राजश्री शिलारे |
आपण स्त्रियांना सुंदरतेच्या बेड्यांमध्ये कैद केले आहे. मग ती स्त्री एखादी सामान्य महिला असो वा अभिनेत्री. स्त्री म्हणजे केवळ वस्तू आहे, अशी वस्तू की कित्येक कवींनी तिला आपल्या कवितेत काल्पनिक स्थान दिलं, तर चित्रकारांनी आपल्या चित्रांमध्ये. कवींच्या कल्पनेत स्त्रीची कंबर नेहमीच नदीच्या प्रवाहासारखी असते, तिचे डोळे खोल निळे सागरासारखे असतात, तिच्यामध्ये हरिणीसारखी चंचलता असते आणि तिचे केस काळ्याकुट्ट ढगांसारखे दाखवले जातात.
आम्ही सिनेमात कधीही काळी किंवा सावळ्या रंगाची नायिका पाहिली नाही. मालिकांमध्येसुद्धा राक्षसिणींना काळ्या रंगात तर अप्सरांना गोर्या रंगात दाखविण्यात आले आहे. या सगळ्या लोकांनी कोणती स्त्री सुंदर स्त्री असते, हे आपल्याला सांगितले आणि केवळ सांगितलेच नाही तर मनावर अक्षरशः बिंबवले गेले. कोणती स्त्री सुंदर म्हणावी? तिचे शरीर कसे असावे? सुंदरतेची कोणती परिमाणं तिला जोडली जावी, हे सगळं सांगितलं गेलं.
चित्रपटामध्ये काम करायचं असेल तर आपण कसे दिसतो, आपली शरीरयष्टी कशी आहे, याकडे अधिक लक्ष दिलं जातं. हे कोणत्या ना कोणत्या कलाकाराच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल. अभिनेत्री राधिका आपटेने आता बॉलिवूडमधील धक्कादायक सत्य सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राधिकाने चित्रपट करीत असताना आलेल्या वाईट अनुभवाबाबत खुलेपणाने सांगितलं. राधिकाला अलीकडेच एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं. विचित्र कारणं देत बर्याच चित्रपटांसाठी राधिकाला नाकारण्यात आलं. याबाबत तिने स्वतः सांगितलं आहे. Film Companion ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राधिकाने सांगितलं की, काही दिवसांपूर्वीच मला एका चित्रपटासाठी नाकारण्यात आलं. याचं कारणदेखील फार विचित्र होतं. माझ्या तुलनेमध्ये दुसर्या अभिनेत्रीचे ओठ आणि शरीराची ठेवण अधिक चांगली होती. दुसरी अभिनेत्री तुझ्यापेक्षा अधिक आकर्षक दिसेल आणि ती खूप चालेल, असं मला सांगण्यात आलं.
जेव्हा मी या क्षेत्रात नवीन होते तेव्हा मला माझ्या शरीरयष्टीवर काम करण्याचा सतत सल्ला दिला जायचा. सुरुवातीला मी दबावाखाली जगले. पहिल्याच भेटीमध्ये नाकाची सर्जरी कर, असं मला सांगण्यात आलं. तर दुसर्या भेटीमध्ये स्तनाची सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला, असा धक्कादायक खुलासा राधिकाने केला.
राधिका आपटेपाठोपाठ दुसरी अभिनेत्री ईशा गुप्तानेही ब़ॉलीवूडच्या कार्यपद्धतीवर टीका केली. करिअरच्या सुरुवातीला तिला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. तिला तिच्या त्वचेच्या रंगावरून विचित्र सल्ला देण्यात आला. ईशाने सांगितलं की, माझ्या त्वचेचा रंग सावळा आहे. म्हणून गोरी त्वचा दिसावी यासाठी मला इंजेक्शन घेण्याचा सल्ला देण्यात आला. पुढे बोलताना ती म्हणाली, माझ्या नाकाचा आकारदेखील नीट दिसावा म्हणून टोकदार नाक कसं करता येईल, याकडे लक्ष द्यावं असं सांगण्यात आलं.
आता या दोन अभिनेत्रींची ही मतं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटण्याची काहीएक गरज नाही. कारण नायिका कशी दिसावी याचे परिमाण आपल्या मनामध्ये घट्टफिट केलेले असतात. जर एखाद्या कुरूप महिलेला आपण चित्रपटाची नायिका म्हणून स्वीकारू शकत नसलो तर आपल्याला स्त्रियांना सौंदर्यावर सल्ले देण्याचा कुठलाही अधिकार नसतो. पण एक उदाहरण असेही आहे, जिला बॉलीवूडमध्ये सतत गोरे दाखविले गेले, पण हॉलिवूडने मात्र तिच्या आहे त्या रूपात तिला स्वीकारले. या अभिनेत्रीचे नाव आहे प्रियांका चोप्रा. हॉलिवूडमधील सौंदर्य सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमचा रंग गोरा असणे गरजेचे नाही.
