राम जगताप | तर्काचा घोडा
मागच्या आठवड्याच्या लेखात म्हटल्याप्रमाणे वर्तमानपत्रे सामान्य माणसांचे मृत्यू केवळ आकड्यांमध्येच मोजतात, पण त्यांना सार्वजनिक जीवनातल्या मान्यवर व्यक्तीच्या निधनाची दखल मात्र व्यवस्थित घ्यावी लागते. विशेष म्हणजे तिच्याविषयी मृत्युलेख लिहावा लागतो. ‘निर्मळ मनाचा मोठा माणूस’ (२४ फेब्रुवारी २०००, वि. स. वाळिंबे), ‘दूर तेवणारा दिवा’ (१२ मे २०००, ना. घ. देशपांडे), ‘तरीही कविता दरवळत राहील’ (२६ मे २०००, मजरुह सुलतानपुरी), ‘उरल्या सहस्त्रधारा’ (९ जून २०००, गोपीनाथ तळवलकर), ‘व्रतस्थ ज्योत निमाली!’ (१४ जुलै २०००, इंदिरा संत), ‘तारों भरी रात चले’ (२ ऑगस्ट २०००, अली सरदार जाफरी), ‘नि:संग विचारवंत’ (२३ ऑगस्ट २०००, विनायकराव कुलकर्णी), ‘वर्तमान चित्रसूत्र हरवले’ (१५ डिसेंबर २०००, बाबूराव सडवेलकर), ‘व्रतस्थ इतिहासयात्री’ (१९ डिसेंबर २०००, मु. गो. गुळवणी), ‘कुशल तत्त्वचिंतक’ (२९ डिसेंबर २०००, मे. पुं. रेगे)
‘मानदंड विसावला’ (१ फेब्रुवारी ०१, वसंत कानेटकर), ‘तटस्थ, विवेकनिष्ठ’ (३ एप्रिल ०१, गो. म. कुलकर्णी), ‘धगधगणारी मुक्तीची ज्योत’ (१० एप्रिल ०१, शंकरराव खरात), ‘सव्यसाची व्यक्तिमत्त्व’ (२४ एप्रिल ०१, जयंतराव टिळक), ‘मनस्विनी’ (८ मे ०१, मालतीबाई बेडेकर), ‘साहित्य नारायण’ (१५ मे ०१, आर. के. नारायण), ‘माणूसपण शोधणारा लेखक’ (२८ जून ०१, व. पु. काळे), ‘अमृतबोलांची अखेर’ (६ ऑगस्ट ०१, ज्योत्स्ना भोळे), ‘ ‘अ’कारापासून ‘ओम’कारापर्यंत’ (२७ ऑगस्ट ०१, व. दि. कुलकर्णी), ‘ ‘माणसं पोरकी झाली’ (२९ ऑगस्ट ०१, व्यंकटेश माडगूळकर), ‘साने गुरुजींचा वारसदार’ (४ डिसेंबर ०१, रा. वा. शेवडे), ‘ज्ञानभूषण’ (१३ डिसेंबर ०१, रा. ना. दांडेकर)
‘मराठीची ज्ञानदुर्गा’ (८ मे ०२, दुर्गा भागवत), ‘सच्चा समाजवादी शायर’ (१९ मे ०२, कैफी आझमी), ‘राजस रसिकता’ (८ जून ०२, शांताबाई शेळके), ‘गाणारे झाड विसावले’ (३० जुलै ०२, सुधीर फडके), ‘श्वासात भिजलेली जीवनसाधना’ (१८ सप्टेंबर ०२, वसंत बापट), ‘राजे असे का गेलात?’ (१९ सप्टेंबर ०२, शिवाजी सावंत), ‘अजातशत्रू साहित्यिक’ (१६ ऑक्टोबर ०२, वसंत सबनीस), ‘मंत्रावेगळा लेखक’ (१७ ऑक्टोबर ०२, ना.सं. इनामदार), ‘कर्मयोगी गोविंदभाई’ (२२ नोव्हेंबर ०२, गोविंदभाई श्रॉफ)
ही विसाव्या शतकाच्या शेवटच्या वर्षांत आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दोन वर्षांत दै. ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झालेल्या मृत्युलेखांची काही निवडक शीर्षके. ही यादी परिपूर्ण नाही. पण शतकाचे पान उलटताना आपण कुणाकुणाला गमावले, त्यातली ही काही नावे आहेत.
