डॉ. मधुरा कुलकर्णी | एमडी ( स्त्री रोग – प्रसूती ), आयुर्वेद | आयुष्य सुंदर आहे
दिवाळीच्या सणानिमित्त सर्वत्र खूप आनंदाचे वातावरण असते. उत्साह जणू आसमंतात भरून उरलेला असतो. सकारात्मकता, मनःशांती आणि समृद्धी याची जणू साखळी तयार होते. जसा वातावरणाचा सकारात्मक परिणाम शरीर-मनावर होतो तसाच नकारात्मक वातावरणाने शरीर-मनाचे स्वास्थ्य पूर्ण बिघडूही शकते. त्यावर एक छानसा उपाय शोधायची आज खूप गरज निर्माण झाली आहे. आता हीच गोष्ट पाहा ना –
जानकीताईच्या नातीचे आजारपण म्हणजे एक गहन विषय बनला होता.
चार वर्षांची चिमुकली रेवा दर चार दिवसांनी आजारी पडत असे. सर्दी, खोकला, ताप आणि दमा यापैकी एक ना एक आजार ठरलेला. त्यावरच्या औषधोपचारांनी तिचे पोटच बिघडून जाई. घरातली सारीच माणसे हवालदिल झाली होती. आता करणार तरी काय? छोट्याशा मुलीचा त्रास कुणालाच सहन होण्यासारखा नव्हता.
खूप महिने वारंवार डॉक्टर बदलून त्या कुटुंबाची स्वारी आता आमच्या दवाखान्यात आली होती. पूर्ण तपासणी करून सार्या तब्येतीचा इतिहास विचारल्यावर खूपशा गोष्टी सहज स्पष्ट झाल्या
1) रेवाचे कुटुंबीय नवीन घरात राहायला आल्यापासून त्रास वाढला होता.
2) बिल्डिंग बांधकाम जवळच्या भागात चालू होते व धूळ – धुराचा त्रास जास्तीत जास्त होत होता.
3) घराच्या भिंतींनाही आतून ओल होती.
4) सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या सोसायटीबाहेर मोठे डम्पिंग ग्राउंड होते. त्यातून प्रदूषणाचा फ टका बालजीवाला बसला होता.
अर्भात सुस्थितीतील जानकीबाईंना या गोष्टी समजावून सांगितल्यावर त्यांनी योग्य ते बदल जलदीने केले व काही साध्या सोप्या औषधांनी, पोषक आहाराने रेवा पुन्हा आरोग्यवान झाली.
प्रदूषण – नवीन संशोधन
प्रदूषणाबद्दल आपण नेहमीच चर्चा करतो, त्याला दूषणे देतो. पण त्यातून मार्ग काढण्यासाठी कितीसा प्रयत्न करतो? पुढील संशोधन वाचल्यावर तरी आपल्यापैकी खूप जणांना या प्रदूषणापासून बचावाची गरज भासेल.
आपल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक त्रास आपल्या नवीन पिढीला होणार आहे आणि ही गोष्ट तितकीशी योग्य नाही.
1) गर्भार स्त्रिया व पोटातील बाळ यांच्या आरोग्यावर प्रदूषणाचा खूप परिणाम होतोय.
2) प्रदूषणामुळे अनेक जुनाट व किचकट आजार वाढताहेत. यामुळे आयुष्य कमी होऊ शकते.
3) प्रदूषणाचा दुष्परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे सारासार विवेकबुद्धीही कमी होऊ शकते.
हे तिन्ही संशोधनाधारित निष्कर्ष अत्यंत अस्वस्थ करणारे आहेत.
जगातील स्वास्थ्य व प्रदूषण
सुपूर्ण जगभरालाच वॉर्मिंग व प्रदूषणाची समस्या भेडसावते आहे. मुख्यतः वायू, पाणी, आवाज यामुळे होणारे प्रदूषण जास्तीत जास्त धोकादायक ठरत आहे.
1) वायूद्वारा होणारे प्रदूषण ः
श्वसनमार्गाच्या आरोग्यावर हल्ला, हृदयविकार, वारंवार सर्दी, खोकला, डोकेदुखी, मन एकाग्र न होणे, विसराळूपणा, थकवा, अॅलर्जीचे त्रास, त्वचा विकार, मानसिक ताण, चिडचिड असे एक ना अनेक त्रास अनुभवायला येतात.
2) दूषित पाण्यामुळे ः
पोटाचे आरोग्य बिघडते. पचनसंस्थेचे आजार वारंवार होतात. अन्नपदार्थांची सुरक्षितता कमी होते. झोप कमी होते. अस्वस्थता येते. मानसिक आरोग्यावर पुष्परिणाम होतो.
समाजाचा हातभार
समाजाच्या मनाच्या एकत्रित निर्णयावर आरोग्याच्या नौकेचे भविष्य अवलंबून असते. प्रदूषण वाढवायला आपण हातभार लावतोय की कमी करण्यात आपला सहभाग आहे, हे नक्की ठरवायला हवे. मी काय करू शकतो? प्राणायाम, श्वसनमार्ग शुद्धी इत्यादी.
