‘भोंगा’ 3 मे रोजी प्रदर्शित
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त बहुचर्चित असा ‘भोंगा’ चित्रपट अखेर प्रदर्शित होतोय. 3 मे रोजी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर हा चित्रपट देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते मनसे नेते संदीप देशपांडे, चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या वेळी चित्रपटाचे निर्माते अमोल कागणे यांचीदेखील उपस्थिती होती. लॉकडाउनच्या काळातच आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करणार होतो, मात्र योग्य मुहूर्त मला असं वाटतं की देवानेच आम्हाला आता दिला. मी आणि माझे सहकारी संदीप देशपांडे दोघांनी एक चित्रपट प्रस्तुत केला. माझे मित्र अमोल कागणे जे निर्माते आहेत, यांनी त्याची निर्मिती केली. या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण आज आम्हाला करायचं होतं, हा चित्रपट 3 मे रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली. हा चित्रपट 2018 मध्ये तयार झालेला आहे आणि कोरोनाकाळामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. म्हणून आता 3 मे रोजी आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करतो आहोत, अशी देखील माहिती संदीप देशपांडे यांनी यावेळी दिली. तर या चित्रपटास 2019 मध्ये राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळालेला आहे. राष्ट्रपती पुरस्कारानंतर महाराष्ट्र शासनाचे जवळपास नऊ पुरस्कार या चित्रपटाला मिळालेले आहेत. याशिवाय नुकत्याच झालेल्या मराठी फिल्मफेअर अवॉर्डमध्ये बेस्ट फिल्म क्रिटिक्स फिल्म फेअर अवॉर्ड मिळालेला आहे. आम्ही हा चित्रपट सप्टेंबरमध्ये म्हणजेच सहा महिन्यांपूर्वीच प्रदर्शित करणार होतो. परंतु काही अडचणींमुळे आम्ही तो नंतर प्रदर्शित करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार आता आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करतोय, असे चित्रपट निर्माते अमोल कागणे यांनी सांगितलं.
‘पेट पुराण’मध्ये सई
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांना भेटते. आता लवकरच सई अभिनेता ललित प्रभाकरसोबत मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पेर पुराण’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘पेट पुराण’ ही सीरिज आधुनिक काळातील श्रमजीवी जोडप्याच्या मानसिकता व प्राधान्यक्रमामधील संघर्ष दाखवते. या जोडप्याला मूल नको असतं. त्यांचा या सगळ्याकडे एक वेगळा दृष्टिकोन असतो. मग ते प्राणी पाळण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर ते कशा प्रकारे त्या प्राण्यांना पाळतात हे तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. सोनी लिव्हवर 6 मेपासून सुरू होणार्या या शोमध्ये अदितीच्या भूमिकेत सई ताम्हणकर आणि अतुलच्या भूमिकेत ललित प्रभाकर आहे. ‘पेट पुराण’ची निर्मिती व लेखन दिग्दर्शक ज्ञानेश जोटिंग यांनी केले आहे आणि ह्यूज प्रॉडक्शन्सचे रणजित गुगले हे या शोचे निर्माते आहेत. पेटपुराण मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या भाषांमध्ये पाहता येईल.
समांथा-विजय देवरकोंडा एकत्र
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा ही विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिच्या खासगी आयुष्यामुळे या चर्चा सुरू झाल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून समांथा ही ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम साँगमुळे प्रचंड चर्चेत आली होती. दरम्यान, लवकरच समांथा ही अभिनेता विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ते दोघेही लवकरच एका चित्रपटात झळकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक शिव निर्वाण यांच्या आगामी चित्रपटात समांथा आणि विजय देवरकोंडा एकत्र काम करणार आहेत. हैदराबादमध्येही या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा असेल, असं बोललं जात आहे. या चित्रपटाचे शूटिंग काश्मीरमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटातील विजय आणि समांथासोबतची काही प्रमुख दृश्ये काश्मीरमध्ये शूट केली जाणार आहेत. यानंतर उर्वरित शूटिंग अॅलेप्पी, हैदराबाद आणि विशाखापट्टणम येथे होणार आहे. या चित्रपटात कथा ही लष्कर जवानावर आधारित असल्याचे बोललं जात आहे. यात विजय हा लष्कर जवानाच्या भूमिकेत असणार आहे. येत्या वर्षात या शूटिंगला सुरुवात होणार असून, पुढील वर्षी 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘रायगडाला जेव्हा जाग येते’चा दमदार प्रयोग
