चीनमध्ये सध्या नोंदली जाणारी कोरोनाची दैनंदिन रुग्ण संख्या ही दोन वर्षांतील सर्वाधिक असल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे. तेथे 24 तासांत सरासरी सुमारे दोन हजार रुग्ण नोंदले जात आहेत. मध्यवर्ती चीनमध्ये शनिवारी करोनाचे नवे 1807 रुग्ण नोंदले गेले. हे सर्व स्थानिक संक्रमणाचे रुग्ण आहेत. याशिवाय परदेशातून आलेल्या 131 जणांचे करोना अहवाल होकारात्मक आले आहेत, अशी माहिती आयोगाने दिली. आयोगाने म्हटले आहे की, जिलनव्यतिरिक्त शान्डाँगमध्ये 175, गुआंगडाँगमध्ये 62, शान्स्कीमध्ये 39, हेबईमध्ये 33, जियांग्सूमध्ये 23 आणि तिआनजिनमध्ये 17 रुग्ण नोंदले गेले आहेत. देशाच्या विविध भागांची एकत्रित दैनंदिन रुग्णसंख्या ही सुमारे दोन हजार असून ती दोन वर्षांतील सर्वाधिक आहे. बीजिंगमध्येही 20 रुग्ण आढळून आले आहेत. चीनच्या जिलिन प्रांतात नवे 1412 स्थानिक रुग्ण आढळून आले. या प्रांताच्या राजधानीचे शहर असलेल्या चंगचूनमध्ये गेल्या शुक्रवारपासून टाळेबंदी लागू केली आहे. या शहरातील 90 लाख लोक टाळेबंदीचे निर्बंध पाळत आहेत. येथे वेगाने प्रसार होणार्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तनाचे रुग्ण आढळून येत आहेत. पाच लाख लोकसंख्येच्या युचेंग शहरातही टाळेबंदी लागू केली आहे. हे शहर शान्डाँग प्रांतात आहे.