि नायिका नूरजहाँ ही गर्भवती झाली. तसं त्या काळात बर्याच ठिकाणी स्टुडिओ पद्धत चालू असल्यामुळे नायक – नायिका एकच वेळेस एकापेक्षा जास्त चित्रपटांत भूमिका करीत नसत. त्यामुळे सलग ५-६ महिन्यांत एखादा चित्रपट पुरा होत असे.मात्र लवकरच, नायिका नूरजहाँ ही गर्भवती आहे आणि आता चित्रपट तिच्या प्रसूतीआधी पुरा झाला नाही तर तो आणखी काही महिने रेंगाळेल, हे निर्माते-दिग्दर्शक मेहबूब खान यांच्या लक्षात आलं.
त्या काळात एखाद्या चित्रपटात ८-९ गाणी सहज असत. त्यामुळे या गाण्यांचं आधी ध्वनिमुद्रण आणि नंतर चित्रीकरण असं पूर्ण करावं लागत असे. त्यामुळे मेहबूब यांनी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक नौशाद यांच्याकडे गाणी ध्वनिमुद्रित करण्यासाठी लकडा लावला.
कामाच्या बाबतीत परिपूर्तता बाळगणारे नौशाद यांना एकेका गाण्याच्या ध्वनिमुद्रणासाठी दोन – दोन आठवडे सहज लागत. त्यामुळेच मेहबूब खान हे जास्त चिंतीत होते.
यातील नूरजहाँच्या या मिल गया भगवान… या एकल गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेस नूरजहाँचे पोट बर्यापैकी दिसू लागले होते आणि तशा तिच्या शारीरिक हालचालीही मंदावल्या होत्या. त्यामुळे तर मेहबूब हे नौशाद यांच्या त्या गाण्याच्या ध्वनिमुद्रणासाठी मागेच लागले.
गाण्याचं लेखन, तालमी, वाद्यमेळ आणि अन्य गोष्टी समाधानकारक तर्हेने पार पडल्यानंतर नौशादनी नूरजहाँला तालमीसाठी आणि ध्वनिमुद्रणासाठी बोलावलं. मात्र तिची शारीरिक अवस्था बघून पंचविशीतील नौशाद यांनाही तिच्याविषयी सहानुभूती वाटू लागली. परंतु मनाने आणि स्वभावानं खेळकर असलेली नूरजहाँ भलतीच प्रसन्न मूडमध्ये होती.
तिची शारीरिक अवस्था बघून मेहबूब खान यांनी वत्सलतेने तिला विचारलं की, बेटी, तुम ये गाना गा सकोगी? कोई तकलीफ तो नहीं होगी?
आता ती काय उत्तर देते याच्या प्रतीक्षेत संगीत दिग्दर्शक नौशादही तेथेच उभे होते.
‘यू नहीं?
मुझे या हो गया हैं?
मियाँजी, मैं गाउंगी नहीं तो जीउंगी कैसे?‘
तिच्या खळखळून हसून दिलेल्या या उत्तरानं मेहबूब – नौशाद आश्चर्य चकितच व्हायचे राहिले होते.
त्या पाच – सहा महिन्यांच्या गर्भवती नूरजहाँने अत्यंत खेळकरपणे मेहबूब आणि नौशाद या चिंतीत असलेल्या जोडगोळीस विचारलं.
तिच्या उत्तरानं समाधान झालं असलं तरी मनात काळजी वाटणार्या नौशाद यांनी ध्वनिमुद्रण करण्यासाठी आवशयक त्या सूचना दिल्या.
आता ही बया कसं गाणं गातेेय याकडे त्या दोघांनी नजरा लावल्या.
… आणि काय आश्चर्य?
नूरजहाँच्या शरीरावर आणि मनावर कसलाही ताण नव्हता.
तिनं पहिला ‘सा‘ लावून गायला सुरुवात केली.
ती एक नामवंत गायिका होती आणि त्या वेळेपर्यंत तिनं किती तरी गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्यामुळे तिच्यासाठी या गाण्यात खास काहीच करायचं नव्हतं. तिने सलग, कसलीही चूक न करता ते गाणं नौशाद आणि महबूब यांना अपेक्षित होतं त्याप्रमाणे ध्वनिमुद्रित केलं!
खरं तर पहिलाच टेक ओके झाला होता. पण नंतर काही अडचण उद्भवू नये म्हणून आणखी एक टेक घेण्यात आला!
हे दोन्ही टेक तिनं अत्यंत सफाईदारपणे दिले होते. या चिंताग्रस्त जोडीला तिचं कौतुक करण्यावाचून गत्यंतर उरलं नाही.