रायगडाच्या माथ्यावरून रायगड अनुभवणं हा आनंद सोहळा होता. हा सोहळा अनुभवण्याची संधी ‘वारसा’ दिनाच्या निमित्ताने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण मुंबई मंडळ आणि मुंबई मराठी साहित्य संघ-नाट्यशाखा रंगमंच सहयोगाने ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या विशेष नाट्य प्रयोगाने नाट्यरसिकांना ही संधी मिळाली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने जागतिक वारसा दिनाचे आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत हा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग पर्यटन माहिती आणि जनसंपर्क या खात्याच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांची विशेष उपस्थिती या प्रयोगाला लाभली. किल्ल्याचे महत्त्व पटवून देणारं छोटेखानी चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. आपली परंपरा, आपली संस्कृती या सार्यांवर इतिहासाची छाप असते. आपल्याही नकळत आपण पुढच्या पिढ्यांसाठी नवा वारसा निर्माण करीत असतो. मिळालेला हा वारसा जपणे आणि तो पुढील पिढीला हस्तांतरित करणे खूप महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी केले. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ मराठी रंगभूमीवरील ऐतिहासिक सुवर्ण पान म्हणूनच अजरामर आहे. हा ठेवा जतन व्हायला हवा या उद्देशाने हा अनोखा प्रयोग आम्ही केल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी आमदार भरत शेठ गोगावले, डॉ. नंदिनी भट्टाचार्य साहू डॉ. राजेंद्र यादव आदी मान्यवर उपस्थित होते. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. महाराष्ट्रातील दोन अतिशय धुरंधर राजांची व्यक्तिमत्त्वे या नाटकातून उलगडली जातात. रायगडावर झालेल्या शुभारंभाच्या प्रयोगाचा आनंद व्यक्त करताना पुढील वर्षभरात विविध भागांमध्ये या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग करण्याचा मानस नाटकाच्या टीमने या वेळी व्यक्त केला. नाटकाच्या नव्या संचात प्रमोद पवार, यश कदम, उपेंद्र दाते, मोहन साटम, सुभाष भागवत, मा. चिन्मय, मयूर भाटकर, संध्या वेलणकर व अनिता दाते हे कलाकार असून, याचे दिग्दर्शन उपेंद्र दाते यांनी केले आहे.
पान मसालाच्या जाहिराती न करण्याचा निर्धार
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सिनेसृष्टीतील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो अनेकदा त्याच्या चित्रपटांच्या टीझर, ट्रेलरमुळे चर्चेत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून अक्षय हा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार हा विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीत झळकला होता. या जाहिरातीत शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार असे तिघेही झळकत आहेत. त्यावरून अक्षयला ट्रोल करण्यात येत होते. अखेर अक्षयने या ट्रोलिंगवर उत्तर देत एक मोठी घोषणा केली आहे. अक्षय कुमारने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीमुळे होणार्या ट्रोलिंगवर उत्तर दिले आहे. यात अक्षयने त्याच्या सर्व चाहत्यांची माफी मागितली आहे. तसेच यापुढे कोणत्याही तंबाखू ब्रँडची जाहिरात करणार नाही, असेही त्याने सांगितले आहे. मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची तसेच तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांत तुमच्या विविध प्रतिक्रिया मी वाचल्या. त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. मी याआधी कधीही तंबाखू यांसह इतर उत्पादनांचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही. विमल पान मसालाच्या जाहिरातीत झळकल्यानंतर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचा आणि तुमच्या भावनांचा मी मनापासून आदर करतो. म्हणूनच मी मोठ्या विनम्रपणे यातून माघार घेत आहे. तसेच मी ठरवले आहे की, या जाहिरातीतून मला मिळालेल्या पैशाचा मी चांगल्या कामासाठी वापर करेन. तसेच विमल पान मसाला या ब्रँडने जोपर्यंत या कराराचा कायदेशीर कालावधी पूर्ण होत नाही तोपर्यंत ही जाहिरात प्रसारित करू शकते. पण मी वचन देतो की यापुढे भविष्यात मी फार हुशारीने पर्यायाची निवड करेन. तसेच तुम्ही नेहमी माझ्यावर असेच प्रेम आणि प्रार्थना करीत राहा, असे अक्षय कुमार म्हणाला. अक्षय कुमारची ही जाहिरात काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली होती. या जाहिरातीची सुरुवात शाहरुख खान आणि अजय देवगण होते. हे अक्षय कुमारचे ‘विमल युनिव्हर्स’मध्ये स्वागत करीत होते. या जाहिरातीच्या निमित्ताने शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार बॉलिवूडचे तीन मोठे स्टार पहिल्यांदाच एका जाहिरातीत झळकले होते. पण ही जाहिरात तंबाखूच्या ब्रँडची असल्याने अनेकांनी त्यावर निशाणा साधला होता. यानंतर अनेकांनी अक्षय कुमारचे जुने व्हिडीओ शेअर करीत त्याला त्याच्या वक्तव्यांची आठवण करून दिली होती. या व्हिडीओत अक्षय हा दारू, सिगारेट, तंबाखूसारख्या हानिकारक उत्पादनांपासून दूर राहण्याबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे. यामुळे त्याला अनेकांनी ट्रोल केले होते.
– प्रतिनिधी