1) गोष्टी शिकून घेऊन त्याचा अभ्यास करणे
2) सकाळी मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सान्निध्यात जाणे
3) नाकपुडीला आजल्या बाजूला तेल, तुपासे थेंब लावून मगच बाहेर पडणे
4) नियमित व्यायाम, योगसाधना करणे
5) तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरापासून दूर राहणे
6) सामाजिक भान ठेवून निसर्गाचे रक्षण करणे
7) योग्य विश्रांती घेणे
8) वृक्षतोड थांबवणे
आहार – पोषण : याबरोबरीनेच योग्य आहाराचा वापर करणे तितकेच महत्त्वाचे असते. पोषण शब्दाचा संस्कृतमधून मराठीत अर्थ पाहिला तर पालन करणे, वाढवणे असा होतो. यासाठी योग्य आहार घेणे व त्याचे योग्य पचन होऊन परिवर्तन होणे तितकेच महत्त्वाचे असते.
पोषण माध्यमे : शरीर, मन, विश्रांती, विचार, श्वासोच्छ्वास या पाचही माध्यमातून परिवर्तनाचे काम होत असते.
शरीर पोषणासाठी, झीज कमी होण्यासाठी
1) योग्य पद्धतीने बनवलेला
2) योग्य भांड्यात बनवलेला
3) योग्य वातावरणात, वैचारिक बैठकीने बनवलेला
4) गुणवत्तापूर्वक घटकांनी युक्त आहार खूप महत्त्वाचा असतो.
जेवण्याची वेळ, पद्धतही तेवढीच लक्षपूर्वक नीट ठेवली पाहिजे.
पोषक पदार्थ : प्रत्येक ठिकाणच्या हवामानानुसार पोषक पदार्थ वेगवेगळे असतात. लहानपणाच्या सवयीनुसार वापरता येतात.
ऊर्जेचा मुख्य आधार तृणधान्ये असतात. तृणधान्याच्या पचनाच्या शेवटी तयार होणारे ग्लुकोज आपल्या शरीराचे इंधन आहे. यापासूनच कॅल्शियम, आर्यन, जीवनसत्वे, मिनरल्स खूप प्रमाणात मिळतात व प्रोटिन्सचा उत्तम पुरवठा होतो.
तृणधान्य + कडधान्ये + ताक या सर्वातून परिपूर्ण पोषण होते.
तृणधान्याची काही उदाहरणे व उपयोग
1) सातू (यव) ः वजन कमी करणे, रक्तशर्करा नियंत्रण, बुद्धी वाढवण्यास उपयोगी, शरीराला स्थिरपणा देते.
2) ज्वारी ः वजन कमी करण्यास उपयोगी, उन्हाळ्यात ज्वारी खावी, कफ कमी करण्यास ज्वारीच्या लाह्या, भाकरी उपयोगी, पिठाची पेज बनवून लहान बाळांना देता येते.
3) शक्तीवर्धक, बाजरी भाकरी + उडीद वरण परिपूर्ण आहार, थंडीच्या काळात बाजरीचा उपयोग होतो.
4) नाचणी ः मेद कमी करण्यासाठी उपयोगी, नाचणीच्या पिठात ताक, हिंग, मीठ घालून केलेलली आंबील उन्हाळ्यात उपयोगी आहे.
5) मका ः कॅन्सरविरोधी लढण्याची क्षमता वाढते. ऊर्जा वाढविणारे (अँटि ऑक्सिडंट)
6) वरी ः शक्ती वाढविणारा आहार, हाडे तुटली असता (फ्रॅ क्चर) याचा चांगला उपयोग होतो.
7) राजगिरा ः कुपोषणाकडून सुपोषणाकडे नेणारा उत्तम पदार्थ
8) ओट ः वजन कमी करण्यासाठी, कोलेस्टरॉल कमी करण्यास उपयुक्त
मन : अन्नाच्या स्थुल भागातून शरीराचे तर सूक्ष्म भागापासून मनाचे पोषण होते. त्यामुळे अन्न घेत असताना आपल्या भावनांवर मनाचे पोषण अवलंबून असते. प्रसाद या स्वरूपात घेतलेल्या सार्याच गोष्टी मनाचे पोषण करतात व मनाद्वारे शरीराला आरोग्य मिळवून देतात.
आरोग्य – संस्कृती : नवरात्रीत पुढील गोष्टी आपण प्रसादस्वरूप घेऊ शकतो.
1) लोणी + खडीसाखर – सायीचे दही घुसळल्यावर तयार होणारा स्निग्ध भाग लोणी असतो. बुद्धीवर्धक, मनाला प्रसन्न करणारा.
शरद ऋतूतील नवरात्रीत विशेषतः डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी होते तेव्हा 1 चमचा लोणी + 1 चमचा मध + आवळा चूर्ण घेता येते.
2) पंचामृत ः प्रतिकारक्षमता वर्धक, मनातील जणाव दूर करणारे, मनपोषक
श्वासोच्छ्वास
घरातील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी धूपन खूप उपयोगी पडते. गुग्गुल, अगरू इत्यादी पदार्थ जाळून त्याच्या धुराने वातावरण प्रसन्न राहते. श्वास चांगला घेता येणे हे मनःशांतीसाठी आवश्यक असते.
पंचगव्य – धूपन : गायीचे शेण, गोमूत्र, दूध, तूप, दही या पाच पदार्थांचा उपयोग करून वातावरण शुद्ध होते.
योग्य विचार : आपल्या शरीरातील स्पंदने चांगली करून आजूबाजूचे वातावरणही सुधारतात.
योग्य विश्रांती : उत्तम झोप मनःशांती व पर्यायाने समृद्धीचा राजमार्ग आहे.
प्रदूषणाला दूर करायला
शिस्तीचा एक हवाय बडगा
निसर्गाला जपण्याचा
मार्ग नवा चोखाळलेला बरा
उशीर होण्याआधी
जागे व्हायला हवे
पुढील पिढीच्या रक्षणासाठी
सज्ज राहिलेले बरे