डॉ. मधुरा कुलकर्णी | एमडी ( स्त्री रोग – प्रसूती ), आयुर्वेद | आयुष्य सुंदर आहे
आजारी पडल्याशिवाय आरोग्याचे महत्त्व समजत नाही. औषधांच्या मार्यात सापडल्यावरही आपण आपल्या स्वतःच्या बरे होण्याची जबाबदारी किती वेळा घेतो, हा विचार प्रत्येकाने करायला हवा!
सबबी व तक्रारी
दवाखान्यात येणार्या रुग्णांचा अभ्यास केला तर ते आपल्या तक्रारींचा सतत पाढा वाचत असतात. त्यावर त्यांना वेगवेगळी औषधे पाहिजे असतात किंवा कधी कधी खूप जास्त औषधे न घेता बरे होण्याचा अट्टाहास असतो. त्यावर काही पथ्य किंवा अन्य उपाय सुचवला तर खूप वेळा तो न पाळण्यासाठी सबबीची यादी तयारच असते. माझा आजार बरा होण्याची माझी स्वतःची जबाबदारी आहे, हे खूप कमी जणांना पटत असते.
धोक्याची सूचना
खरे तर आपल्या शरीरातच आजार निर्माण होण्याप्रमाणेच आजार बरे होण्याची यंत्रणा असते. किंबहुना आजार निर्माण होण्यापूर्वीच आपल्याला धोक्याच्या सूचना मिळतही असतात. पण आपले त्याकडे दुर्लक्ष होत असते व आजारांचे अपघात घडतात. या धोक्यांच्या सूचना ओळखायला शिकले पाहिजे इतकेच!
नीलेशची गोष्ट
वयाच्या पस्तिशीतच किडनीच्या आजारांनी त्रस्त झालेल्या नीलेशने अनेक डॉक्टर व अनेक पॅथींच्या वार्या सुरू केल्या. आपल्या आजारपणाचे गांभीर्य लक्षात आल्यावर चिंताग्रस्त मनाला शांत करण्याऐवजी त्याने वेगवेगळ्या डॉक्टर व औषधांनी मनाचा गोंधळ वाढवतच नेला.
एकाच वेळी 2/2 प्रकारची औषधे त्या त्या डॉक्टरांना इतर औषधांची कल्पनाही न देता घेत राहिला. तपासण्या, औषधे, स्वतःची ताणाची नोकरी या चक्रात सापडलेल्या नीलेशला
1) खाण्यापिण्याच्या वेळा
2) मनाची स्वस्थता
3) सुसंवाद
4) योग्य विश्रांती
या कोणत्याच गोष्टीसाठी वेळ मिळाला नाही.
एका आजारपणातून त्याने दुसरे आजारपण स्वतःच निर्माण केले. किडनीच्या आजारांवर डायलिसीससारखे उपचार चालू असतानाच टीबीच्या आजाराने त्याची पकड घेतली व मूळ आजाराला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले. नीलेश जेव्हा जरा बरा होऊन सार्या उपचारांच्या फाइलचा गठ्ठा घेऊन माझ्याकडे आला, तेव्हा त्यांची हीच समजूत मी घेतली.
1) मलाच हा आजार का झाला, याचा क्षोभ करण्यापेक्षा आपल्या आजाराचा स्वीकार करायला हवा.
2) आपल्या डॉक्टरांवरचा विश्वास हा आपल्याला बरे करण्यात खूप महत्त्वाचा असतो.
3) आपण एकाच वेळी दोन पद्धतीची औषधे घेणे एवढे योग्य नसते.
4) आजार बरा कऱण्यात आपल्या जीवनशैलीचा व पथ्याचा मुख्य हातभार असतो.
थोडक्यात महत्त्वाचे
1) आजार म्हणजे आरोग्याचा अभाव, पण आरोग्य म्हणजे आजारांचा अभाव नव्हे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला आपल्या आरोग्याच्या कसोट्यांना नीट जाणून घ्यायला हवे.
