दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
स्वच्छतेची सुरुवात स्वत:पासूनच करू या, स्वच्छतेचे महत्त्व मनावर बिंबवू या असे उद्गार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज काढले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत इंडियन स्वच्छता लीग २.० अभियानात दुगार्डी गणेश घाट परिसर येथे स्वच्छता मोहिमेसमयी त्यांनी हे उद्गार काढले.
आपण स्वच्छता केली तर शहर स्वच्छ राहील, यासाठी आपण सर्वांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त डॉ. दांगडे यांनी या वेळी केले. या स्वच्छता लीगमध्ये देशातील अनेक शहरे सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये जे शहर अधिक चांगले करेल त्याला पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे यासाठी कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छता लीगमध्ये सहभागी होऊन जनजागृती करावी, असे आवाहन आयुक्त डॉ. दांगडे यांनी केले. या वेळी महापालिका स्वच्छता अभियान ब्रँड अॅम्बॅसेडर डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रुपिंदर कौर, घनकचरा व्यवस्थापनचे उपायुक्त अतुल पाटील आदी उपस्थित होते.