सूरज सामंत | अर्थभान
आफ्रिकेत काही प्राणी कोरड्या मोसमात पाण्यासाठी शेकडो मैल प्रवास करतात. बरेच पक्षी असह्य थंडीपासून संरक्षणासाठी दूर प्रदेशात हजारो मैल स्थलांतर करतात. प्राणी, पक्षी असो वा मानव, स्थलांतराचा महत्त्वाचा नियम असतो की ते नेहमी अधिक सुरक्षित प्रदेशाकडे होत असते. देशाच्या प्रगतीचे ढोबळमानाने मूल्यमापन करण्यासाठी क्लिष्ट निकषांपेक्षा स्थलांतराची कारणे, प्रमाण व स्थलांतराच्या आकड्यांचा अभ्यास कसा अधिक दिशादर्शक आहे, हे आपण मागच्या भागात पाहिले. देश सोडून परदेशी स्थायिक होणार्या नागरिकांच्या संख्येमध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारताबाहेर होणार्या स्थलांतराची पार्श्वभूमी व त्याचे देशावर होणारे परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न आपण या भागात करू.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2021 या एका वर्षात देश सोडून परदेशी नागरिकत्व घेणार्या भारतीयांचा आकडा होता 1 लाख 63 हजार. मागील तीन वर्षांत अंदाजे 3 लाख 90 हजार, तर 2015 पासून आजपर्यंत अंदाजे 10 लाख भारतीयांनी परदेशी नागरिकत्व स्वीकारले. डिसेंबर 2021 पर्यंत देशाबाहेर काम व इतर कारणांसाठी राहणार्या भारतीयांची संख्या 1 कोटी 33 लाखांपेक्षा जास्त होती. आर्थिक गुंतवणूक करून देश सोडणार्या श्रीमंत भारतीयांची या वर्षीची संख्या आहे 8 हजार तर 2016 पासून गुंतवणुकीच्या मार्गाने परदेशी नागरिकत्व घेतलेल्या एकूण श्रीमंतांची संख्या अंदाजे 45 हजार असावी. याशिवाय सर्वात धोकादायक मार्ग म्हणजे बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून जाणारे नागरिक. फक्त अमेरिकेत, मेक्सिकोमार्गे प्रवेश करीत असताना पकडल्या गेलेल्या भारतीयांची 2014 पासूनची संख्या अंदाजे 45 हजार आहे. या आकड्यांचे गांभीर्य अधिक अधोरेखित होते, जेव्हा निकष तपासून घेतले जातात. उदाहरणार्थ फक्त एका देशाच्या सीमेवर पकडले गेलेले भारतीय हा निकष आहे. म्हणजे न पकडले गेलेले किंवा इतर देशांमध्ये गैरमार्गाने गेलेल्या नागरिकांची आकडेवारी गृहीत धरलेली नाही. त्याचप्रमाणे नागरिकत्वाच्या एकूण अर्जांपैकी फार थोडे मंजूर होत असतात हे लक्षात घेतले तर इच्छुकांचा आकडा किती मोठा आहे, हे ध्यानात येऊ शकते.
कोणत्याही मोठ्या बदलाला मानवी मन तयार नसते. भौगोलिक परिस्थिती, हवामान, सामाजिक परिस्थिती यासारख्या परिचित गोष्टींची सवय सोडून नवीन ठिकाणी, नवीन वातावरणात आयुष्याची पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेणे फार सोपे नाही. त्यासाठी असणारी कारणे तितकीच गंभीर असतात. उदाहरणार्थ कोविडनंतर पर्यटन क्षेत्रावर झालेल्या परिणामांच्या अभ्यासाकरिता जेव्हा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व व्यावसायिकांशी चर्चा केली असता दिसून आले की, त्यांना परिस्थितीतून सावरून पूर्वपदावर येण्यास किमान दोन ते तीन वर्षे लागतील व सरकारने या क्षेत्राला पूरक काही धोरणे आखली नाहीत याची त्यांना खंत वाटत होती. फक्त आग्रा शहरातील किमान चाळीस पर्यटन क्षेत्रांतील व्यावसायिकांनी परदेशात स्थायिक होण्यासाठी अर्ज केले. जगभरातील देशांमधून बाहेर स्थलांतर करण्यामागे असणारी काही महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे. जीवनमानाचा चांगला दर्जा, सामाजिक भेदांमधून सुटका, जीवनमान व काम यामधील चांगले संतुलन, फायदेशीर कररचना, जास्त चलनमूल्याचे आकर्षण, नागरिकत्वाच्या आधारावर इतर देशांत उपलब्ध होणार्या प्रवासाच्या व व्यवसायाच्या संधी, स्त्रिया व मुलांसाठी अधिक सुरक्षित वातावरण, स्वच्छता, निसर्ग व कमी प्रदूषण, पुढील पिढीसाठी उपलब्ध संधी, पारदर्शकता व कमी भ्रष्टाचार यामुळे समान संधीची उपलब्धता, उत्तम दर्जाची आरोग्य व्यवस्था, नागरिक हितदक्ष सरकार, कामासोबत असणार्या तणावाचे प्रमाण कमी असणे, मानवी जीवनाचे योग्य मूल्य, कामाला मिळणारी प्रतिष्ठा, उत्तम सार्वजनिक व मूलभूत सुविधा वगैरे.