या निवडक मृत्युलेखांच्या यादीतून काय दिसते? तत्कालीन संपादकाची अभिरुची, वाचन, व्यासंग, आकलन आणि जनसंपर्क अशा बर्याच गोष्टी. अर्थात हे सगळेच मृत्युलेख उत्कृष्ट म्हणावेत असे नाहीत, पण तरीही त्यातून संबंधित मान्यवरांच्या व्यक्तिमत्त्वांचा आणि योगदानाचा निदान धावता आढावा घेण्याचा चांगला प्रयत्न दिसतो. काही मृत्युलेख उत्तम वठले आहेत, काही अतिशय लालित्यपूर्ण आहेत, काहींची शैली चित्तवेधक आहे. मृत्युलेख अनेकदा आयत्या वेळी लिहावा लागतो. त्यामुळे त्या वेळेत जे संदर्भ मिळतील आणि जी माहिती मिळेल तेवढीच. बाकी संपादकाचा व्यासंग, जनसंपर्क आणि वैयक्तिक स्नेह किंवा आठवणी यांच्याच भांडवलावर खिंड लढवावी लागते.
या यादीत पु.लं.चा नामोल्लेख नाही. १२ जून २००० रोजी पुलं गेले. त्यांच्यावरील १३ जूनच्या ‘सकाळ’च्या मृत्युलेखाचे शीर्षक होते ‘पुलं गेले’. बस्स नेमके, थेट आणि स्पष्ट. विसाव्या शतकाच्या शेवटच्या आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात काळाच्या पडद्याआड गेलेल्या विविध क्षेत्रांतल्या मान्यवर व्यक्तींची एक यादी करून त्यातील किती जणांवर वर्तमानपत्रांमध्ये मृत्युलेख लिहिले गेले, हे पाहिले पाहिजे.
१९९१-२००० या काळात अधिकाधिक उदाहरणे सापडतात आणि २००१-१० या दशकात हे प्रमाण सातत्याने कमी होत गेलेले दिसते. या दशकात वर्तमानपत्रे ट्रेंडी झाली, रोजच्या अग्रलेखांचा आकार कमी झाला. रविवार पुरवणीतल्या लेखांचाही आकार कमी झाला. चार-पाचशे शब्दांत प्रासंगिक घडामोडींवर अग्रलेखातून टीका-टिपण्णी करता येते. पण एखाद्या मान्यवर व्यक्तीवर तेवढ्या शब्दांत मृत्युलेख कसा लिहिणार? मग ती व्यक्ती सेलिब्रेटी आहे का, आपल्या वाचकांना माहीत आहे का, किती लोकप्रिय आहे किंवा वादग्रस्त आहे, असे वेगवेगळे निकष तयार झाले किंवा केले गेले.
पण याच काळात अजून एक घडले. वर्तमानपत्राचे संपादक हे खर्या अर्थाने ‘संपादक’ राहिले नाहीत. ते त्यांच्याकडे ‘व्यवस्थापन’, ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ अशा नवनव्या जबाबदार्या आल्या. त्यामुळे त्यांचा समाजातला वावर कमी झाला. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत दै. ‘सकाळ’चे संपादक पुणे शहरासाठी ‘मोस्ट वॉण्टेड सेलिब्रेटी’ असायचे. कारण शहरातल्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांची हमखास उपस्थिती असायची. अनंत दीक्षित हे ‘सकाळ’चे ते ग्लॅमर अनुभवलेले शेवटचे संपादक म्हणावे लागतील. त्यानंतर पुण्यातल्या कुठल्याही वर्तमानपत्राच्या संपादकाची शहरातल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसली नाही. असो. चांगल्या मृत्युलेखासाठी सार्वजनिक वावरच असला पाहिजे असे काही नाही. केबिनमध्ये बसूनही जनसंपर्क वाढवता येतो, व्यासंगही करता येतो. त्यासाठी तशी आच मात्र असावी लागते. ती नसलेले लोकच नंतरच्या काळात संपादकपदी आले. परिणामी २०११-२० या दशकात वर्तमानपत्रीय मृत्युलेखांचा जवळपास समूळ र्हास झाला. मृत्युलेखासारखा गंभीर विषय हाताळताना तरी आपल्या शहाजोग पांडित्याचे, संकुचित विचारांचे, हीन अभिरुचीचे प्रदर्शन घडवू नये, याचीही तमा ज्यांना नसते त्यांच्याकडून फारशा अपेक्षा करण्यात आणि त्यांच्याविषयी फार काही बोलण्यात अर्थ नसतो.
