वृत्तसंस्था
मुंबई। आर्यन खानच्या विरोधात ड्रग्जची केसच होऊ शकत नाही, असा दावा त्याचे वकील मुकुल रोहतगी यांनी मंगळवारी आज सुप्रीम कोर्टात केला. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील जामीन अर्जावर मंगळवारी मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यनसाठी युक्तिवाद केला. त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण घटनाक्रम कोर्टात सांगितला. त्यासाठी एनसीबीच्या कारवाईचाच तपशील रोहतगी यांनी समोर ठेवला. सुप्रीम कोर्टातील याचिकांचाही दाखला या वेळी रोहतगी यांनी दिला.
एनसीबीच्या अधिकार्यांना आधीच माहिती मिळाली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी क्रूझ टर्मिनलवर आर्यन आणि अरबाज मर्चंट यांना हटकले पण त्यात झडतीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आर्यनकडून तिथे काहीच हस्तगत करण्यात आलेले नाही. अरबाजच्या शूजमधून अमलीपदार्थ हस्तगत केले असा एनसीबीचा दावा आहे आणि त्यावर त्याचे वकील उत्तर देतील पण आर्यनकडून काहीच हस्तगत केलेले नाही. त्याची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे रोहतगी यांनी नमूद केले.