आर्थिक गुंतवणुकीच्या मार्गाने परदेशी स्थलांतर करण्यामुळे, इज ऑफ डुईंग बिजनेस म्हणजे व्यवसाय करण्याची सुलभता, या सारखे कार्यक्रम संघराज्य सरकार करत असतानादेखील दर वर्षी एक लाख कोटींपेक्षा अधिक भारतीय गुंतवणूक देशाबाहेर जात आहे. भारतातून स्थलांतराचे जास्त प्रमाण का? याची वर लिहिल्यांपैकी अनेक कारणे असू शकतात. सर्वेक्षण केले असता त्यातील काही महत्त्वाची कारणे समोर आली आहेत. आर्थिक गुंतवणूकमार्गे पाश्चिमात्य देशांकडे जाण्याला असलेल्या प्राधान्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे तिथली आकर्षित करणारी जीवनशैली व राहणीमानाचा दर्जा. नागरिकत्वाबरोबर आपसूकच ते ध्येय साध्य करता येते. शिवाय ज्या देशात गुंतवणूक केली जाते त्या देशाचा पासपोर्ट मिळाल्याने त्याच्या आधारे इतर देशांमध्ये व्यवसाय विस्ताराच्या संधी उपलब्ध होतात. भारतीय पासपोर्टवर अठ्ठावन्न देशांत आगाऊ व्हिजा, शिवाय प्रवास करता येतो. तर ऑस्ट्रिया देशाच्या पासपोर्टवर एकशे एकोणनव्वद देशांमध्ये आगाऊ व्हिजाची आवश्यकता लागत नाही. व्यावसायिकांसाठी या कारणामुळे अनेक संधी उपलब्ध होतात. ऑस्ट्रिया किंवा माल्टा या देशांतल्या गुंतवणुकीतून युरोपियन युनियनमधल्या कोणत्याही देशात स्थायिक होण्याची संधी उपलब्ध होते तसेच सेंट किट्स नेविस यासारख्या केरेबियन बेटांमधील देशांत स्थायिक होऊन तिथल्या नागरिकत्वाच्या पाठिंब्यावर जगभरात व्यवसाय प्रसाराचा वाव वाढतो.
काही उदाहरणे अशी आहेत ज्यांनी आखाती देशांचे नागरिकत्व घेण्यामागचे महत्त्वाचे कारण होते सरकारी खात्यांकडून किंवा अधिकार्यांकडून होणारा त्यांचा छळ. परंतु परदेशी पासपोर्ट मिळाल्यानंतर इतरत्र व्यवसाय करण्यातला अडसर कमी तर झालाच, शिवाय अगदी भारतातही ज्याला लाल फितीचा कारभार संबोधले जाते तो अडसरसुद्धा कमी झाला. यामागचे कारण म्हणजे परदेशी नागरिकत्व. 2019 साली कॅफे कॉफी डे या भारतातल्या कॉफी विक्री उपाहारगृहाच्या सर्वात मोठे जाळे असणार्या व्यावसायिकाने त्याच्या मृत्यूमागे प्राप्तिकर खात्याच्या उच्च अधिकार्याने केलेल्या छळाचे कारण दिले होते. आजही अनेक उद्योजक खासगीमध्ये सरकारच्या या जाचाला कंटाळल्याचे सांगतात. व्यावसायिकांनी त्याला एक नावसुद्धा दिले आहे टॅक्स टेरर. अर्थात सरकारची बाजू बघता त्यांचे म्हणणे असते की, ही पावले त्यांना काळा पैसा पकडण्यासाठी किंवा करबुडवेगिरी थांबवण्यासाठी उचलावी लागतात. परंतु तज्ज्ञांच्या मते काही वेळा दंडात्मक आर्थिक वसुलीची लक्ष्यसुद्धा दिलेली असतात, जी साध्य करण्यापायी उचललेल्या पावलांचा त्रास व्यावसायिकांना होतो. लहान उद्योग या दबावाला कसे सामोरे जाणार? त्यातूनच असले निर्णय घेतले जातात.
