डॉ, मधुरा कुलकर्णी | एमडी ( स्त्री रोग – प्रसूती ), आयुर्वेद | आयुष्य सुंदर आहे.
चांगल्या खाण्या-पिण्याच्या सवयी शरीर-मनाचे आरोग्य चांगले राखतात हे खरेच; पण या खाण्या-पिण्याचे योग्य पचन झाले तरच पोषणाचे काम निर्विघ्न पार पडते हे समजून घ्यायला हवे!
रमाताई ७५ वर्षांच्या एक समाधानी गृहिणी. त्यांची गोष्ट खूप काही शिकवणारी आहे! गेल्या २ महिन्यांपासून रमाताईंच्या तब्येतीत खूप चढ-उतार चालू होते! घरातल्या घरात पाय अडकून पडल्याचे निमित्त झाले आणि चेहर्यावर मार लागला. त्यामुळे अनेक औषधे घ्यावी लागली. त्यातल्या त्यात जवळच्या मैत्रिणीच्या मृत्यूचा आघात. रमाताई अगदीच गळून गेल्या. औषधांचा दुष्परिणाम किंवा मनावरचा प्रभाव यामुळे जुलाब सुरू झाले. होता होता वजन कमी झाले. थकवा, झोप न लागणे, पायात गोळे येणे सारीच लक्षणे एका मागून एक निर्माण होऊ लागली!
आता जुलाब थांबवणार्या औषधांचा मारा सुरू झाला! सगळ्या तपासण्याही करून घेतल्या २ महिन्यांच्या या घडामोडींनंतर रमाताई दवाखान्यात आपली तब्येत दाखवायला आल्या. तेव्हा त्यांनी सांगितलेल्या गोष्टीनंतर मी एकदमच हैराण झाले. सुशिक्षित घरांमधूनही आज आरोग्य-शिक्षणाचा अभाव आहे हेच खरे!
रमाताईंनी जुलाब थांबवण्यासाठी केलेले डॉटरी उपाय अपुरे पडले. पोटात दुखणे, शौचाची भावना होणे, आव होणे यासार्या लक्षणांसाठी शेवटी आपल्या भावाने दिलेले औषध घेण्यास सुरुवात केली. आवेवरचे ते अॅलोपॅथिक औषध खरे तर मळमळ, अन्नावरची वासना कमी होणे असे त्रास निर्माण करत होते. पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ३ आठवड्यांपर्यंत (!) ते औषध मनोभावे घेण्याचा सपाटा त्यांनी लावला! माझ्याकडे त्या पोहोचल्या तोपर्यंत त्यांच्या आतड्यातील पचनाला उपयोगी अशा स्तराचे खूप नुकसान त्यांनी आधीच करून ठेवले होते. आव कमी करायला उपयोगी ७ दिवसांपर्यंत घेण्याचे औषध ३ आठवडे घेत बसल्या होत्या! माहिती खरी पण अपुरी असू शकते, हा साधा नियम सगळ्यांनाच शिकवायची वेळ पुन्हा येऊन ठेपली आहे, हे नक्कीच!
आतड्याच्या आरोग्याचे महत्त्व
या छोट्या व साध्या नियमाबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे आपल्या आतड्याच्या आरोग्याला खूप जपायला हवे! आतड्यामध्येच आपल्या अन्नपचनाचा महत्त्वाचा टप्पा पार पडत असतो. विशेषतः तिथे होत असलेल्या सूक्ष्म पोषकोश (Nutrition and gut health) च्या शोषणामुळे संपूर्ण शरीराचे पोषण होत असते आणि बरे वाटण्याची भावना निर्माण होते.
पचनाबरोबरच तुमच्या प्रतिकारक्षमतेवर व भावनांवरही आतड्याच्या आरोग्याचा सकारात्मक परिणाम होतो!
मेंदू मेंदू व आतड्याचा जवळचा संबंध
१) तुमच्या अन्ननलिकेपासून ते गुदमार्गापर्यंत मेंदूतील न्यूरोनप्रमाणेच छोटे भाग असतात. (मज्जा-पेशिका-मेश) यांचे काम अन्नाला पुढे ढकलणे व अन्नाचे पचन करणे असते.
२) तुमच्या आतड्याकडून मेंदूला सतत निरोप पोहोचवले जातात, माहितीची देवाणघेवाणही होते. उदाहरणार्थ लेप्टिन हॉर्मोनद्वारे पोट भरल्याची संवेदना निर्माण होते.
३) मेंदूचे आणि पोटाचे हे नाते तुमच्या भावभावनांशी आणि मूडशीही संबंधित असते. आतड्यातून स्त्रवणारा सेरोटोमिन नावाचा अंतःस्त्राव तुमच्या भावना नियंत्रणाशी सरळ सरळ जोडलेला असतो. म्हणूनच पचनाचे त्रास तुमचा मूड बिघडवू शकतो.
४) आतड्याकडून मेंदूकडे जाणारे संदेश तुम्हाला अंतःप्रेरणा देऊ शकतात. (गट-फिलिंग)
५) विशेषतः बिघडलेले आतडे बिनसलेले पचन तुमच्या सगळ्याच (सर्वांगीण) आरोग्यावर दुष्परिणाम करते. भावनिक, मानसिक अस्वस्थताही आणते.
काय कराल?
आतड्याचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी पचन सांभाळायला पाहिजे. त्यासाठी आयुर्वेदाने सोपे सोपे नियम सांगितले आहेत.
