दिनमान प्रतिनिधी
नवी मुंबई ।
ख्रिस्ती धर्मीयांचा दिवाळी सण असलेला नाताळ काही दिवसांवर येऊन ठेपलेला असून, सर्वच नागरिकांकडून विशेषतः शाळा, महाविद्यालयांत आणि खासगी कार्यालयांत नाताळ सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस नाताळच्या सजावट साहित्याची मागणी वाढत आहे. त्यानिमित्ताने ठाणे आणि नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या आहेत. सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग दिसत आहे. बाजारपेठेत 90% भारतीय बनावटीचे साहित्य उपलब्ध आहे.
सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, बेल्स, चांदण्या, खेळणी, सांताक्लॉज असलेले हेअर बँड, येशू व मेरी यांचे पुतळे, रोषणाई व विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य उपलब्ध आहेत. यंदा या वस्तूंचे बाजारभाव 20 % ते 25 % वाढले आहेत. यामध्ये सांताक्लॉज 40 ते 700 रुपये, ख्रिसमस ट्री 800 ते 12 हजार रुपयांना उपलब्ध आहेत. विविध आकारांच्या चांदण्या 100-130 रु., बेल्स 90 रु. ते 150रु., स्नो मॅन 100 ते 300 रुपयांना उपलब्ध आहेत.
हेअर बँडवर विविध आकारांचे सांता यांनाही अधिक मागणी आहे. ग्राहक हेअर बँड खरेदीला अधिक पसंती मिळत आहे.
नाताळ हा सण येशूंचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याचा उत्सव आहे. बाजारात येशू व मेरी यांच्या जीवनपटाची कहाणी माहिती होण्यासाठी पुतळेरूपी येशू प्रकटले आहेत. येशूंच्या जन्म ते मृत्यूपर्यंतची कहाणी सांगण्यासाठी विविध प्रकारच्या पुतळ्यांचा आधार घेऊन त्याचा एक संच तयार करून त्या संचाच्या आधारे त्यांचे जीवन रेखाटले आहे. 300 ते 6 हजार रुपयांपर्यंत हा संच उपलब्ध आहे. बाजारात चायना दीक्षा स्वदेशी बनावटीच्या वस्तूंना अधिक प्राधान्य आहे.
ख्रिसमस ट्रीचे खास आकर्षक
नाताळ सण साजरा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ख्रिसमस ट्री. मग तो लहान किंवा मोठ्या आकाराचा असतो. नाताळमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ख्रिसमस ट्री नागरिकांच्या पसंतीस पडतात. यंदा बाजारपेठेत नेहमीच्या ख्रिसमस ट्रीपेक्षा स्नो-ट्री आणि चेरीचे अधिक आकर्षक ठरत आहे. स्नो ट्रीवर बर्फ असल्याचे भासवून ते उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच ख्रिसमस ट्रीच्या भोवताली विद्युत रोषणाई आणि चेरी ठेवले असल्याने ट्रीवर आधीच सजावट केली आहे. स्नो ट्री 5 ते 6 हजार तर चेरी ट्री 5,500 ते 7 हजार रुपयांना उपलब्ध आहेत.