दिनमान प्रतिनिधी
मुंबई|
ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्सने स्पिडी क्रिकेट लबचा सहा विकेट्सनी पराभव करत कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी २० लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. स्पिडी क्रिकेट लबने दिलेले २० षटकांत ९ बाद १४० धावांचे आव्हान ओम्नी ग्लोबल स्पोर्टस्ने १५.१ षटकांत चार फलंदाजांच्या मोबदल्यात १४२ धावा करत पार केले.
प्रथम फलंदाजी करणार्या स्पिडी क्रिकेट लबच्या फलंदाजांनी छोट्या खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. त्यात प्रदेश लाड (२९), सिद्धांत सिंग (२५), मयुर बोराडे आणि सिद्धार्थ म्हात्रेच्या प्रत्येकी २४ धावांचा वाटा होता. फलंदाजांना रोखताना ओमकार मालदीकरने ३ आणि दिनीश पटेलने दोन विकेट्स मिळवल्या. उत्तरादाखल सलामीला आलेल्या उमंग रोहितकुमार आणि एक विकेट मिळवणार्या हर्ष देसाईने पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या नजीक नेले. उमंगने ८१ तर हर्षने ३४ धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यावर उर्वरित फलंदाजांनी संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक : स्पिडी क्रिकेट लब : २० षटकात ९ बाद १४० (प्रदेश लाड २९, सिध्दांत सिंग २५, मयुर बोराडे २४, सिद्धार्थ म्हात्रे २४, ओमकार मालदीकर ४-२४-३, दिनीश पटेल ४-२२-२, हर्ष देसाई ४-४२-१, सचिन सोलंकी ४-२७-१) पराभूत विरुद्ध ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स १५.१ षटकात ४ बाद १४२ (उमंग रोहितकुमार ८१, हर्ष देसाई ३४, मोनिल सोनी ३-२९-३, यश डिचलकर ४-२५-१).
सामनावीर – उमंग रोहितकुमार .