दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
उद्धव ठाकरे गटातील युवा सेनेच्या एका कार्यकर्त्याला ठाणे पोलिसांनी सांगलीतून बेड्या ठोकल्या आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी सांगली येथून शनिवारी प्रवीण पवार (३०) याला अटक केली.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र असलेल्या युवासेना महाराष्ट्र राज्य या फेसबुक खात्यावरून पवारने आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात आयटी कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र प्रवीण पवार ठाकरे गटाचा पदाधिकारी नसल्याचा दावा पोलिस करीत आहेत.
युवासेना महाराष्ट्र राज्य या फेसबुक अकाउंटवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नितेश राणे आणि नीलेश राणे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र गेल्या अनेक दिवसंपासून प्रवीण पवार सांगलीतून प्रसारित करीत होता. सांगली येथील कडेगाव तालुक्यातील आपल्या गावातून घरबसल्या वरिष्ठ नेत्यांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याचे उद्योग करत होता. ही बाब ठाण्यातील शिवसेनेचे ठाणे शहर सचिव दत्ताराम गवस यांना फेसबुकवर निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
या घटनेची दखल घेत नौपाडा पोलिसांनी तपास केला असता हा मजकूर सांगली येथील कडेगावमधील प्रवीण पवार याने प्रसारित केल्याचे समोर आले. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी सांगली येथून प्रवीणला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या वेळी शिवसेनेचे समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के हे स्वतः नौपाडा पोलिस ठाण्यात जाऊन प्रवीण पवार याला जाब विचारला तसेच तुला या पोस्टसंदर्भात पगार मिळत होता का? कोणी वरिष्ठ नेते तुला असे पोस्ट करण्यास सांगत होते का? याबाबत म्हस्के यांनी विचारणा केली.