स्त्री म्हणजे केवळ शरीर नव्हे
आपण स्त्रियांना सुंदरतेच्या बेड्यांमध्ये कैद केले आहे. मग ती स्त्री एखादी सामान्य महिला असो वा अभिनेत्री. स्त्री म्हणजे केवळ वस्तू आहे. एक अशी वस्तू की कित्येक कवींनी तिला आपल्या कवितेत काल्पनिक स्थान दिलं, तर चित्रकारांनी आपल्या चित्रांमध्ये. कवींच्या कल्पनेत स्त्रीची कंबर नेहमीच नदीच्या प्रवाहासारखी असते, तिचे डोळे खोल निळे सागरासारखे असतात, तिच्यामध्ये हरिणीसारखी चंचलता असते आणि तिचे केस काळ्याकुट्ट ढगांसारखे दाखवले जातात.
एखाद्या चित्रकाराला चांगला कलाकार होण्यासाठी एखाद्या प्रेमिकेची गरज असते, जी त्याच्या चित्रकलेची प्रेरणा बनू शकेल. चित्रकाराच्या कल्पनेमध्ये एक स्त्री ही नेहमी पहिल्या पावसाच्या तुषारांसारखी आल्हाददायी असते. ती नेहमीच सूर्याच्या पहिल्या किरणांसारखी तरुण, अल्लड आणि नाजूक असते. आजवरच्या साहित्यामध्येही लेखकांनी प्रेयसीचे वर्णन नेहमीच सुंदरतेशी जोडून केले आहे. बांधा सुडौल असेल, जिच्या चेहर्याची कांती चंद्रासारखी शुभ्र असेल, जणू एखाद्याने पांढर्या मलईमध्ये चिमूटभर केशर मिसळले आहे.
आम्ही सिनेमात कधीही काळी किंवा सावळ्या रंगाची नायिका पाहिली नाही. मालिकांमध्येसुद्धा राक्षसिणींना काळ्या रंगात तर अप्सरांना गोर्या रंगात दाखविण्यात आले आहे. या सगळ्या लोकांनी कोणती स्त्री सुंदर असते, हे आपल्याला सांगितले आणि केवळ सांगितलेच नाही तर मनावर अक्षरशः बिंबवले गेले. कोणती स्त्री सुंदर म्हणावी, तिचे शरीर कसे असावे, सुंदरतेची कोणती परिमाणं तिला जोडली जावी, हे सगळं सांगितलं गेलं. या सर्व लोकांनी एखाद्या काळ्या रंगाच्या, जाड आणि मोठे नाक असलेल्या महिलेला कधीच सुंदर म्हटले नाही. एखादी बाई सुंदर आहे म्हणजे नेमकं काय? तर तिचा रंग दुधासारखा शुभ्र असावा, ती अतिशय सडपातळ असावी, उंच असावी, जिचा बांधा सुडौल असावा, जिची कंबर बारीक असेल, नाकीडोळी ती अतिशय छान असेल आणि जिच्या केसांची ठेवण अतिशय स्टायलिश असेल. हे असं सगळं असताना या वर्णनात न बसणार्या साधारण मुलींना ही गोष्ट खटकेलच ना.
ज्याप्रमाणे एखाद्या नवीन नवरीने लग्नाच्या पहिल्या दिवशी कसे दिसावे, हे आपण ठरवलेले असते. लग्नाच्या दिवशी तिने काय दागिने घातले पाहिजे, ती कशी तयार झाली पाहिजे? काहीजण म्हणतात की चांगला मेकअप केला तर फोटो चांगले येतील, तर कोण म्हणतं की एवढ्या सगळ्या लोकांमध्ये तू उठून दिसली पाहिजेस. तर दुसरीकडे फोटोग्राफर म्हणतात की गडद मेकअप केला तरच तुमचे फोटो चांगले येतील. नवरीचा एवढा मेकअप केला जातो की तोंडावर किलोने थापलेल्या मेकअपमुळे लग्नात नवरी वेगळीच दिसू लागते. कधी कधी तिचा फक्त चेहरा पांढरा दिसतो आणि बाकीचे संपूर्ण शरीर काळं दिसत असतं.
दागिन्यांनी मढवून तिला सौंदर्याच्या बेड्यांमध्ये अडकवलं जातं. नवरी बनलेल्या मुलींसाठी ही केवळ एक दिवसाची सजा असू शकते, पण अभिनेत्रींना मात्र रोज एखाद्या नवीन नवरीसारखा मेकअप लावून वावरावं लागतं. तिचे केस, तिच्या चेहर्यावर असलेली प्रत्येक कमतरता मेकअप थापून लपविली जाते. तिच्या स्तनांचे प्रदर्शन करण्यासाठी तिला विशिष्ट प्रकारची अंतर्वस्त्रे वापरावी लागतात. शरीराचे वेगवेगळे भाग आकर्षक कारण्यासाठी पुठ्ठे वापरून तयार केलेले कपडे कमरेखाली, कमरेवर आणि संपूर्ण शरीरभर घालावे लागतात. नकली केस लावले जातात आणि चेहर्यावर तर उत्खनन केले जाऊ शकेल एवढ्या स्तरांचा मेकअप लावावा लागतो आणि एवढं करून तिला अभिनय करावा लागतो.