2)आरोग्य म्हणजे निखळ प्रसन्नता,
खर्या-खोटयांची जाणीव, परिस्थितीचा स्वीकार, आपल्या माणसांना समजून घेण्याची क्षमता, काम करण्याचा उत्साह,
कृतीशीलता, प्रयत्नांचे सातत्य,
समरसता, जीवनातील आनंद घेण्याची इच्छा, सुसंवाद, विश्रांतीची क्षमता, कृतज्ञ भाव, अंतःकरणाची शुद्धी, समाधानी वृत्ती, बुद्धीची स्थिरता.
या सार्या गोष्टींचे एकजीव संमिश्रण. असे आरोग्य आपोआप मिळत नसते, त्यासाठी जबाबदारी घेऊन प्रयत्न करावे लागतात.
काही आजारांची निर्मितीच या प्रयत्नातील कमतरतेमुळे होते. कशी ते पाहू या.
मूळ शोधायला हवे
आजार हा शरीराच्या रोगाविरुद्ध लढण्याच्या क्षमतेमध्ये आलेल्या कमतरतेचा केवळ एक कवडसा असतो. आजारांची लक्षणे दिसून येतात ती जागा व आजाराने धरलेले मूळ हे वेगवेगळे असू शकतात.
हे आजाराचे मूळ कारण जाणून घेण्याचा डॉक्टर मंडळी प्रयत्न करीत असतातच. पण हे मूळ बरेचदा आजारी माणसाला त्याचे त्यालाच समजावून घेतले तर पुढील खूपसे अनर्थ टळू शकतात.
मानसिक कारणे
आयुष्याच्या 3 भागांमध्ये शरीर, मन, चैतन्य या घटकांचा समावेश होत असतो.
शरीरात प्रकट होणार्या खूपशा आजारांचा केंद्रबिंदू मनामध्ये लपलेला असतो. याची माहितीही आपल्याला असते. पण ती जागा शोधून आपल्या आजाराला दूर ठेवणे व आजार झाल्यावर त्याच्या बरे होण्यासाठी मदत करणे केवळ आपल्यालाच त्यांची जबाबदारी घ्यावी लागते.
सत्व, रज आणि तम
मनाच्या 3 घटकांमध्ये सत्व भाग हा सकारात्मक व बोध करून देणारा स्वस्थ, शांत, विचारी, भक्तीपूर्व कृतज्ञता असतो.
रज : चंचलत्व, जास्त विचारांचा भडिमार, आपल्याला सगळ्यांनी चांगलेच म्हणावे हा विचार
तम : मूढता, आळस, निराशा, उद्वेग, काळजी, मत्सर इत्यादी नकारात्मकतेने हा कप्पा भरलेला असतो. तीनही कप्प्यांचा कमी-अधिक प्रभाव माणसांच्या व्यक्तिमत्त्वावर पडत असतो. कधी कुठला कप्पा उघडावा/जाणावा हे आपले आपल्याला कळायला हवे.
या तीन गुणांनी शरीर-आजाराची जबाबदारी पेललेली असते.
सत्व गुण – मनःशांती व प्रसन्नता पर्यायाने सर्वांगीण आरोग्य
रज गुण – 1) वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना, दुखणी, 2) असमाधान, 3) आजारपणे.
तम गुण – 1) गंभीर आजार, 2) मनाची दुखणी, 3) अविचार व पर्यायाने असाहाय्यता
संकटातून वाट
मनाच्या या क्षोभातून दिसून येणारे आजार व त्यांची लक्षणे –
1) अम्लपित्त/घशाशी आंबट येणे/पोटात दुखणे, 2) पायात गोळे येणे/पायातील शक्ती गेल्यासारखी वाटणे, 3) डोकेदुखी, 4) अपचन/पोट साफ न होणे, 5) शांत झोप न येणे व अंगदुखी, 6) भूक न लागणे किंवा सतत खा-खा सुटणे, 7) अंगाला खाज येणे/त्वचेचे आजार, 8) मानदुखी/पाठदुखी/कंबरदुखी
इत्यादी अशासारख्या आजार, संकटांनी आपली वाट सारखी अडवली जात असेल तर
1) खाण्यापिण्याच्या सवयी तपासून पाहा. 1) एकदा खाल्ले की त्याचे पचन होईपर्यंत दुसरे अन्न खाऊ नये.