१) अध्यशन टाळा अर्थात एकदा खाल्ल्यावर त्याचे पचन होईपर्यंत दुसरा आहार पोटात न ढकललेला बरा! अजीर्णामुळे पोटाचे अनेक त्रास होतात.
१) जेवणानंतर फळे खाणे
२) दोन जेवणांमध्ये अरबट-चरबट खाणे
सतत काही खाण्याच्या सवयी आजारांना निमंत्रण देतात.
खूप वेळा मनातले ताणतणाव घालवण्यासाठी आपण काही तरी चटपटीत खाण्याची सवय लावतो व अशा खाण्या-पिण्यामुळे पुन्हा तणाव-निराशा वाढते, जी बिघडलेल्या आतड्याच्या परिणामस्वरूप निर्माण होते.
२) अनशन – खूप काळ उपाशी राहिल्यामुळे भूक लागली तरी न खाल्ल्यामुळे पायात गोळे येणे, थकवा, चक्कर, उत्साह कमी वाटणे व आतड्यालाही पीळ पडणे, त्रास होणे होऊ शकते.
३) विरुद्धाशन – थंड, गरम असेच इतरही विरोधी गुणांचे अन्नपदार्थ एकत्र घेतल्याने आतड्याचे आरोग्य बिघडते. उदाहरणार्थ दूध+केळे, दही गरम करणे, दूध+मीठ, फ्रूट सलाड इत्यादी. यामुळे आतड्याच्या आरोग्यासह त्वचेचेही आरोग्य बिघडू शकते.
४) विषमाशन – पथ्यकर व अपथ्यकर आहार एकत्र घेतल्यामुळेही आतड्यावर तणाव येऊ शकतो. चुकीच्या वेळी जेवण चुकीच्या पद्धतीने घेणे आतड्याच्या आरोग्याला त्रासदायक ठरते.
आतड्याला आपले कामकाज शांतपणे करू देणे, त्यात ढवळाढवळ न करणे हेच श्रेयस्कर ठरते.
आतड्याच्या आरोग्याशी करा मैत्री
१) आपल्या आतड्यामध्ये २ प्रकारचे जीवाणू असतात. त्यातला एक प्रकार आतड्याच्या आरोग्याला धोका निर्माण करतो. तर दुसरा प्रकार आतड्याचे आरोग्य टिकवून ठेवतो. तंतूयुक्त आहार (fibre) हा चांगल्या वागणुकीच्या जीवाणूंसाठी जरुरीचा असतो. आतड्यातील पचनाला उपयोगी स्तर टिकवून ठेवणे ही दोन्ही कामे हा आहार करतो. तंतूमय आहाराची उदाहरणे – जव, केळी, बदाम, सफरचंद, शेंगदाणे, फ्लॉवर, साळीच्या लाह्या कोशिंबीर इत्यादी
२) ताकासारखे पदार्थ आतड्याच्या स्तराचे आरोग्य अबाधित ठेवतात. (probiotic)
३) कांदा, लसूण, केळ, शतावरी यासार्यांमुळे आतड्याला पचनासाठी सकारात्मक मदत होते. (prebiotic)
४) पाण्याचे योग्य प्रमाण असणेसुद्धा आतड्याला आपले कामकाज नीटपणे चालू ठेवायला मदत करते.
१) सकाळी उपाशीपोटी अर्धा कप कोमट पाणी पिणे
२) दिवसभरात तहान लागल्यावर योग्य त्या प्रमाणात पाणी पिणे
३) जेवताना अधूनमधून थोडे थोडे कोमट पाणी (केवळ चव बदलेल एवढेच) घोटभर घेणे.
४) जेवल्यानंतर एक-दीड तासाने पाणी पिणे. असे पाणी पिण्याचे नियम पाळणे आतड्यासाठी खूप आरोग्यदायक ठरते.
५) कृत्रिम रंगद्रव्ये घातलेले पदार्थ, अतिरेकी साखरेचे पदार्थ, पुनःपुन्हा तळलेले पदार्थ आतड्याचे आरोग्य बिघडवते, हे लक्षात ठेवले पाहिजे.
६) तणावमुक्त आयुष्य – ताणतणाव, चिंता आतड्यावर नकारात्मक परिणाम घडवून आणतात. योगाभ्यास विशेषतः योगनिद्रा, शवासन, ध्यानधारणा, संगीत, छंद अशा मदतीने तणाव घालण्याचे तंत्र विकसित करायला पाहिजे. यामुळे मनःशांती व आतड्याचे आरोग्य अबाधित राहते.
७) शरीराशी सुसंवाद – शरीर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पचनातील बिघाड सुचवत असते. गॅसेस, पोट फुगणे, पोट बिघडणे, पोट साफ न होणे, पोट दुखणे अशा सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा नीट विचार करायला हवा. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. आतड्याच्या आरोग्याची जपणूक सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाची असल्यामुळे योग्य आहार (जेवण), वागणुकीच्या पद्धती, तणाव-नियोजन याला पर्याय नाही!
सुपोषणाचे धडे गिरवताना
आहार-विहार तंत्र समजू या
आतड्याचे आरोग्य जपण्या
त्याच्या ‘मना’चाही विचार करू या
मनःशांती अन् आनंदाचा ठेवा
पोषणातून परिवर्तनाचा हाच मंत्र नवा!