एवढं करूनही जेव्हा समाधान होत नाही तेव्हा तिच्या शरीरावर शस्त्रक्रिया करण्याचे सल्ले दिले जातात. स्तनांचा आकार कृत्रिम पद्धतीने वाढविण्यासाठी या शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला परत परत दिला जातो. तिचे ओठ एखाद्या फळासारखे लालचुटुक दिसावे आणि नाक बारीक होऊ शकेल, हनुवटीच्या खालचा भाग अधिक आकर्षक दिसेल आणि गाल गोबरे दिसतील, गालांवर बनावट खळी येऊ शकेल, तिचे ब्युटी बोन स्पष्टपणे दिसू लागतील, शरीरावरील चरबी कमी होईल अन् चेहरा अधिक पांढरा किंवा गोरा होऊ शकेल आणि असे केले नाही तर ‘गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा’सारखी गाणी कशी बनवली जाऊ शकतील? जर अशा महिला पडद्यावर आल्या नाहीत तर ‘तू चीज बडी हैं मस्त मस्त’ हे गाणे कसे वाजेल? महिलेला ‘चीज’ म्हणजेच वस्तू म्हणणे चुकीचे आहे बरं का…
प्रत्येक मुलीला मान्य करावं लागेल की ती अनन्या पांडे होऊ शकत नाही. तरीही मुली अनन्यासारखे बनण्याचा प्रयत्न करीत राहतात. कदाचित काही मुली आलियासारख्या दिसू इच्छित आहेत, अनन्या नाही. म्हणूनच त्या स्वत:च्या शरीराचा छळ करीत आहेत आणि कुणासारखे तरी दिसण्याची ही स्पर्धा कित्येक महिलांना आतून पोकळ करीत आहे. आपण जसे आहोत तसे आनंदी राहणे आपल्यासाठी हितकारक आहे.
आता प्रसिद्ध अभिनेत्री काजोलचेच उदाहरण घ्या
जेव्हा काजोल गडद रंगाची होती तेव्हा तिला ब्लॅक ब्युटी म्हटले गेले. लोकांना तिचे चित्रपट तर आवडत होते, पण तरीही तिला ते सावळी अभिनेत्रीच म्हणायचे. तिला कधीही ‘सुंदर’ म्हटले गेले नाही. पण तीच काजोल आता गोरी झाली आहे. तिने भुवया कोरल्या आहेत. आता लोक म्हणतात की काजोल वाढत्या वयाप्रमाणेच अधिक सुंदर झाली आहे. आता लोक तिला पूर्वीपेक्षा जास्त पसंत करतात.
शिल्पा शेट्टीसुद्धा आता लोकांना अधिक सुंदर वाटायला लागली आहे. लोकं म्हणतात की शिल्पा शेट्टीने तिचे वय थांबवले आहे. ती योगा करते. पण ती गोरी झाल्यानंतर लोक आता तिचे दिवाने झाले आहेत. तिने अलीकडे आपल्या नाकाची शस्त्रक्रियासुद्धा केली आहे आणि एवढं सगळं केल्यावर आता लोकांना शिल्पा सुंदर दिसते, असं वाटतं आणि हेच लोक तिला आधी साइड हीरोइन म्हणत होते.
सावळ्या रंगाच्या नायिकेच्या झोळीत येतात कमी ग्लॅमरस भूमिका
सावळ्या रंगाच्या नायिकांमध्ये शबाना आझमी, स्मिता पाटील, नंदिता दास आणि काजोल या नावांचा समावेश होतो. त्यापैकी काजोल आता गोरी झाली आहे. उर्वरित जुन्या नायिकांनी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप कठोर परिश्रम घेतले. तरीही त्या काळात त्यांना बाकीच्या नायिकांप्रमाणे ग्लॅमरस भूमिका मिळाल्या नाहीत. आतासुद्धा बर्याच सावळ्या रंगाच्या नायिका फक्त एखाद्या दुय्यम भूमिकेपुरत्या मर्यादित राहतात. मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये कामवाली बाईसुद्धा गोरी दाखवली जाते.
सावळ्या रंगाचे पुरुष कलाकार मात्र सुपरहिट
सावळ्या अभिनेत्यांनी मात्र स्वत:ला प्रत्येक भूमिकेमध्ये सुपरहिट केलेले आपण पाहतो. त्यांनी आपल्या सावळ्या रंगाला अभिनेत्याचा रंग बनवला आहे. त्यांच्यासाठी सुंदर असणे म्हणजे एक आकर्षक तरुण असणे होय. नायक कसाही असो, परंतु त्याला नायिका मात्र सुंदर पाहिजे. आता नवाझुद्दीन सिद्दिकी कितीही कठोर परिश्रम करूनही ते केवळ एक उत्कृष्ट कलाकार म्हणवले जाऊ शकतात. पण ते कधी सुपरस्टार होऊ शकत नाहीत. कारण सुपरस्टार म्हणजे फक्त सलमान खान. त्याने एकदा म्हटले होते की मी 47 वर्षांपासून त्याविरुद्ध लढत आहे. माझी उंची लहान असल्याने मला बर्याच भूमिका मिळाल्या नाहीत.
(‘बाईमाणूस’वरून साभार)