नुकतीच दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला साठ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ‘ग्रंथाली’च्या ‘शब्द रुची’ या मासिकाचा ऑगस्ट महिन्याचा अंक ‘मटा विशेषांक’ म्हणून काढण्यात आला आहे. या अंकात ‘मटा’मध्ये काम केलेल्या पत्रकारांनी लिहिले आहे. ते लेख वाचले की, ‘मटा’चा प्रवास कुठून कुठे झाला, हे चांगल्या प्रकारे समजते. असाच प्रकार पन्नाशी पार केलेल्या महाराष्ट्रातील जवळपास सर्वच वर्तमानपत्रांबाबत दिसून येतो. खरंतर त्यांच्याविषयीही अशा प्रकारे विश्लेषणात्मक विशेषांक करायला हवेत. त्याने फार फरक पडेल असे नाही, पण या वर्तमानपत्रांचा प्रवास समजून घ्यायला मदत होईल. टीकाटिपण्णी झाल्यानंतर ‘काळानुसार वा तंत्रज्ञानानुसार बदलावे लागते’ असे एक परवलीचे वाक्य पुढे केले जाते. सात-आठ वर्षांपूर्वी माझा एक मित्र पुण्यातल्या एका मोठ्या वर्तमानपत्राच्या संपादकाला भेटायला गेला होता. बोलता बोलता तो म्हणाला, ‘तुम्ही अग्रलेखाचा आकार खूपच लहान केला.’ त्यावर ते संपादक म्हणाले, ‘किती वाचक अग्रलेख वाचतात याविषयी आम्ही रीतसर एका व्यावसायिक सर्व्हे कंपनीकडून सर्व्हे केला आणि त्यानुसार अग्रलेखाचा आकार कमी केला.’ मित्र म्हणाला, ‘तसे असेल तर मग योग्यच म्हणावे लागेल.’ त्यावर संपादकांनी हसत खुलासा केला, ‘आम्हाला अग्रलेखांचा आकार कमी करायचाच होता. सर्व्हे तुम्हाला हवे तसे करून घेता येतात.’ नकळत या संपादकांनी सर्व्हेक्षणांमागचे सत्य सांगून टाकले आणि आपल्या वर्तमानपत्राचे धोरणही.
नव्वदच्या दशकात धंदेवाईक भांडवलदारी वर्तमानपत्रांनी नवे वळण घ्यायला सुरुवात केली आणि दशक संपेपर्यंत त्यांचा जवळपास कायापालटच होऊन गेला. म्हणजे आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरणाच्या गेल्या तीस वर्षांत वर्तमानपत्रांची सातत्याने अधोगतीच होत गेल्याचे दिसते.
या काळात काही वर्तमानपत्रांचा खप वाढला, काहींच्या नवनव्या आवृत्त्या सुरू झाल्या. पण हेही तितकेच खरे की, या काळात वर्तमानपत्रे लोकशिक्षण वा प्रबोधनाचेच काय, पण ज्ञान-मनोरंजनाचेही धड साधन राहिलेली नाहीत. ते पूर्णपणे ‘कंझ्युमर प्रॉडक्ट’ झाली आहेत. इमेजचे ब्रँडिंग करा, नवे नवे इव्हेंट्स करा, सेलिब्रिटींना बोलवा, त्यांचा उदो उदो करा आणि जाहिराती, स्पॉन्सर मिळवा, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम झाला आहे. आपले वर्तमानपत्र शहरात सगळीकडे आणि गावखेड्यात चांगल्या प्रकारे पोहोचण्यापेक्षा ज्यांच्या खिशातून पैसे काढता येतील त्यांच्यापर्यंतच पोहोचले तरी चालेल, हा नवा मार्केटिंग फंडा जन्माला आला. परिणामी साहित्य, चळवळी-आंदोलने, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, उद्योगधंदे, कामगार, गोरगरीब यांच्याशी असलेला वर्तमानपत्रांचा अनुबंध संपुष्टात यायला सुरुवात झाली. २०११-२० या दशकात तो जवळपास पूर्णपणे संपुष्टात आला. आता वर्तमानपत्रे फक्त आणि फक्त मध्यमवर्ग डोळ्यासमोर ठेवूनच निघतात. त्यांना जे आवडेल तेच देतात.