2) पाणी जरुरीपेक्षा खूप जास्त पिऊ नये.
3) बाहेरच्या खाद्यपदार्थांचा अतिरेक करू नये
4) पुनःपुन्हा तळलेले/गरम केलेले पदार्थ, शिळे पदार्थ खाऊ नयेत.
खाद्यपदार्थांमध्ये सात्विक, राजस, तामस पदार्थ असतात. ते समजून घ्यावेत व त्यांचा अतिरेक टाळावा.
सात्विक – ताजी ऋतूनुसार मिळणारी स्थानिक फळे, भाज्या
राजस – चमचमीत पदार्थ
तामसिक – शिळे, उष्टे, पचण्यास जड पदार्थ
2) 1) गोष्टी सोडून द्यायला शिकता आले पाहिजे.
2) क्षमा हा गुण अनेक आजारांवरचे मोठे शस्त्र आहे.
3) प्रेम हा गुण अनेक आजार/जखमा भरून काढण्यामध्ये श्रेष्ठ आहे.
4) विषाद किंवा निराशा हा आजार वाढवणार्या गोष्टींमध्ये श्रेष्ठ आहे. तर प्रयत्न-आशावाद-सकारात्मक दृष्टिकोन आरोग्य टिकवण्यासाठी अपरिहार्य आहे.
ज्ञान – इच्छा – क्रिया
या तीन शक्तींना आरोग्य जबाबदारीसाठी वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या समाजात वाढता मधुमेह, थायरॉइड – हॉर्मोनचे आजार, हृदयविकार, जीवाणू/विषाणूंचे आजार यांचे वाढते थैमान पाहिले की पुनःपुन्हा आरोग्य जबाबदारीचे महत्त्व सर्वांवर बिंबवले पाहिजे, हे जाणवत राहते.
1) शरीर-मनाची ताकद वाढवणारे अँटी ऑक्सीडंट पुढीलप्रमाणे –
कॉपर (वाढीसाठी उत्तम) – बाजरी, वर्याचे तांदूळ, बार्ली, कुळीथ, मसूर, काजू, तीळ
झिंक (मनाची शक्ती वाढते) – नाचणी, बाजरी, धणे, ओवा मेथी दाणे, खसखस, हळद, वेलदोडा, शिंगाडा, तीळ
मँगनीज (चयापचय) – राजमा, सोयाबीन, सुंठ
सेलेनियम (कॅन्सर, हृदयविकार विरोधी) – तृणधान्ये, भाज्या, फळे
1) मुळात शरीरातल्या पेशीपेशींना त्यांच्या सामर्थ्याबद्दल ज्ञान मिळवून देणे
2) त्यांच्या क्षमतांना सर्वाधिक उत्कृष्ट बनवण्याचा संकल्प करणे
3) त्याप्रमाणे कृती करवून घेणे
उठण्या-बसण्याच्या पद्धती, व्यायाम या सगळ्या गोष्टींचा एकत्र गुणाकार म्हणजेच सर्वांगीण आरोग्य व त्याची जबाबदारी प्रत्येक सुजाण व्यक्तीने स्वतःची स्वतःच घेतली पाहिजे हे नक्की.
वृत्तीची स्थिरता
मनाची प्रसन्नता
शरीराला हलकेपणा
निर्णयात सुस्पष्टता
रोगप्रतिकाराची क्षमता
सुसंवादाची निर्णायकता
आरोग्याचे फळ चाखण्या
मुळाच्या खतपाण्याची
जबाबदारी आणि कर्तव्य
दोहोंची अपरिहार्यता!