या ‘अनमोल घडी‘ चित्रपटात तब्बल १२ गाणी होती. यापैकी नूरजहाँला चार एकल आणि एक गायक – अभिनेता सुरेंद्रबरोबर युगुल गीत होतं. या चित्रपटातील बरीचशी गाणी लोकप्रिय झाली. पण नूरजहाँची ही पाचही गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती!
जाता जाता :
नौशाद यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी २६ चित्रपटांनी रौप्य महोत्सवी यश पाहिलं. ‘अनमोल घडी’ हा चित्रपटही त्यापैकी एक.
या चित्रपटापासून मेहबूब – नौशाद ही जोडी जमली आणि तिनं मेहबूब निर्मित ‘आवाज’ (१९५७ ) वगळता ‘सन ऑफ इंडिया’ (१९६२) या मेहबूब यांच्या अखेरच्या चित्रपटापर्यंत एकत्र काम केलं.
‘आवाज’ हा चित्रपट स्वत: मेहबूब दिग्दर्शित करीत नव्हते, म्हणून नौशाद यांनी त्या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन टाळलं.
‘या मिल गया भगवान…’ या गाण्याच्या पहिल्या ओळीची चाल नंतर संगीत दिग्दर्शक हेमंतकुमार यांनी जशीच्या तशी उचलली आणि ते संगीत देत असलेल्या फिल्मीस्तानच्या ‘जागृती’ (१९५५) चित्रपटातील ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल…’ या गीतासाठी वापरली. आशा भोसलेनं गायलेलं ‘जागृती’ चित्रपटातील हे गाणं ही खूप लोकप्रिय झालं होतं.
१९५५ च्या ‘बिना का गीतमाला‘च्या वार्षिक कार्यक्रमात हे ‘दे दी हमे…’ गाणं आठव्या क्रमांकावर वाजवलं गेलं होतं.
गंमत :
नूरजहाँ ही तशी ‘बिनधास्त‘ गायिका होती. एकद, एका चित्रपटासाठी तिनं एक दिवसभर ध्वनिमुद्रणाचा कार्यक्रम ठेवला.
२-३ गाणी ध्वनिमुद्रित झाली आणि भोजनाची सुट्टी झाली. निर्माता सर्वांना घेऊन स्टुडिओ समोरच्या धाब्यावर जेवायला गेला. सर्वांना वाटलं की, नूरजहाँ ही काही तरी अल्प, सात्विक आहार घेईल. कारण अजून २-३ गाणी ध्वनिमुद्रित व्हायची होती. पण जेवायला बसल्यावर नूरजहाँनं तिखट, तेलकट, सामिष भोजनाची फर्माईश केली. ते भोजन तिनं भरपेट खाल्लं. त्यावर कडी म्हणजे तिनं गारेगार आइसक्रीम मागवून तेही २-३ प्लेट हाणलं! निर्मात्याचा जीव खाली-वर होत होता तो खर्चामुळे नव्हे; तर इतकं आणि असं खाल्ल्यावर ही बया आता गाणार काय? बरं निर्माता तिच्या कुठल्याही फ़र्माईशला नाही म्हणू शकत नव्हता!
इतकं सर्व झाल्यावर त्या निर्मात्यानं काकुळतीला येऊन झरलज्ञ णचिी आज्ञा दिली!
यावर कडी म्हणजे नूरजहाँ त्याला विचारते की, यो मियाँ, आगे रेकॉर्डिंग नहीं करनेका?
त्यावर संगीत दिग्दर्शक म्हणाला की, देवीजी, आपलं हे भोजन, त्यानंतरचं आइसक्रीम खाऊन झाल्यावर आपण सकाळसारखं गाऊ शकाल?
यू नहीं? इतना मायूस न बनो मियाँ! चलो बाकीका रेकोर्डिंग पूरा करते हैं!
सर्वजण वाद्यं सुरात लावून तयार झाले. ध्वनिमुद्रण करणार्या तंत्रज्ञांनी त्यांची आयुधं ठीकठाक केली. बाई ध्वनिमुद्रणासाठी माइकसमोर उभ्या राहिल्या. पहिला ‘सा‘ लावला. सर्वांच्या अंगावर सर्रकन काटा आला. नूरजहाँच्या आवाजावर कसलाही परिणाम झाला नव्हता!
उरलेली दोन-तिन ध्वनिमुद्रणं नूरजहाँनं सकाळच्याच धडायात पार पाडली!
मोबाइल : ९८२०८४७६९२
गायक : नूरजहाँ
गीतकार : अंजुम पिलभीती
संगीत दिग्दर्शक : नौशाद
राग : मांड खमाज + काफी
चित्रपट : अनमोल घडी, १९४६