परिणामी वर्तमानपत्रांना तटस्थ, निर्भीड, नि:पक्षपाती आणि अचूक बातम्या, माहिती आणि विश्लेषण देण्यात रस राहिला नाही. (आणि ती वाचणार्या बहुतांश वाचकांनाही.) उलट ती समाजविरोधात, चळवळी-आंदोलने यांच्या विरोधात, संपाविरोधात, साहित्य-संस्कृतीच्या विरोधात भूमिका घेतानाच दिसतात. सार्वजनिक जीवनातल्या नि:स्पृहपणे काम करणार्या मान्यवरांविषयी त्यांना आस्था नसते, अनेकदा माहितीही नसते. जनसामान्यांविषयी कळवळा नसतो, सत्याची चाड नसते.
या सगळ्या गोष्टी भारतीय मध्यमवर्गाकडेही नाहीत. आणि आपली बहुतांश वर्तमानपत्रे फक्त त्यांचेच प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे मध्यमवर्ग आणि वर्तमानपत्रे, दोघेही बहुतेक वेळा ‘लोकशाही’विरोधी भूमिका घेतानाच दिसतात.
‘कंझ्युमर प्रॉडक्ट’ आणि ‘कंझ्युमर’ यांच्यामुळे बाजारपेठ आकाराला येते. लोकशाही, नीतिमत्ता, सदाचरण, प्रामाणिकपणा, सत्याची चाड, प्रेम, आपुलकी या मूल्यांना बाजारात फारसे मोल नसते. अशा काळात वर्तमानपत्रांत सार्वजनिक जीवनातल्या मान्यवर व्यक्तींविषयीचे चांगले किंवा उत्तम मृत्युलेख वाचायला कसे मिळणार?
हल्ली तर कुठल्याही मान्यवर व्यक्तीच्या निधनाची बातमी सोशल मीडियावरच आधी येते. तिच्याविषयी वर्तमानपत्रांपेक्षा सोशल मीडियावरच कितीतरी लवकर आणि चांगल्या प्रकारे लिहिलेले वाचायला मिळते. आता जगभरच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण समजून घेण्यासाठी वर्तमानपत्रांची (आणि टीव्ही वाहिन्यांचीही) गरज राहिलेली नाही. (कोरोनाकाळाने तर ते अजूनच ठळकपणे दाखवून दिले आहे. प्लेगच्या काळात लोकमान्य टिळकांसारखा समाजहिताची चाड असलेला संपादक होता. त्यामुळे जुलमी ब्रिटिश सरकारलाही आपली धोरणे बदलावी लागली. कोरोनाकाळात मात्र असा एखादा संपादक दिसला नाही.) त्यासाठी ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप पुरते. केवळ वर्तमानपत्रांच्या बदललेल्या धारणा, धोरणे आणि नीतिमूल्ये यांच्यावरच बोट ठेवण्यात अर्थ नाही. वर्तमानपत्रांची अधोगती झाली, ही गोष्ट खरीच आहे आणि त्याची चिकित्साही केली पाहिजे, हेही खरे. पण संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच्या काळात, त्यातही जागतिकीकरणाच्या गेल्या तीसेक वर्षांच्या काळात केवळ वर्तमानपत्रांचीच अधोगती झालीय का?
[email protected]
अगदी परखड विश्लेषण वाचायला मिळाले, धन्यवाद