दिनमान प्रतिनिधी
ठाणे। घोडबंदर रोड येथील जुने ठाणे नवीन ठाणे व रुणवाल प्लाझाच्या पाठीमागे असलेल्या बॉलिवूड थीम पार्क वादात सापडले आहे. या दोन्ही मोठ्या प्रकल्पांत मोठा भ्रष्टाचार झाला असून पालिका अधिकारी व लोकप्रतिनिधींवर आरोप केले जात आहेत. अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी व नगरसेवकांनी या कामाविषयी अनेक तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जुने ठाणे, नवीन ठाणे तसेच बॉलिवूड थीम पार्कच्या कामाचा चौकशी अहवाल जनतेसमोर उघड करावा, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.
नवीन ठाणे, जुने ठाणे आणि बॉलिवूड थीम पार्क हे दोन्ही थीम पार्क सरनाईक यांच्या मतदारसंघात येतात. असे थीम पार्क ठाणे शहरात व्हावे यासाठी सरनाईक यांनी प्रशासनाला त्यावेळी पत्रही दिले होते. परंतु, एखाद्या ठेकेदाराच्या चुकीमुळे किंवा महापालिकेतील अधिकार्यांच्या नाकर्तेपणामुळे ठाणे शहरातील काही ऐतिहासिक स्थळांचे प्रतिबिंब दर्शविणार्या थीम पार्कची दुरवस्था बघून लोकप्रतिनिधी म्हणून मला अतिशय दु:ख होत आहे, असे सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे. ठाणेकरांच्या कराच्या पैशांतून ठेकेदाराने नियमाप्रमाणे काम पूर्ण केले नसतानाही त्याची बिले अदाही केली. त्यामुळे या दोन्ही थीम पार्कची दुरवस्था झाली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेने थीम पार्क व फिल्म इंडस्ट्रीसाठी काही तरतूद केली असल्यामुळे काही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना पोटशूळ उठत आहे.
थीम पार्कचा चौकशी अहवाल हा अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जाहीर करावा अन्यथा विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना मला या दोन्ही थीम पार्कसंदर्भात विधिमंडळात चर्चा घडवून आणावी लागेल.
– प्रताप सरनाईक, आमदार, ओवळा-माजीवडा