मात्र देश सोडण्यामागे केवळ व्यावसायिक कारणेच नसल्याचेदेखील दिसून येते. देशातील बदलणारी समीकरणे, खालावणारी अर्थव्यवस्था, शिवाय समाजात वाढत असलेली तेढ ही त्याहीपेक्षा महत्त्वाची कारणे आहेत. किमान आपल्या पुढच्या पिढीला असल्या परिस्थितीमध्ये किंवा टोकाच्या ध्रुवीकरण झालेल्या समाजामध्ये राहायला लागू नये, या इच्छेपायी अनेक भारतीय नागरिकांनी इतर देशांचे नागरिकत्व घेण्याचा पर्याय निवडला. तसेच कोविडदरम्यान आरोग्य क्षेत्राची दुरवस्था समोर आल्याने या मागणीने इतका जोर पकडला की हेनली अँड पार्टनर्स या संस्थेला कोविडकाळात भारतात कार्यालयाची स्थापना करावी लागली. त्यांच्याकडे येणार्या अर्जांपैकी बर्याच जणांना दुसरी किंवा तिसरी लाट येण्याअगोदर परदेशात स्थायिक व्हायचे होते. कारण आरोग्य क्षेत्रात असलेल्या पायाभूत सुविधांची कमतरता व घटते मानवी जीवनमूल्य. त्यातच 2020 मध्ये रहिवासी आधारित कररचनेपासून फारकत घेऊन नागरिकत्वावर आधारित कर आकारणीचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे अनिवासी भारतीयांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. या किंवा यासारख्या भविष्यातील संभाव्य बदलांच्या शक्यतेमुळेदेखील काही नागरीकांनी इतर देशांकडे वळण्याचा मार्ग अवलंबला.
स्थलांतरामागे निव्वळ व्यावसायिक सोय हेदेखील कारण असू शकते. हा लोंढा तात्पुरतादेखील असू शकतो. परंतु तज्ज्ञांच्या मते इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक परदेशात निघून जाणे भारतासारख्या विकसनशील देशाला परवडणारे नाही. कारण ते इथून जात असताना त्यांच्या व्यवसाय क्षमता, रोजगार निर्माण करण्याच्या संधी, कर उत्पन्न करण्याची क्षमता आणि देशातील संपत्ती हे सर्व घेऊन जात असतात. शिवाय जगभरातल्या व्यावसायिकांना अप्रत्यक्षरीत्या परंतु स्पष्ट दिला जाणारा संदेश, देशात येणार्या गुंतवणुकीवर विपरीत परिणाम करू शकतो. आर्थिक गुंतवणुकीमार्गे स्थलांतराचा पर्याय नसणार्या इतर इच्छुकांसाठी वेगळे निकष पूर्तता करण्याचा पर्याय असतो. त्या निकषांमध्ये येणारे नागरिक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नसल्याची व देशासाठी लायबिलिटी (दायित्व) न बनता अॅसेट बनू शकतात याची खात्री केली जाते. म्हणजेच देश उभारणीसाठी उपयुक्त ठरू शकणारे हात व मेंदू परदेशात जात असतील तर त्याकडे अधिक सजगपणे पाहण्याची आवश्यकता आहे.
(लेखक व्यवसायांना स्ट्रॅटेजीबाबत सल्ला देतात.) [email protected]